आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेक इन इंडिया’चा उद‌्गाता!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मेक इन इंडिया’चा नारा घुमला तो अगदी अलीकडे. मात्र ८१ वर्षांपूर्वी डेहराडूनच्या एम. मलाल यांनी ‘हिमालया ड्रग कंपनी’ची मुहूर्तमेढ रोवून प्रत्यक्ष कृतीचा दाखला दिला होता...

निसर्गामध्ये दडलेलं औषधी वैभव शोधून त्याचा उपयोग मानवी जीवन आरोग्यदायी करण्यासाठी, ८१ वर्षंापासून प्रयत्नरत असलेली ‘हिमालया ड्रग कंपनी’ ही आहे एक ताजी, अस्सल, ‘मेक इन इंडिया’ला शोभणारी यशोगाथा... एम. मनाल हा त्याचा उद‌्गाता. तो मूळचा डेहराडूनचा, निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातला. तत्कालीन ब्रह्मदेशातल्या जंगलांमध्ये फिरत असताना मनालला एक अजब दृश्य पाहायला मिळालं. चवताळलेल्या-पिसाळलेल्या हत्तींना शांत करण्याचा प्रयत्न करणारे काही माहुत त्यानं पाहिले. ते त्या हत्तींना कुठल्याशा वनस्पतींची मुळं खायला घालत होते. गंमत म्हणजे, ते पिसाळलेले हत्ती त्या मुळ्या खाल्ल्यानंतर निमूटपणानं शांतही बसत होते. मनालची चौकस वृत्ती जागी व्हायला ते दृश्य पुरेसं होतं...
कुठली आहे ही वनस्पती, नेमके कोणते गुणधर्म आहेत तिच्यात, याचा शोध घ्यायचं त्यानं ठरवलं. परंतु त्यासाठी लागणारा पैसा होता कुठे त्याच्याकडे? त्यानं आईचे दागिने गहाण टाकले, एक यंत्र विकत घेतलं. त्या वनस्पतीतलं सर्पेंटिना द्रव्य बाहेर काढलं आणि त्याच्या गोळ्या बनवायला सुरुवात केली. त्या गोळ्यांचंही टेस्टिंग करणं गरजेचं होतं. त्याच जंगलातल्या पिसाळलेल्या आणखी काही हत्तींवर त्यानं या औषधी द्रव्याचे प्रयोग केले. चमत्कार घडला...
‘राऊल्फिया सर्पेंटिना’ ही ती वनस्पती, मनालचं नशीब पालटून टाकायला पुरेशी कारणीभूत ठरली. १९३०मध्ये त्यानं ‘हिमालया ड्रग कंपनी’ची स्थापना केली. त्याच्या डोळ्यांपुढचं ध्येय स्पष्ट होतं. पाच हजार वर्षांचा वारसा लाभलेल्या आयुर्वेदातलं ज्ञान आधुनिक वैद्यकाशी मुकाबला करू शकतं, हे त्याला सप्रयोग सिद्ध करून दाखवायचं होतं. तीन वर्षं मनालनं त्या दिशेनं प्रयोग केले आणि १९३४मध्ये जगातलं पहिलं संपूर्ण आयुर्वेदिक असं रक्तदाबविरोधी औषध तयार केलं, त्याला यंदा ८१ वर्षं पूर्ण झाली. सर्पेंटिनाचं सहस्रचंद्रदर्शनवर्ष म्हणावं, असंच यंदाचं वर्षं...
हिमालयाची स्थापना झाली आणि दोनच वर्षांत मनालचा भाऊ मिसाल व्यवसायात आला. हिमालयाची स्थापना झाली डेहराडूनमध्ये, परंतु व्याप वाढायला लागताच मुंबईत, बंगळुरूत ‘हिमालया’नं बस्तान बसवलं. १९५०मध्ये डॉ. रोशन एम. कॅप्टन ‘हिमालया’त दाखल झाले. संशोधन-विकासाची सारी सूत्रं त्यांनी हाती घेतली. १९६४मध्ये मनाल यांचा पुत्र मेराज मनाल ‘हिमालया’त दाखल झाला. १९६५मध्ये विख्यात जर्मन औषधनिर्माता कर्स्टेन ‘हिमालया’त आले आणि त्यांनी अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांचं लक्ष ‘हिमालया’कडे वळावं, असे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या आगमनानंतर तब्बल दहा वर्षांनी १९७५मध्ये बंगळुरूमध्ये अद्ययावत संशोधन प्रयोगशाळा ‘हिमालया’नं उभी केली. सुमारे ७० संशोधकांचा ताफा आज तिथे औषधी वनस्पतींवर संशोधन करतो आहे.
"हिमालया'नं भारताबाहेर पहिलं पाऊल अमेरिकेत ठेवलं, ते १९९६मध्ये. टेक्सास परगण्यातल्या ह्यूस्टनमधलं ‘हिमालया’चं पहिलं ऑफिस त्या वर्षी सुरू झालं. ९० देशांमध्ये, म्हणजे जगाच्या पाठीवरील १९६ देशांपैकी जवळपास निम्म्या देशांमध्ये आज ‘हिमालया’नं आपला जम बसवला आहे. जगभरातल्या कार्यालयांचं आणि व्यवसायांचं नियंत्रण करणारी "हिमालया ग्लोबल होल्डिंग्ज लिमिटेड' ही कंपनी त्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
२००४मध्ये मनालचा नातू नबीब मनाल बंगळुरूच्या ‘हिमालया’च्या मुख्यालयात दाखल झाला. नबीबनं सॅन अ‍ॅँटोनिओतल्या ट्रिनिटी विद्यापीठातून विज्ञानाची पदवी घेतली. एक वर्षभर अनुभव घेतल्यानंतर नबीब पुन्हा अमेरिकेत गेला. हेविट असोसिएट‌्समध्ये त्यानं वरिष्ठ सल्लागार म्हणून काम सुरू केलं. तब्बल सहा वर्षं तो तिथे राहिला. फॉर्च्युन ५०० यादीतील काही कंपन्यांना हेल्थ केअर क्षेत्रात गुंतवणूक सल्ला देण्याचं महत्त्वाचं काम त्यानं केलं आणि पुरेशी पार्श्वभूमी तयार करून तो भारतात परतला.
‘हिमालया’तली मनाल घराण्याची तिसरी पिढी या प्रवेशानं कार्यरत झाली. ‘हिमालया’चा तो उपाध्यक्ष बनला. लाइफस्टाइल प्रॉडक्ट‌्ससाठी त्यानं वेगळी डिव्हिजनच स्थापन केली. एव्हाना जगभरात ‘हिमालया’चं बस्तान बसलेलं होतंच. मे २००६ला नबीब परत अमेरिकेत गेला. पोलंडमधून डरमॅटॉलॉजी, पिडिअ‍ॅट्रिक्स आणि सायकिअ‍ॅट्रिमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. ओर्मस्टेन ‘हिमालया’त रुजू झाल्या आणि आयुर्वेदाधारित औषधांचा हिमालयाचा आणखी एक प्रवक्ता जागतिक रंगमंचावर उभा राहिला.
‘हिमालया’नं केवळ मानवी जीवन सुखी-संपन्न व्हावं, याच दिशेनं पावलं टाकली नाहीत, ज्या निसर्गातून ही दिव्य वनसंपदा येते, त्या निसर्गाचंही संशोधन-जतन-संवर्धन होणं महत्त्वाचं आहे, हे जाणून ‘हिमालया’नं त्या दिशेनंही प्रयत्न सुरू केले. वनस्पती लावणं, वाढवणं, तिचं जतन करणं, तिची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्याला मोबदला देणं आणि संशोधित उत्पादनाच्या प्राणी तसेच मानवी जिवांवर चाचण्या घेणं आणि त्या यशस्वी ठरल्यानंतरच ती औषधं बाजारात आणणं, ही सारी काळजी "हिमालया'त घेतली जाते.
सर्पेंटिनासारखंच जगभर गौरवलं जाणारं ‘हिमालया’चं आणखी एक औषध "लिव्ह-५२'. यकृताच्या विकारांवरचं रामबाण औषध. अ‍ॅलोपॅथिक औषधं लाखभर रुपये मोजून विकत घ्यावी लागत असताना "लिव्ह-५२'नं अवघ्या काही हजारात अनेकांना गुण प्राप्त करून दिला आहे. गेल्या ८५ वर्षांत ‘हिमालया’नं एका मागोमाग एक अशा उत्पादन शाखा सुरू केल्या. आरोग्य जतनापासून (हेल्थ केअर) सुरुवात झालेली होतीच; त्यानंतर फेस केअर, बॉडी केअर, हॅँड अ‍ॅँड फूट केअर, हेअर केअर, बेबी केअर, ओरल केअर, पाळीव प्राण्यांसाठीची कम्पॅनियन केअर अशा अनेक रेंजेस सुरू झाल्या. मूत्राशयाच्या विकारावरचं सिस्टोन हे ‘हिमालया’चंच आणखी एक रामबाण म्हटलं जावं, असं औषध.
आज ‘हिमालया’ची तीनेकशे उत्पादनं बाजारपेठेत आहेत आणि आयुर्वेदावर आधारलेल्या भारतीय उत्पादनांच्या बाजारपेठेपैकी साठ टक्के उत्पादनांवर ‘हिमालया’ची नाममुद्रा उमटलेली आहे. ‘हिमालया’ला खरेदी करण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. अडीच-अडीच अब्ज डॉलर्सचे प्रस्ताव मनाल कुटुंबासमोर ठेवले, परंतु मनालनं त्याला भीक घातली नाही. कंपनी विकायचं आमच्या स्वप्नातदेखील नाही. काही औषधांच्या भारतबाह्य उत्पादनांसाठी चांगल्या फ्रॅँचाइझीच्या शोधात आम्ही होतो, त्याचा गुंतवणूकदारांनी गैरअर्थ काढला, असंच मेराज मनाल यांचं म्हणणं.
‘हिमालया’ आज हजार कोटींच्या उलाढालीच्या घरात आहे. येत्या पाच वर्षांत ती पाच पटीनं वाढावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. स्किन केअर विभागातलं तरुणांसाठीचं फेशियलचं उत्पादन हिमालयानं बाजारात आणलं आणि एकाच दिवसात एकाच ठिकाणी २८६ तरुणांचं फेशियल करून गिनेस बुकमध्ये ‘हिमालया’चं नाव दाखल झालं. ‘हिमालया’चा नीम फेस वॉश आता इतका लेकप्रिय झाला आहे की, २०१५मध्ये नीम फेस वॉश सॅचेटसच्या रूपात घेऊन ‘हिमालया’ला बाजारात उतरावं लागलं. नीमबरोबरच अॅलोव्हेरा, केसर, क्लिअर लेमन, अ‍ॅप्रिकॉट फेस वॉशदेखील आता ‘हिमालया’नं आणले आहेत. मनाल नावाच्या औद्योगिक घराण्याला ८१ वर्षांपूर्वी सर्पेंटिना नावाचा अल्लाउद्दिनचा जो जादुई दिवा सापडला, तो इतकी वर्षं झाली तरी प्रकाश देतोच आहे.
(sumajo51@gmail.com)