आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोडकर खंडेराव! (सुदाम राठोड, रसिक)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडेराव, तू ज्या गावगाड्याचा चालक-मालक म्हणून मिरवत होतास, त्याची जू कोणाच्या खांद्यावर होती? कोणाच्या घामावर तुझी जमीनदारी पोसली होती? तू ज्या महान कृषी संस्कृतीचे गोडवे गातोयेस ना, त्याच्या तळाशी जाऊन बघ. तिथे आमच्या गुलामीचे अवशेष सापडतील...

खंडेराव, तुला या विश्वभानाच्या घोंगावत्या समुद्रफेसात आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा निरर्थक ठरण्याची भीती वाटत राहते. आपल्या माथ्यावरचे पहाटी पांघरलेले रोषण सूर्य कधीही ढळू नये, नि उग्रगंधी धुळीने आपल्याच घरात घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ साचावी, असेही तुला वाटत राहते. पण खंडेराव, ज्यांच्या बेरंग आयुष्याचा निरर्थक बुडबुडा निव्वळ भाकरीच्या बदल्यात गावभर पाखालीने पाणी भरता भरता फुटून गेला, त्या असंख्य लोकांचं काय? ज्यांच्या माथ्यावरचा सूर्य जात-धर्म-लिंग-वर्ण-वर्गव्यवस्थेने गिळंकृत केला होता, त्या गावकुसातल्या आणि गावकुसाबाहेरच्या अंधारात खितपत पडलेल्या दलित-भटक्या-आदिवासींचं काय? शेरपसा धान्याच्या बदल्यात वर्षभर सेवा घेऊन गावाने अडगळीत फेकलेल्या अलुत्या- बलुत्यांचं काय? खंडेराव, तू ज्या गावगाड्याचा चालक-मालक म्हणून मिरवत होतास, त्याची जू कोणाच्या खांद्यावर होती? कोणाच्या घामावर तुझी जमीनदारी पोसली होती? तू ज्या महान कृषी संस्कृतीचे गोडवे गातोयेस ना, त्याच्या तळाशी जाऊन बघ. तिथे तुला आमच्या गुलामीचे अवशेष सापडतील...
 
याचा अर्थ सबंध गावगाडा वाईट आणि आजचं आधुनिक जग सगळं चांगलं, असं नाही. निसर्ग आणि मानवी संवेदनेला ओरबाडत सुरू झालेले हे आधुनिक विकासाचे वेगवान अघोरी चक्र जगाला शेवटी विनाशाकडेच घेऊन जाणार आहे, याबद्दल माझ्याही मनात शंका नाही. पण म्हणून या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी थेट भारतीय सामंतशाहीचा पाया असणाऱ्या जुनाट व्यवस्थेकडे जाणे, हेदेखील वेदांकडे चला, शरीयतकडे चला, म्हणणाऱ्या कट्टर मूलतत्त्ववाद्यांसारखे आहे. अर्थात, संपूर्ण शोषणमुक्त आदर्श समाजव्यवस्था कधीच अस्तित्वात नव्हती. ना वेदकाळात, ना शरीयत काळात, ना आजही. पण ती कशी असावी, याची नव्याने मांडणी तर करता येईल. या नव्या दुनियेचं स्वप्न बघायला काय हरकत आहे, खंडेराव?
 
आज तू जे सांस्कृतिक राजकारण रेटत चाललास, ते फार घातक आहे. तुझ्यामागे शेंदराची वाटी घेऊन धावणाऱ्या तथाकथित गरामीन देशी लेखकुंची मांदियाळी बघितली, की पोटात खड्डा पडतो. एकदा का तुला शेंदूर लागला, की तो खरवडून काढण्यात आमच्या कैक पिढ्या खर्ची पडतील. खंडेराव, आम्ही तुझा देव होऊ देणार नाही.

तू चार्वाक, बुद्ध, जैन, चक्रधर, ज्ञानेश्वर, बसवेश्वर, तुकाराम अशी अवैदिक परंपरा मांडत वैदिक वर्णव्यवस्था नाकारतोस. कारण वर्णव्यवस्थेत तुझे शोषण होत होते. पण त्याच वेळेस खंडेराव तू जातीव्यवस्थेचे समर्थन करतोस. कारण काय, तर जातीव्यवस्थेचा तू लाभार्थी आहेस. भारताची सांस्कृतिक विविधता केवळ जातींमुळेच टिकून आहे आणि त्यामुळेच इथे जातीअंत शक्य नसल्याचे सांगून तू एका फटक्यात फुले-शाहू-आंबेडकरांना बाद करून टाकतोस. संपूर्ण जातीअंताच्या चळवळीला निकाली काढतोस. तुला जाती उभ्या नाही, तर आडव्या हव्या आहेत. खरे सांग खंडेराव, भारतात जातीची उतरंड आडवी कधी होती? कोणत्या काळात इथे महार, मातंग, चर्मकार, मेहतर, भटके, आदिवासींना माणूस म्हणून सन्मानाची वागणूक मिळाली?
 
खंडेराव एक लक्षात ठेव! जे वरच्यांमुळे पीडित आहेत, पण ज्यांना खालच्यांची पीडा कळत नाही, अशा मधल्यांना कधीच मुक्ती मिळत नाही. आपल्या डोक्यावरचे पाय ओढायचे, पण आपले पाय ज्यांच्या डोक्यावर आहेत, त्यांचं मात्र समर्थन करायचं, याला कोणतं पुरोगामित्व म्हणावं खंडेराव? आपल्या आणि आपल्या समूहाच्या न्याय्य हक्कांसाठी तर कुणीही लढायला उभा राहील, पण अखिल शोषित पीडित जनतेसाठी प्रसंगी स्वकीयांविरोधातही लढायला उभा राहतो, तो खरा जननायक असतो. तो तू नाहीस खंडेराव. तू फक्त एका कादंबरीचा नायक आहेस. शोषकांच्या जगातला नायक आणि शोषितांसाठी खलनायक आहेस. तू पुरोगामित्वाची झूल पांघरलेला प्रतिगामी बैल आहेस. तुझी करुणा सिलेक्टिव्ह आहे. तुझी बंडखोरी सिलेक्टिव्ह आहे. तू सदाशिव पेठेला नाकारत स्वत:ची नवी बाजारपेठ उभी केलीस. 

तू बड्या बड्या लेखकरावांची मस्ती जिरवून स्वत:च मस्तीखोर लेखकराव बनलास. आता तुझीच सर्वत्र चलती आहे. आता तूच साहित्याचा मानदंड ठरू पाहतोयेस. तुझी साहित्यिक थाप पाठीवर घेण्यासाठी, तुझ्या दारातली रांग वाढत चाललीये. त्या रांगेत दलित, ग्रामीण, भटके, आदिवासी, स्त्रीवादी अशा सगळ्या प्रवाहांतले लोक आहेत. त्यांच्यातल्या काही तडजोडवाद्यांना तू कुरवाळतोस आणि बाकीच्यांना फाट्यावर मारतोस. तसा तू आतापर्यंत फाट्यावरच मारत आलास. मग तो राजा असो की रंक, तू पर्वा केली नाहीस. तुझ्या या बिनधास्त स्वभावावर तर कोणे एकेकाळी आपण फिदा होतो. पण लवकरच जमिनीवर आलो. हेही एक बरे झाले. तुझ्या समृद्ध अडगळीत पडलेले माझ्या पूर्वजांचे मलूल चेहरे बघितले. तुझ्या भोवतीचा सरंजामी माज आणि तुच्छतावाद बघितला. तुझ्या देशीवादाचे उलटे चक्र बघितले.
 
अर्थात, मी फक्त तुझ्याकडे शोषक म्हणूनच पाहतो, असं नाही. तुझे अनेक जातबांधवदेखील अल्पभूधारक, भूमिहीन, शेतमजुरांमध्ये विखुरलेले आहेत. त्यांचेही अनेक अंगाने शोषण झालेले आहे. आज जागतिकीकरणाच्या रेट्यात शेती व्यवसायाला लागलेली उतरती कळा, सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. अलीकडे थोडीफार शेती मिळाल्याने, त्या दु:खाचे आम्हीदेखील भागीदार आहोत. त्यांच्याकडे पाहून जीव कळवळतो, पण तुम्हाला वास्तवच समजून घ्यायचे नाही, त्याला कोण काय करणार? आपले खरे शत्रू कोण आणि खरे मित्र कोण, हे नीटपणे शोधून गावगाड्यातल्या सगळ्या छोट्यामोठ्या जातीसमूहांना सोबत घेऊन सामूहिक लढा उभारायचा सोडून तुम्ही एक तर हरवलेले ऐश्वर्य आठवून टिपं गाळीत नॉस्टेल्जिक होता, किंवा इतिहासातल्या ढाली-तलवारींचे खणखणाट आठवून उन्मादित होत ‘सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजीन त्याचे दात, अशी ही जात...’ वगैरेच्या फुकाच्या वल्गना करत बसता. 

खंडेराव, आज आपण सगळेच मूठभर भांडवलदारांच्या दावणीला बांधले गेलेले गुलाम आहोत. तू आणि मी आज एकाच पंक्तीत बसलो आहोत. आता मी खालून वर आलो की तू वरून खाली आलास, हा वाद घालून पंक्तिभेद करत एकमेकांशी भांडत बसायचं, की एकत्रित येऊन लढा उभारायचा, हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. बघू या, ‘हिंदू’च्या पुढच्या भागात तू काय काय करतोस ते.
 
खंडेराव, जेव्हा तू पांडुरंग सांगवीकर नावाने ‘कोसला’ विणत बसला होतास ना, तेव्हापासून तुला मी ओळखतो. तुझ्यातल्या शरणागत बंडखोराला ओळखतो. नंतर तू पांडुरंगाचा चांगदेव झालास. आता चांगदेवाचा खंडेराव झालास. पण तुझा स्वभाव काही बदलला नाही. या साठ-सत्तर वर्षांच्या प्रवासात तू सतत अस्वस्थ होतास. पण ही अस्वस्थता फक्त तुझ्या तुटलेपणाची होती. गावाने अधोरेखित केलेलं तुझं ठळक अस्तित्व शहराच्या गर्दीत हरवून जातं की काय, याची तुला भीती वाटत होती. तुला ना शहराशी जुळवून घेता आलं, ना गावात राहता आलं. गाव आणि शहराच्या मधोमध तू नुसताच घुसमटत राहिलास. ही घुसमटच तुझ्या एकूण अभिव्यक्तीला रेटा देत राहिली. तुला तिरकस शेरेबाजीकडे घेऊन गेली. खंडेराव, या घुसमटीशिवाय तुझ्याकडे काही गंभीर सांगण्यासारखं आहे काय? तू आजपर्यत नुसत्याच याच्या-त्याच्या रेवड्या उडवत आलास. टिंगलीशिवाय तू आणखी काय केलंस? मला माहीत आहे, तू माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार नाहीस. यापूर्वीही तू कधी कुणाच्या प्रश्नांना उत्तरे दिलेली नाहीस. एखादं खळबळजनक विधान करून निघून जायचं. मागाहून लोकं तावातावाने चर्चा करत राहतात, अन् आपण मात्र छान गंमत बघत बसायचं, ही तुझी जुनीच खोड आहे खंडेराव. खंडेराव तू ना, प्रचंड खोडकर आहेस!

» तू फक्त एका कादंबरीचा नायक आहेस. शोषकांच्या जगातला नायक आणि शोषितांसाठी खलनायक आहेस. तू पुरोगामित्वाची झूल पांघरलेला प्रतिगामी बैल आहेस. तुझी करुणा सिलेक्टिव्ह आहे. तुझी बंडखोरी सिलेक्टिव्ह आहे. तू सदाशिव पेठेला नाकारत स्वत:ची नवी बाजारपेठ उभी केलीस...

लेखकाचा संपर्क : ९७६७५३८६९५
sud.rath@gmail.com
बातम्या आणखी आहेत...