आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यज्ञाचे खूळ!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागरी जीवनाशी संबंध आल्यामुळे ब्राह्मणी व्यवस्थेने तांडा संस्कृतीत हळूहळू शिरकाव सुरू केला आहे. हा शिरकाव आता आक्रमणाच्या स्वरूपात पोहरागड येथे होऊ घातलेल्या ‘लक्ष चंडी यज्ञा’च्या निमित्ताने होत आहे. बंजारा समाजातील थोर समाजसुधारक संत सेवालाल महाराज यांच्या भूमीत होऊ घातलेले हे ‘लक्ष चंडी यज्ञ’ म्हणजे त्यांच्याच विचारांना हरताळ फासण्यासारखे आहे.
 
गोर बंजारा ही आदिम भटकी जमात. तांडा संस्कृती अशी तिची ओळख. या जमातीची भाषा, वेषभूषा, खान-पान, सण-उत्सव, उपासना पद्धती, संस्कार हे वैदिक हिंदू धर्मापासून सर्वस्वी भिन्न असल्यामुळे ब्राह्मणांचा आणि या जमातीचा कुठेही संबंध आलेला नव्हता. पण, अलीकडे शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने नागरी जीवनाशी संबंध आल्यामुळे ब्राह्मणी व्यवस्थेने तांडा संस्कृतीत हळूहळू शिरकाव सुरू केला आहे. हा शिरकाव आता आक्रमणाच्या स्वरूपात पोहरागड येथे होऊ घातलेल्या ‘लक्ष चंडी यज्ञा’च्या निमित्ताने होत आहे.
 
बंजारा समाजातील थोर समाजसुधारक संत सेवालाल महाराज यांच्या भूमीत होऊ घातलेले हे ‘लक्ष चंडी यज्ञ’ म्हणजे त्यांच्याच विचारांना हरताळ फासण्यासारखे आहे. संत सेवालाल महाराज, हे कुठल्याही प्रकारच्या धार्मिक कर्मकांडाविरोधात होते. ‘केणी भजो मत पूजो मत’ (कुणाला भजू नका, पुजू नका), ‘जानजो छानजो पच मानजो (कुठलीही गोष्ट आधी जाणून घ्या. बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या आणि स्वीकारार्ह वाटली तरच स्वीकारा)अशी विवेकवादी शिकवण देणाऱ्या या महापुरुषाचे दैवतीकरण करून त्यांना अवतारी पुरुष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. एकदा का अवतारी पुरुष म्हणून घोषित केलं, की त्यांचं कर्तृत्व शून्य होतं. त्यांच्या हातून जे जे असामान्य घडतं, त्यामागे दैवी शक्ती होती, अशी धारणा बनते. संत तुकारामांसारखे सेवालाल महाराजांनादेखील जिवंतपणीच स्वर्गात धाडून त्यावर पुराणकथा रचण्यात आल्या. मुळातच, हा बहुतांश समाज अशिक्षित असल्यामुळे त्याने या गोष्टींवर सहजपणे विश्वास ठेवला. पण सुशिक्षित बनलेला वर्गही आंधळेपणाने या गोष्टी स्वीकारत हिंदू समाजरचनेत स्वतःचे स्थान चाचपडू पाहतो, त्याचे मात्र वाईट वाटते.
 
अलीकडे जातीय-धार्मिक-प्रादेशिक अशा सगळ्या अस्मिता अत्यंत टोकदार बनत चालल्या
आहेत. प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा एक महापुरुष हवा आहे. मग त्याचे कार्य आणि कर्तृत्व जयंती साजरी करण्यापुरते तरी आहे काय आणि असेल तर किती? असले प्रश्न गौण ठरतात. जातीच्या मुद्द्यावर लोकं पटकन गोळा होतात. प्रत्येकाला स्वत:चा जाज्वल्य इतिहास (जाज्वल्य इतिहास म्हणजे केवळ लढाया, राजकारण, कटकारस्थान, रक्तपात इ.) शोधून त्यावर वर्तमानाची इमारत उभी करायची आहे. प्रत्येकाला त्या इमारतीचे मालक बनायचे आहे. प्रत्येकालाच शासक बनायचे आहे. पण जे प्राचीन काळापासून ना मालक ना गुलाम, अशा अवस्थेत जगत आले, अशा लहानसहान शांतताप्रिय जाती समूहांना आज एकतर बहुसंख्याकांची सांस्कृतिक गुलामगिरी पत्करावी लागत आहे किंवा विरोधकांना सामील तरी व्हावे लागत आहे. इथे कुणालाच तटस्थ राहणे जमत नाही.
 
सध्याचे उदाहरण द्यायचे, तर जर तुम्ही मोदींचे विरोधक असाल तर आपोआपच काँग्रेसचे समर्थक समजले जाता किंवा मोदींचे समर्थक असाल तर काँग्रेसचे विरोधक समजले जाता. आज भारतात एवढे दोनच दृष्टिकोन शिल्लक आहेत. याशिवाय तिसरा पर्याय असूच शकत नाही, अशी परिस्थिती आहे. वस्तुत: भारतात असे बरेच छोटे मोठे जातीसमूह आहेत, जे युद्ध, राजकारण, धर्मकारण यापासून दूर आपलं जीवन जगत होते. पण शासक जातींच्या युद्धखोर इतिहासाने आणि वर्चस्ववादी संस्कृतीने त्यांच्यात न्यूनगंड निर्माण केले. या न्यूनगंडाची जाणीव अडाणी लोकांपेक्षा सुशिक्षितांमध्ये अधिकची दिसते. म्हणून ते बहुसंख्याकांच्या धर्माशी, संस्कृतीशी स्वतःला जोडू पाहतात. त्याचा भाग बनू पाहतात. तेच तर त्या त्या जाती, धर्मातील लाभार्थ्यांना हवे असते. आपल्या उत्पादक जातींमध्ये त्यांना वाढ हवी असते. प्याद्यांची संख्या वाढलेली हवी असते.
 
तसेही गोर बंजारा समाजाने कुठल्याही धर्माचा विटाळ मानला नाही. अगदी इस्लाम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध अशा सागळ्या धर्मात हा समाज आढळून येतो. अर्थात, त्यांनी हे जाणीवपूर्वक स्वीकारलेले धर्म आहेत. पण त्या आधी ते हिंदू होते आणि उर्वरित बंजारा समाज हा हिंदूच आहे, हे गृहीतक साफ चूक आहे. मुळात बंजारा ही जात नाही. ती एक स्वतंत्र जमात आहे. वैदिक हिंदू वर्णव्यवस्थेच्या आधारे गावगाड्याच्या आत जातीव्यवस्था जन्माला आली. पण गावगाड्याच्या बाहेरची लोकं या जातीव्यवस्थेपासून दूरच होते. या लोकांनी आपल्या जमातीअंतर्गत स्वतःचा गावगाडा विकसित केला. निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्यांनी निसर्गालाच देव मानले, निसर्गालाच धर्म मानले. मग आज अशा बहुतांश जमातींच्या शाळेच्या दाखल्यावर किंवा जातीच्या दाखल्यावर धर्माच्या रकान्यापुढे हिंदू हा शब्द कुठून आला? कुणी आणला? जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मात धर्मांतर केले, तसे बंजाऱ्यांनी हिंदू धर्मात धर्मांतर केल्याचे काहीच कसे पुरावे नाहीत? अशा प्रसंगी पोहरा ता.मनोरा जि.वाशीम येथे २४ मार्च ते ३ एप्रिल २०१७ दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या लक्ष चंडी यज्ञात अखिल गोरबंजाऱ्यांनी सामील होण्यामागचे रहस्य काय आहे? खरे तर संघाच्या ‘घरवापसी’ प्रकल्पाचा आणि संघपुरस्कृत भाजप सरकारच्या भगवीकरणाचाच हा अजेंडा आहे, म्हटल्यास वावगे ठरू नये. 
 
यज्ञ संस्कृती ही वैदिक ब्राह्मणांची संस्कृती आहे. पूर्वी यज्ञाचे यजमानपद घेतलेल्या राजाला त्यासाठी प्रचंड खर्च करावा लागत असे. तो खर्च आपल्या रयतेकडून कराच्या माध्यमातून वसूल केला जाई. गोरगरिबांच्या कष्टाच्या पैशावर यज्ञस्थळी पशूबळी, मांस, मद्य, मैथुनाचे बीभत्स प्रकार खुलेआम सुरू असत. अशा या संस्कृतीचा आणि बंजारा समाजाचा काहीएक संबंध नसताना संत सेवालाल महाराजांची गादी चालवणाऱ्या रामाराव महाराजांना पुढे करून काही हिंदुत्ववादी शक्तींनी लक्ष चंडी यज्ञाचा घाट घातला आहे, हे उघडच आहे. तब्बल पाच कोटी रुपये यज्ञाच्या आगीत जळून खाक होणार आहेत. या यज्ञाचे पौराेहित्य करण्यासाठी १४०० ब्राह्मण निमंत्रित असून त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. बंजारा समाजातील काही विवेकवादी लोकांनी या यज्ञाला विरोध दर्शवला आहे. हा पैसा निरर्थक कर्मकांडासाठी वापरण्यापेक्षा समाजातील गरजवंतांसाठी, विधायक कामासाठी वापरला जावा, तरच समाजाचे काही भले होईल, अशी त्यांची धारणा आहे. यज्ञाने आजपर्यंत कोणाचेच भले झालेले नाही, हा इतिहास ते समाजातील लोकांना समजावून सांगत आहेत.
 
बंजारा संस्कृतीचे अभ्यासक प्रा. मोतीराज राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, हे धार्मिक आक्रमण थांबविण्याची विनंती केली आहे. ग. ह. राठोड, जीजाताई राठोड, प्रा. शाम मुडे, प्रा. कृष्णा राठोड, प्रा. अशोक पवार आदी कार्यकर्ते लोकशाही मार्गाने आपला विरोध नोंदवत आहेत. मात्र काही समाजकंटकांनी ग. ह. राठोड व जीजाताई राठोड यांच्यावर हल्ला केला. त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. हा प्रश्न केवळ एका बंजारा समाजाचा नाही. अनेक छोट्या मोठ्या जाती समूहांची स्वतंत्र ओळख पुसून त्यांचे विलिनीकरण सुरू झाले आहे. म्हणूनच विवेकवादी विचारांना प्रमाण मानणाऱ्या फुले -शाहू- आंबेडकरी चळवळीतील व एकूणच पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमण परतवून लावणे आवश्यक बनले आहे.
 
sud.rath@gmail.com
(लेखकाचा संपर्क : ९७६७५३८६९५)
बातम्या आणखी आहेत...