Home | Magazine | Rasik | sudhir-gadgil-aurangabad-sambhajinagar

अस्सल उत्कटता हरवतेय!

सुधीर गाडगीळ, निवेदक | Update - Jun 02, 2011, 12:01 PM IST

मी नव्या दैनिकाचं 'स्वागत' करत या स्तंभात, असाच एखादा क्षण, माणसं, गावं, नोंदवीत जाणार आहे.

 • sudhir-gadgil-aurangabad-sambhajinagar

  भटकणं, भेटणं, भरभरून बोलणं या तीन गोष्टींत मला विलक्षण रस. त्यामुळे मी 'निमित्त' मिळताक्षणी गावोगावी भटकतो. 'ठिकाणां'ची अट नसते. न्यूयॉर्कच्या मॅनहटनमधल्या फुटपाथपासून कोकणातल्या आंबा घाटापर्यंत कुठल्याही रस्त्यावर असू शकतो. आदल्या रात्री टोकियोत कार्यक्रम करून पहाटे मुंबई विमानतळावर उतरून, लगेचच्या 'मुंबई-भुसावळ' गाडीत बसून, रात्री जळगावात कार्यक्रम करू शकतो. वाहनाची अट नसते. उपलब्ध असेल तर सोयीसाठी विमान, नाहीतर झुकझुक गाडी किंवा इनोव्हा. वाटेत गाडी बंद पडली तर गाडी ड्रायव्हरकडे सोपवून, ट्रक थांबवून, ट्रक ड्रायव्हरशी गप्पा मारत, मुक्कामाचं ठिकाण आणि कार्यक्रमाची अचूक वेळ साधणं याला सर्वोच्च प्राधान्य असतं.प्रवासातला अनोखा अनुभवलेला क्षण. वेगवेगळया टप्प्यांवर पुन:पुन्हा एखाद्या गावाला जात असताना त्या गावाचा बदलत गेलेला चेहरामोहरा, झोकून देऊन जगावेगळे उद्योग करण्यात रमलेली माणसं भेटतात. मी नव्या दैनिकाचं 'स्वागत' करत या स्तंभात, असाच एखादा क्षण, माणसं, गावं, नोंदवीत जाणार आहे. 'दिव्य मराठी'चा आरंभ औरंगाबादेतूनच होतोय, म्हणून स्तंभाच्या नमनाला याच 'औरंगाबाद'चं 'संभाजीनगर' होत असतानाच्या प्रवासात वेळोवेळी मला जाणवत गेलेलं हे शहर. साधारण पस्तीस-अडतीस वर्षांपूर्वी या शहरात मी प्रथम डोकावलो. पैठणगेटच्या कोपऱ्यावर 'अशोका' नामक एक लॉज कम हॉटेल. या 'अशोका'तल्या एका रूममध्ये आंघोळ करत असताना, खिडकीतून कुठल्या मोर्चाचे नारे-घोषणा सक्काळपासून ऐकू यायच्या. आता तारांकित हॉटेल्सनी गजबजलेल्या शहराच्या नव्या रूपाच्या पाश्र्वभूमीवर, त्या वेळचं ते 'अशोका' त्या काळी 'भारी' कसं वाटायचं, याचं आश्चर्य वाटतं.घर-रस्ते-हॉटेलात भेटणारी माणसं मात्र पुण्या-मुंबईपेक्षा जास्त आधुनिक विचारांची होती. एरवी लेखणीतून प्रहार करणारे, प्रत्यक्ष भेटीत स्वेटर घातलेले, ममत्वानं हितगुज करणारे अनंत भालेराव, बाबा दळवी आठवतात. वरचेवर जीभ फिरवत, डाव्या हाताच्या अंगठ्याने पाठ खाजवत, उजव्या हातातील पुस्तकं, मासिकं, केसपेपर्सची चळत सांभाळत फटाफटा मराठवाड्यातल्या माणसांची वैशिष्ट्यं सांगणारे अडव्होकेट नरेंद्र चपळगावकर डोयांसमोर येतात. हनुवटीवरून हात फिरवत, हसत-हसत शब्दांचे टोले देणारा निळू दामले सन्मित्र कॉलनीतल्या 'मराठवाडा' दैनिकाच्या उंच टेबलावर बसलेला दिसतो. कविता करणाऱ्या महावीर जोंधळेपासून चंद्रकांत कुलकर्णीपर्यंत सारेच पुढे पुण्या-मुंबईत स्थायिक झाले.'पदे' मिळविण्याची घाई नसलेली, सतत चळवळीचा ध्यास असलेली, स्वत:ची स्वतंत्र मतं असलेली सामान्य कार्यकत्र्यांची फौजच मला त्या काळी औरंगाबादेत भेटली. कमालीचे तापत जाणाऱ्या उन्हात दर तासागणिक कलकत्ता पानाचे तोबरे आग्रह करकरून खिलविणारे कार्यकर्ते-कलावंत-पत्रकार-दोस्त मला खूप अस्सल वाटायचे.
  सामाजिक प्रश्नांबद्दल जागरूकता
  वसमत गोळीबार, मिलिंद महाविद्यालयात वादळ, नामांतर प्रश्न, अशा अनेक निमित्तानं पत्रकार म्हणून शहरात हिंडताना, सामाजिक जाणिवांचं भान ठेवणाऱ्या सच्चा कार्यकरत्याचं हे गाव वाटायचं.तर पुढे 'मंतरलेल्या चैत्रबनात'चे कार्यक्रम घेऊन, त्या वेळच्या सरस्वती भुवनातल्या हॉलमध्ये येताना गप्पा-गाण्याला रसरसून दाद देणारी रसिक मंडळी इथे भेटायची. फ. मुं. शिंदेंच्या फटाकड्या शब्दांनी उत्तररात्र रंगायची. नरहर कुरुंदकर सरांबरोबर सावलीसारखा असणारा सुधीर गव्हाणे अहमदपूरच्या टेलिफोन एक्सचेंजमधून फोन करून दखल घ्यायचा.नेमक्या वेळी नेमक्या पक्षात जाण्याची हुशारी असलेला आमचा वकील मित्र प्रदीप देशमुख, उगाचच पुण्या-मुंबईला महत्त्व देत, भाबडेपणाचा आव आणून शंका विचारायचा. दळवी मंडळींचे नाट्यविषयक उपक्रम उत्सुकता वाढवायचे. सामाजिक प्रश्नात पोटतिडकीनं सहभागी होणारे कार्यकर्ते आणि नाट्यगाण्याला उसळून दाद देणारे रसिक असं माझ्या मनात ठसलेलं औरंगाबादचं रूप होतं. या भगभगत्या शहरात उत्कटतेचा ओलावा होता. हळूहळू कलावंतांपासून कार्यकत्र्यांपर्यंत बहुतेक जण मुंबईकडे स्थिरावले. उलट संगीतातला एखादा विश्वनाथ ओक पुणं सोडून इथेच विसावला. पुरोगामी विचारांवर पक्की मांड असलेल्या कार्यकत्र्यांच्या विचारधारा बदलत गेल्याचं दिसत गेलं. आचार-विचारांचा मोकळे-ढाकळेपणा मला मोहित करायचा. पुणेरीपणावर तावातावाने शब्दातून तुटून पडणारे मित्र आवडायचे. त्यांना चिडवायला मजा यायची. हल्ली कधी चक्कर टाकली की वाटतं, कलेपासून राजकारण्यांपर्यंत साऱ्याना फाइव्ह स्टार कल्चरनं व्यापलंय. त्यातील 'अस्सल उत्कटता' हरवल्यासारखी वाटते.

  पुण्याकडच्या फोटोत झळकू पाहणा:या कार्यकत्र्यांपेक्षा मराठवाड्यातील ही तरुण पोरं 'सामाजिक प्रश्नां'विषयी जास्त जागरूक असायची. तळमळीनं प्रश्न मांडायची. वसमत गोळीबार, मिलिंद महाविद्यालयात वादळ, नामांतर प्रश्न, अशा अनेक निमित्तानं पत्रकार म्हणून शहरात हिंडताना, सामाजिक जाणिवांचं भान ठेवणाऱ्या सच्चा कार्यकत्र्यांचं हे गाव वाटायचं. तर पुढे 'मंतरलेल्या चैत्रबनात'चे कार्यक्रम घेऊन, त्या वेळच्या सरस्वती भुवनातल्या हॉलमध्ये येताना गप्पा-गाण्याला रसरसून दाद देणारी रसिक मंडळी इथे भेटायची.

  हे सदर दर पंधरवड्याला प्रसिद्ध होईल

Trending