आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sudhir Jogalekar About Vasai Fort, Maharashtra, Rasik, Divya Marathi

ठाकूर बंधूंची बलदान गाथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मराठ्यांच्या युद्धकुशलतेचं वसई मोहीम हे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून इतिहासात नोंदलं गेलं. या विजयी मोहिमेचं 2014 हे 275वं वर्षं. परंतु या मोहिमेतलं काहीसं विस्मृतीत गेलेलं एक लखलखीत सोनेरी पान पार तिकडे पन्नास मैल अंतरावरच्या डोंबिवलीनं, अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात करून दिलं ते 17 मे रोजी!'

वसई हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावरचं ठाणे जिल्ह्यातलं एक इतिहासप्रसिद्ध गाव. आज त्या गावाला तालुक्याचं स्थान म्हणून महत्त्व आलं असलं, तरीही वसई गावाचा प्राचीन इतिहास मात्र म्हणावा तसा अतिमहत्त्वाचा नाही. मात्र इतिहासाला ठाऊक असलेलं त्याच परिसरातलं त्या काळातलं दुसरं महत्त्वाचं गाव होतं ते, सोपारा. आजच्या नालासोपार्‍याचा तलं हे सोपारा. सोपार्‍याचा ज्ञात इतिहास तसा इसवी सनपूर्व तिसर्‍या शतकापासूनचा. दीर्घकाळ या गावाचा वापर व्यापारासाठी होत असे. सागरी मार्गानं जहाजं येत आणि कोको, सुपारी, मसाल्याचे पदार्थ घेऊन जात.

सोपार्‍यावर पहिलं आक्रमण केलं ते गुजरातच्या मुहम्मद बेगडानं; 1459-1511 या कालखंडात. पण त्याआधीची अनेक वर्षं ते राहिलं एक तर शिलाहारांच्या किंवा देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात. 1526मध्ये पोर्तुगीजांनी प्रथमच तिथे आपली वखार घातली आणि वसईसह सभोवतालचा भाग ताब्यात आल्यानंतर 1536मध्ये तिथे भुईकोट किल्ला बांधला. पोर्तुगीजांच्या कालखंडात पुढली दोनशे वर्षं वसई जहाजबांधणीसाठी, व्यापारासाठी प्रसिद्ध राहिलं; पण त्याहीपेक्षा त्या काळात ख्रिस्ती धर्मप्रसाराचं केंद्र म्हणून ते उदयाला आलं.
या धर्मप्रसाराविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रसंगोपात्त कडक धोरण अवलंबलं; पण त्यांच्या नंतरच्या, संभाजी महाराजांच्या किंवा राजाराम महाराजांच्या काळात तेवढं लक्ष दिलं गेलं नाही. हिंदूंच्या धर्मच्छळाच्या बातम्या कानावर आल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी आणि नंतर पेशव्यांनी हा प्रदेशच ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 1739मध्ये चिमाजीअप्पांनी वसई मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केलं आणि 6 फेब्रुवारी 1739ला वर्सोवा-धारावी ही ठाणी काबीज करून वसईला वेढा घातला. चार महिने चाललेल्या या संघर्षाची सांगता 23 मे 1739रोजी झाली. मराठ्यांनी वसईचा किल्ला हस्तगत केला. या विजयी मोहिमेचं 2014 हे 275वं वर्षं. या द्विशतकोत्तर अमृतमहोत्सवाचं स्मरण म्हणून गेला आठवडाभर वसईच्या किल्ल्यात बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग पार पडले, परंतु या मोहिमेतलं काहीसं विस्मृतीत गेलेलं एक लखलखीत सोनेरी पान पार तिकडे पन्नास मैल अंतरावरच्या डोंबिवलीनं, अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात करून दिलं ते 17 मे रोजी!
‘ज्याच्या ताब्यात समुद्र त्याच्या ताब्यात सत्ता’ हे तत्त्व जसं शिवाजी महाराजांनी पुरेपूर ओळखलं होतं, तसंच ते थोरल्या बाजीराव पेशव्यांनीही ओळखलं होतं. वसई किल्ला मोहीम हाती घेत त्यांनी मोठ्या विश्वासानं चिमाजीअप्पांकडे सोपवली होती, ती त्याच उद्देशानं. चिमाजीअप्पा वसईकडे निघाले होते ते 26 नोव्हेंबर 1783 रोजी. वसईत घनघोर संग्राम सुरू झाला; परंतु वसईचा किल्ला अभेद्य आहे, तो जिंकणं कठीण आहे, हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा किल्ला सर करायचा तर सुरुंग पेरल्याशिवाय गत्यंतर नाही, हे त्यांना काही डोंबिवलीकरांनी लक्षात आणून दिलं. आणि नुसतं तेवढ्यावरच न थांबता या कामातले दोन निष्णात तरुण -आन ठाकूर आणि मान ठाकूर- यांची नावंही त्यांनी चिमाजीअप्पांना सुचवली. चिमाजीअप्पांनी या तरुणांशी सल्लामसलत केली, सैन्याला सिद्ध केलं आणि 2 मे 1739च्या मध्यरात्री सुरुंग लावायचा बेत पक्का झाला. त्या रात्री दोघा ठाकूर बंधूंनी खाडीतून पोहत जाऊन बुरुजाचे चिरे फोडून सुरुंगाचं साहित्य आत बसवलं आणि 3 मेच्या पहाटे सुरुंग उडवायचं पक्कं झालं. 20-22 वर्षं वयाचे ठाकूर बंधू. त्यांनी स्वत:ला जपावं, असं चिमाजीअप्पांनी त्यांना बजावलं खरं; परंतु सुरुंग धडधडू लागताच, त्यातच हे दोघेही बंधू हुतात्मा झाले. मराठी सैन्य आत घुसलं, त्यानं रस्ता मोकळा केला, ‘हर हर महादेव’च्या घोषणा देत 12 मेपर्यंत संघर्ष होत राहिला आणि पोर्तुगीजांचा झेंडा उतरवून, तिथे भगवा फडकवून सैन्य परतलं. चिमाजीअप्पांनी आपल्या सरदारांना डोंबिवलीला या ठाकूर बंधूंच्या घरी सांत्वनासाठी पाठवलं, त्यांना वतन-वाडी दिली आणि वसईचा विजय त्यांच्याच हौतात्म्यानं पूर्ण झाल्याबद्दलची कृतज्ञताही व्यक्त केली. जुन्या डोंबिवलीच्या दत्तमंदिरात 17 मेच्या संध्याकाळी आन ठाकूर-मान ठाकूर स्मृती समिती, इतिहास संकलन समिती आणि डोंबिवली शहर इतिहास मंडळानं या डोंबिवलीकर सुपुत्रांच्या बलिदानाचं 275वं वर्ष अभिमानानं साजरं करून त्या लखलखीत सोनेरी पानाची आठवण आजच्या डोंबिवलीला करून दिली..

पुढचं युद्ध सागरी मार्गानंच...
ज्याच्या ताब्यात समुद्र त्याच्या ताब्यात सत्ता, हे सूत्र छत्रपतींनी जाणलं; पण आपण ते विसरलो. आणि ते विसरलो म्हणूनच 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या काळात जशी रायगडच्या समुद्रकिनार्‍यावर स्फोटकं उतरली, तशीच ती 2008च्या दुसर्‍या भीषण हल्ल्यासाठीही उतरली. पण त्या वेळेस अतिरेकी आले, तेही त्याच मार्गानं. वस्तुत: या समुद्रमार्गांची निगराणी करायचं काम असतं, ते कोस्ट गार्डकडे. सागरी टेहळणी करण्यासाठीच्या अनेक उपाययोजनांची आखणी त्यांनी त्यासाठी केलेलीच असते, परंतु भारताच्या सात हजार मैलांहून अधिक लांबीच्या समुद्रकिनार्‍यावरची दीपगृहं या कामी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, छुप्या मार्गानं येणार्‍या घातकी विदेशी शक्तींवर लक्ष ठेवू शकतात, हेच आपण विसरलो. 180हून अधिक संख्येत असलेली दीपगृहं आज उपेक्षेच्या जीवघेण्या गर्तेत सापडली आहेत, याचं भानही आपल्याला राहिलेलं नाही.
(sumajo51@gmail.com)