आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीताचा राजकीय संग...!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही असो, पण केवळ राजकारणातच राजकारण नसतं तर आपल्या जगण्यात भक्ती, प्रीती, देशभक्ती, सहानुभूती, संवेदना, आवेग, आवेश, प्रेम, माया निर्माण करणाऱ्या संगीताच्या क्षेत्रातसुद्धा ते असतं, हे त्याच्या जवळ न जाताही अनेक लोकांना कळतं.

२००० साल होतं ते. माझ्याकडे एका मराठी चॅनेलचं संगीतावर आधारलेल्या रिअॅलिटी शोचं काम आलं होतं.म्हणजे मी गाण्याबद्दल, संगीताबद्दल जे काही लिहून देणार होतो, ते शोच्या निवेदिकेने बोलायचं होतं. शिवाय त्यात भाग घेतलेल्या स्पर्धकांनी निवडलेल्या मराठी गाण्यांचा एकूण आढावा घ्यायचा, अधेमधे त्यांना सूचना करायच्या, अभिप्राय द्यायचा, असा तो माझ्या कामाचा सगळा मामला होता. शुटिंग सुरू असताना सेटवर असणं, त्यामुळेच माझ्यावर बंधनकारक होतं. त्यामुळे मला सेटवर जावं लागायचं, त्या वेळचीच एक गंमत सांगण्यासारखी आहे... व्हायचं काय की, या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेणारे स्पर्धक जसे पुण्या-मुंबईतले असायचे, तसे त्यातले वादकसुद्धा पुण्या-मुंबईतले असायचे. औरंगाबाद, यवतमाळ वगैरे ठिकाणचा एखाद-दुसराच असायचा. शोमधल्या स्पर्धक आणि वादकांच्या शूटिंगच्या आधी रिहर्सल्स व्हायच्या. स्पर्धक त्यांचं गाणं गायचे आणि वादक त्यांना साथ द्यायचे. एकदा जेवणासाठी आमचं मध्यंतर झालं, तेव्हा मुंबईचा एक वादक माझ्याकडे आला आणि मला अगदी दबक्या आवाजात म्हणाला, "संगीत हे संगीत असतं, हे बरोबर की नाही?’
त्याच्या या प्रश्नाला जगातल्या कोणत्या माणसाची "नाही' म्हणायची बिशाद होती!
मीसुद्धा त्याला अपवाद नव्हतोच.

पण तो जे पुढे म्हणाला त्यात खरी गंमत होती, "संगीतात कसलंही राजकारण आणता कामा नये, हेसुद्धा बरोबर की नाही?’

आताही मी "हो'च म्हणालो, पण आता हा राजकारणाचा कसला पाढा वाचतोय, म्हणून मी त्याच्याकडे उत्सुकतेने एकटक पाहात राहिलो.

तो म्हणाला, "तू पाहिलंस?... हे पुण्याचे लोक मुंबईतला माणूस गायला आला की कसे आळसावल्यासारखे वाजवतात ते?... पाहिलीस त्या वेळची त्यांची बॉडी लँग्वेज?...कसली तरी खुन्नस काढताहेत रे हे लोक!’
मला तेव्हा त्याचं काही पटलं नाही, त्यामुळे मी ते काही फारसं मनावर घेतलं नाही.
पण नंतर जेव्हा रिहर्सल सुरू झाली आणि मुंबईतली एक मुलगी गायला पुढे आली, तेव्हा मघाचा तो वादक मला डोळ्यांनी खुणावू लागला... आणि माझ्या लक्षात आलं की, खरंच गाणं सुरू झाल्यावर पुण्यातले ते दोघं वादक त्यांच्या वादनाला तितकासा न्याय देत नव्हते. ते खरोखरच किंचित सुस्तावल्यासारखे आणि अगदी यंत्रवत वाजवत होते. नीट लक्ष दिल्याशिवाय ते प्रकरण तसं लक्षात येण्यासारखं नव्हतं. त्या वादकाच्या हे लक्षात येत होतं, कारण तो तेव्हा त्यांच्या मांडीला मांडी लावूनच गाणं वाजवण्यात सहभागी होता... आणि तो नेमका तेव्हा जीव लावून त्याचं काम करत होता. त्यामुळे जीव न लावता काम करणारा त्याला तिथल्या तिथे चटकन हेरता येत होता.

नंतर संध्याकाळी रिहर्सल संपताना कुणीतरी त्या पुणेकरांमधला एक जण म्हणालासुद्धा की, या सिझनमधली मुंबईची ही मुलं गाण्यात तशी कच्ची दिसताहेत हो!... मग मात्र मला त्या मुंबईच्या वादकाच्या कुजबुजीतला अर्थ उलगडला...

संगीतासारख्या तशा नाजूकसाजूक कलेच्या प्रांतातला राजकारणाचा तो फारच छोटा कवडसा असला तरी खऱ्याखुऱ्या राजकारणाचं जसं गुन्हेगारीकरण व्हावं, तसं संगीताचं राजकारणीकरण होण्याचा तो प्रकार नक्कीच नाकारता येण्यासारखा नव्हता.

पण मला आठवतंय, एका गजलगायकाने हार्मोनियमवर बोटं फिरवता फिरवता मला अगदी सहज म्हटलं होतं, देखिये... सारेगमप का यह र है ना ऋषभ का नही है मेरे भाई, वह हमारे इंडस्ट्री के राजनिती का र है... आज के सारेगमप में यह लोगों ने राजनिती कभी लायी मेरे समझ में ही नयी आयी!

मी त्याला मग थेटच प्रश्न केला, म्हटलं का वाटतंय तुला संगीतात राजकारण आलं असं?
त्याने मग त्याच्याबाबत घडलेल्या राजकारणाचा अख्खा पाढाच वाचून दाखवला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे झालं होतं असं की, त्या काळात तो एक गजलगायक म्हणून पुढे आला होता. त्याच्या मृदू मुलायम आवाजात तेव्हा गजल हा प्रकार जरा जास्तच लोकप्रिय झाला होता. लोक त्याच्या गजलांच्या कॅसेट्सवर (हो, तेव्हा सीडी, पेनड्राइव्ह असले प्रकार कुणाच्या कल्पनेतसुद्धा नव्हते) तुटून पडत होते. त्याच्या दर्ददिवाण्या गजलांच्या मैफलींना गावोगावी प्रचंड मागणी होती. लोकप्रियतेच्या अशा गगनचुंबी गच्चीवर असतानाच त्याच्याकडे हिंदी चित्रपटाचं म्हणे, एक मोठं बॅनर स्वतःच्या पायापंखांनी चालून आलं. त्याने त्याची गजल गाऊन त्या चित्रपटाला चार चाँद लावावेत, असं त्या मोठ्या बॅनरचं म्हणणं होतं. तो खुश झाला, चित्रपटाच्या संगीतकाराबरोबर त्याच्या बैठका सुरू झाल्या. गीतकाराचे शब्द आले, याच्या खालच्या पट्टीतल्या आवाजाला साजेशी अशी तितकीच कुसुमकोमल चाल तयार झाली, याच्या-त्याच्या घरी रिहर्सल्स सुरू झाल्या, या गजलगायकाने आपल्या मैफली-जलसे सगळ्यावर पाणी सोडलं, त्यात त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने, त्यासाठी काही लाखांचं नुकसान सोसलं. का तर, एका मोठ्या चित्रपटाच्या बॅनरमधून आपल्या गजलचे हळवेहळदिवे सूर उमटणार म्हणून!... पण घडलं भलतंच... एका आघाडीच्या गायकाने काहीतरी काडी केली. त्याने चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शकाला या गजलगायकाचा तो कातर आवाज एकूणच, आजच्या चित्रपटसंगीताच्या चौकटीतच कसा बसणारा नाही आणि त्या चित्रपटाच्या कथानकात गजललाच कसं स्थान नाही, हे पटवून देण्याचं महान कार्य यशस्वीरीत्या पार पाडलं... आणि गजल आणि गजलगायक दोघांनाही कटाप करून टाकलं.

हे झालं दोन गायकांमधलं राजकारण, पण ते तसं दोन गीतकारांमध्येही अधेमधे झिरपताना दिसलं आहे...उदाहरणच द्यायचं तर, असाच मराठीतला एक गीतकार आपला जम बसवण्यासाठी धडपडत होता, नंतरच्या काळात तो प्रस्थापित वगैरे झाला, पण त्याच्या उमेदवारीच्या काळात, त्याने एका चित्रपटासाठी एक गाणं लिहिलं. त्यात त्याला निर्माते, दिग्दर्शक आणि संगीतकाराने आधीच कडक ताकीद दिली की, तुम्ही साधं बोलतानासुद्धा अतिशय छापील बोलता, त्यामुळे हे गाणं लिहिताना अगदी बोलीभाषेतले शब्द लिहा, स्टेशनावरच्या हमालालासुद्धा गाण्याचा अर्थ कळला पाहिजे. झालं, गीतकाराने बिचाऱ्याने सगळ्यांच्या आज्ञा शिरसावंद्य मानल्या आणि आपल्यातला साहित्यिक प्रतिभेने निथळणारा कवी आपल्यातून पूर्णपणे वजा केला. अतिशय सोप्यातले सोपे शब्द लिहून गाणं पूर्ण केलं. त्यातली एक ओळ लिहिली, ती अशी- सोन्याने माखला कळस गं!... गीतकाराला त्या आपल्या सोप्या, ओघवत्या शब्दकळेचा कोण साक्षात्कार झाला! तो त्या आनंदात तसाच घरी गेला आणि आनंदाच्या भरात काहीही न खातापिता तसाच झोपला... पण तो झोपलेला असतानाच इथे जागेपणी वेगळंच नाट्य घडलं... ज्या गीतकाराला त्यांनी ‘सोपं लिहा, सोपं लिहा’ असं दहा दहा वेळा बजावलं, त्याचं गाणं त्या वेळच्या एका लोकप्रिय कवयित्रीला तिच्या मागणीवरून दहा वेळा फोनवरून वाचून दाखवलं (त्या वेळी मोबाइल, व्हॉट्स अॅप ही भानगड नव्हती.) आणि तिचा त्या गाण्याबद्दलचा अभिप्राय विचारला. बरं, त्या कवयित्रीने आपल्या अनुभवातून आलेला अधिकार आणि पांडित्य दाखवण्यात अजिबात कसूर न करता, त्या होतकरू गीतकाराच्या ‘सोन्याने माखला कळस गं’ या ओळीतले शब्द बदलले आणि ‘सोनवर्खी कळस गं’ असे शब्द लिहिण्याची मौलिक सूचना केली. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो होतकरू गीतकार संगीतकाराला भेटायला आला आणि त्याने आपण लिहिलेले शब्द बदललेले पाहिले, तेव्हा तो ‘सोनवर्खी’ हा शब्द पाहून वेगळ्या अर्थाने निःशब्द झाला... त्याने आश्चर्याने, पण थोडं नरमाईनेच विचारलं, ‘सोनवर्खी’ हा शब्द स्टेशनवरच्या हमालाला कळेल असं वाटतं?... समोरून उत्तर आलं- तुम्ही नवोदित आहात, त्या कवयित्री तुम्ही जन्माला आलात त्याच्या आधीपासून लिहिताहेत, त्यांना तुमच्यापेक्षा जास्त कळतं, त्यांनी लिहिलेला शब्द बरोबर आहे!... आता गंमत अशी की, त्या गाण्यावर नाव लागणार होतं, ते त्या नवोदित गीतकाराचं, त्या प्रस्थापित कवयित्रीचं नव्हे. त्यामुळे त्या गाण्यात तो विजोड शब्द त्या नवोदित गीतकाराला स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता... थोडक्यात काय तर, कवयित्रीने आपल्या शब्दाला किंमत आहे, हे पाहून शब्द बदलताना आपली आरस्पानी राजकीय प्रतिभा दाखवली होती!

सिनेसंगीताच्या सुवर्णकाळात कोणत्या गायिकेने कोणत्या गायक आणि गायिकांच्या बाबतीत आपलं राजकीय चातुर्य पणाला लावलं, हा इतिहास तर इतिहासाबद्दल प्रेम नसणाऱ्यांनाही आज माहीत आहे. त्यामुळे त्या इतिहासाचा आता चोथा झालेला आहे. त्यात कोणत्या थोर गायिकेचं कोणत्या थोर गायकाशी भांडण झालं, परिणामी त्या गायकाने त्या गायिकेसोबत गायला नकार दिल्यामुळे दुसऱ्या आणखी कोणत्या थोर गायिकेची चांदी झाली, या घटना आता लोकांना पुराणातल्या वाटू लागल्या आहेत, इतक्या जुन्या झाल्या आहेत.

काही असो, पण केवळ राजकारणातच राजकारण नसतं तर आपल्या जगण्यात भक्ती, प्रीती, देशभक्ती, सहानुभूती, संवेदना, आवेग, आवेश, प्रेम, माया निर्माण करणाऱ्या संगीताच्या क्षेत्रातसुद्धा ते असतं, हे त्याच्या जवळ न जाताही अनेक लोकांना कळतं. फरक इतकाच की, खऱ्याखुऱ्या राजकारणात ते काठोकाठ असतं, पण जीवनाबद्दलची आपली समजूत वाढवणाऱ्या संगीत वगैरे कलांच्या क्षेत्रात ते काठोकाठ नसलं तरी थोडा तळ ढवळला की दिसतंच...तिथेही शेवटी माणसं त्यांच्या ईर्षेची वाद्यं लावून बसलेली असतातच!... तिथल्या राजकारणातल्या कोकिळा आणि कावळेही अापला रंग दाखवतातच!!

(लेखक जाहिरात क्षेत्रातील ख्यातनाम कॉपीरायटर, संगीततज्ज्ञ आहेत.)
susheel.surve@gmail. com