आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम: मोदींचा आणि नितीशकुमारांचा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींच्या नेतृत्वाखालचा भाजप नको, भाजपच्या नेतृत्वाखालची रालोआ नको, रालोआच्या छुप्या अजेंड्यातलं राममंदिर नको, राममंदिराइतकंच महत्त्वाचं मानलं जाणारं सोरटी सोमनाथाचं मंदिर नको, आणि त्या सोरटी सोमनाथाचा जीर्णोद्धार करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारे सरदार वल्लभभाई पटेलही नकोत, असा सबकुछ नन्नाचा पाढा लावणा-या नितीशकुमारांनी अखेरीस आपलं नन्नाच्या पाढ्यातलं एक पाऊल मागे घेतलं आहे...नितीशकुमारांनी हे पाऊल मागे घेतलं आहे, ते उत्तर बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यात बांधल्या जात असलेल्या विराट राममंदिराच्या निमित्तानं. 2014ची लोकसभा निवडणूक जवळ येते आहे, असं पाहिल्यानंतर, देशभरातील मोदींच्या सभेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेतल्यानंतर आणि मोदींच्या नेतृत्वाखाली चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवणा-या भाजपला मिळालेलं यश पाहिल्यानंतर आता त्या आणि तसल्याच यशाच्या अपेक्षेनं नितीशकुमारांनी थेट रामालाच साकडं घालण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचं वृत्त चर्चेस आॅफ एशियानं कंबोडियातून दिलं आहे...
नितीशकुमार ज्या मंदिरासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावायला निघाले आहेत, ते मंदिर आहे अयोध्येतल्या राममंदिरापेक्षाही मोठं आणि जगातल्या सर्वात प्राचीन अशा कंबोडियातल्या अंकोरवटच्या ऐतिहासिक वारसा मानल्या जाणा-या हिंदू मंदिरालाही मागे टाकणारं... हे मंदिर नितीशकुमार बांधत नसले, त्यांचं धर्मनिरपेक्ष राज्य सरकार त्यामागे उभं राहत नसलं, तरी नितीशकुमारांचा आशीर्वाद त्यामागे उभा आहे, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. हे राममंदिर बांधलं जातं आहे, ते विराट रामायण मंदिर या नावानं. ते बांधण्याची सारी जबाबदारी उचलली आहे ती महावीर मंदिर ट्रस्टनं. ट्रस्टनं बिहार सरकारकडे नव्या पैशाचीही मदत मागितलेली नाही. देशभरच्या भक्तांकडून त्यासाठी पाचशे कोटींचा निधी उभा करण्याचा ट्रस्टचा मानस आहे. द्वारका पीठाचे शंकराचार्य या प्रकल्पामागे उभे आहेत. प्रत्येक हिंदू बांधवाने आपल्या उत्पन्नाचा एक पंचमांश हिस्सा मंदिरासाठी काढून द्यावा, असं आवाहनच त्यांनी केलं आहे. मोतिहारीमधल्या ज्या केशरिया परिसरात हे मंदिर उभारलं जायचं आहे, त्या जागेला प्राचीन महत्त्व आहे. गंगा नदीच्या किना-यावर वसलेल्या याच केशरियात वैशालीच्या राजानं श्रीरामाचं आणि लक्ष्मणाचं वनवासादरम्यान स्वागत केलं होतं. तीच जागा, तेच स्थान, तीच भूमी ट्रस्टनं मंदिरासाठी निवडली आहे. 2012मध्ये या प्रकल्पाचा पहिला आराखडा तयार करण्यात आला. तो कंबोडिया सरकारनं पाहिला आणि थेट अंकोरवट या शब्दाचाच समावेश असलेल्या विराट अंकोरवट राममंदिर या नावाला आक्षेप घेतला. कंबोडिया सरकार नुसत्या आक्षेपावर थांबलं नाही, जगातलं सर्वात मोठं मंदिर मानलं जाणा-या या मंदिरापेक्षा मोठं मंदिर असताच कामा नये, अशीही हरकत त्यांनी घेतली आणि केंद्र सरकारने ती मानली. ट्रस्टनं मंदिराचं नाव बदललं; पण मंदिराच्या आकारात, आराखड्यात फारसा बदल केला नाही. 25 हजार माणसं बसू शकतील, असा गाभारा आजही उभा राहतो आहे आणि मंदिराची उंची 134 मीटर तर लांबी 877 मीटरपर्यंत जाऊन पोहोचली आहे. 2014च्या निवडणुकीपूर्वी मंदिर बांधून पूर्ण होणार नसलं, तरीही प्रभू रामचंद्रांचं स्मरण ठेवणारा नेता आपल्यालाही लाभला आहे, हा विश्वास समस्त बिहारवासीयांच्या मनात उत्पन्न करण्यात नितीशकुमारांना या मंदिराच्या निमित्तानं काही प्रमाणात यश येईल, अशी अपेक्षा जरूर आहे...
मंदिरानंतर पुतळा...
आपल्या नेत्यांचे पुतळे उभारण्यात किंवा त्यांची स्मारकं बनवण्यात भारतीय राजकारण्यांचा हात कुणीही धरणार नाही. याची सुरुवात अर्थातच नेहरू घराण्यानं केली. महात्मा गांधी हे देशाचे पितामह, त्यामुळे त्यांच्या स्मारकांचं आणि पुतळ्यांचं पेव जसं त्यांच्या हत्येनंतर देशभर फुटलं, तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याही बाबतीत घडलं. त्यांच्या अनुयायांनी बाबासाहेबांचे पुतळे जागोजाग उभारले. ते उभारताना ना जागेचं सौंदर्य पाहिलं, ना पुतळ्याची अचूकता; मनात होती ती निव्वळ श्रद्धा...
पण त्यांच्यानंतर पुतळे आणि स्मारकांच्या बाबतीत नेहरू-गांधी घराण्याचा हात कुणीच धरला नाही. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी यांची इतकी स्मारकं, त्यांचे इतके पुतळे, इतक्या सरकारी संस्था-योजना त्यांच्या नावाने उभ्या राहिल्या की गांधी-नेहरू घराण्याव्यतिरिक्त देशात दुसरा नेताच कुणी नाही, असे वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली.
अगदी अलीकडच्या काळात जयललितांनी एम. जी. रामचंद्रन यांचे पुतळे आणि त्यांची स्मारकं यांची झोड उठवली, तर त्याच सुमारास वा थोडे आधी चंद्राबाबू नायडूंनी आपले सासरे आणि आंध्रचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांच्या स्मारकांचे पेव फुटवले. बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राजकीय वारस मानल्या जाणा-या मायावतींनीही अशीच स्मारकांची मोहीम हाती घेतली.
या पार्श्वभूमीवर नितीशकुमार हे स्वयंभू नेते; ते दुस-या कुणाचा पुतळा उभारतील, हे शक्यच नव्हतं. पण मोदींचं सरदार वल्लभभाई पटेलांच्या उत्तुंग पुतळ्याचं स्वप्न मागे टाकायचं असेल, तर त्याहीपेक्षा मोठं स्वप्न पाहणं नितीाशकुमारांना गरजेचं वाटलं. जनमानसात घट्ट रुजलेलं प्रभू श्रीरामांचं विराट मंदिर उभारण्याचं स्वप्न नितीशकुमारांच्या डोक्यात शिरलं, ते त्यातून... सरदारांचा पुतळा काय किंवा राममंदिर काय, दोन्ही प्रकल्प खरे पाहता हजारो नागरिकांचं विस्थापनच घडवणार...
पण आता मायावती-नितीशकुमार आणि मोदींनाही मागं टाकणारं एक भव्य स्वप्न वास्तवात उतरवण्याची तयारी तेलंगणच्या सोनिया समर्थकांनी सुरू केली आहे. आपल्या नेत्याविषयीची श्रद्धा प्रकट करण्यासाठी तेलंगणाच्या काँग्रेसजनांनी सोनिया गांधींचंच मंदिर बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे...
इंदिरा गांधींचं असं मंदिर बांधण्याची कल्पना तेव्हाच्या कॉँग्रेसजनांना कधी शिवली नव्हती, हे एका अर्थानं चांगलंच होतं. कारण 1975च्या अलाहाबाद न्यायालयाच्या निकालानंतर जाहीर झालेल्या आणीबाणीच्या कालखंडात इंदिरा गांधींनी मूलभूत स्वातंत्र्याचा जो संकोच केला, त्या पार्श्वभूमीवर 1977ची जी निवडणूक त्या हरल्या, तसं अजून तरी सोनिया गांधींच्या बाबतीत घडलेलं नाही...
पण देशातील सध्याची परिस्थिती तसं घडणारच नाही, याची खात्री देऊ शकण्याच्या स्थितीत नाही. आगामी लोकसभा निवडणूक सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष हरलाच; तर मंदिरच काय, सोनिया गांधींचे ब्रॉन्झचे पुतळेही काँग्रेसजन उतरवल्याशिवाय राहणार नाहीत. अखेरीस भारताची विद्यमान गरज पुतळ्यांची वा मंदिरं-स्मारकांची नाही; ती आहे शाळा-इस्पितळं-भुकेलेल्याला अन्न-बेघरांना निवारा देण्याची... ती गरज मोदी-नितीशकुमारांच्या ध्यानात आधी यायला हवी.
(ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक घडामोडींचे विश्लेषक)
sumajo52@gmail.com