आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिकमगलूर हा कर्नाटकातला एक संपन्न जिल्हा. कॉफीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला. त्यातलं चिकमगलूर हे गाव मलयगिरी पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेलं. चिक्कमग्गला उरू या शब्दावरून खरं तर चिकमगलूर हे नाव पडलं.

कन्नड भाषेत चिक्कमग्गला उरू म्हणजे धाकट्या मुलीचा गाव. रूक्मांगदाच्या धाकट्या मुलीबरोबर हे गाव म्हणे, हुंड्याच्या रूपात दिलं गेलं. याच शहराचा एक भाग हिरेमगलूर म्हणून ओळखला जाणारा, तो रूक्मांगदाच्या मोठ्या मुलीबरोबर हुंड्याच्या रूपात दिला गेला. सध्या हे शहर ओळखलं जातं, ते मात्र ‘सीसीडी’ किंवा ‘कॅफे कॉफी डे’ या तरुणाईच्या ब्रॅण्डसाठी.
खरं तर ‘कॅफे कॉफी डे’ ही आहे, एक इंडियन कॅफे साखळी. कॉफी डे ग्लोबल लिमिटेडच्या मालकीची आणि १९९६मध्ये स्थापन झालेली. कॉफी डे ग्लोबल लिमिटेडचे जवळपास १२ हजार एकर जमिनीवर कॉफीचे मळे आहेत. अरेबिका नावाची कॉफीची जात तिथे पिकवली जाते. ती अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये प्रचंड प्रमाणावर निर्यातही होते. कॉफी डे ग्लोबल लिमिटेडचं कॉफीचं उत्पादन किरकोळीत विकण्यासाठी म्हणून कॅफे कॉफी डेची सुरुवात झाली. मात्र कॅफे कॉफी डेचं आजच्यासारखं दिसणारं आऊटलेट सुरू झालं, ते ११ जुलै १९९६ रोजी, बंगळूरू शहरातल्या ब्रिगेड रोडवर. कॅफे कॉफी डेमधल्या वेगवेगळ्या चवींची कॉफी तरुणांना आवडली आणि सीसीडीचं पेवच देशभर फुटलं. पुढल्या १५ वर्षांत एक हजाराहून अधिक ‘सीसीडी’ सेंटर्स देशभर सुरू झाली.

कॅफे कॉफी डे स्थापन केलं, ते व्ही. जी. सिद्धार्थ नावाच्या तरुणानं. मंगलोर विद्यापीठातून इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स केल्यानंतर हा सिद्धार्थ मुंबईत येऊन जे. एम. सिक्युरिटीजमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून दाखल झाला. दोन वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर सिद्धार्थ बंगळुरूत परतला. तुझ्या आवडीचा कसलाही व्यवसाय कर, असं सांगून वडिलांनी त्याला पैसे देऊ केले. सिद्धार्थनं ३० हजार रुपये भरून स्टॉक मार्केट कार्ड घेतलं आणि सिवन सिक्युरिटीज नावानं गुंतवणूक व्यवसाय सुरू केला. ही घटना १९८४ सालातली.

१९९३मध्ये सिद्धार्थनं अमालगमेटेड बीन कंपनी नावानं कॉफी ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला. परंतु १९८४मध्येच त्याने कॉफीची लागवड सुरू केली होती. आज कॉफी बिया आणि कॉफी पावडरची सर्वाधिक निर्यात करणारा व्यावसायिक, म्हणून तो ओळखला जातो. अमालगमेटेड बीन कंपनीची स्थापना झाली, तेव्हाची उलाढाल होती ६ कोटी, आणि आज तिची उलाढाल आहे २५ अब्ज! १९९६मध्ये सिद्धार्थनं कॅफे कॉफी डे नावाचं पहिलं सायबर कॅफे सुरू केलं. आज ही संख्या १५००च्या पुढे गेली आहे. २९ राज्यांत आणि २००हून अधिक शहरांमध्ये कॅफे कॉफी डेचं जाळं पसरलं आहे. कॅफे कॉफी डे आता भारतापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. झेक रिपब्लिकमधली कॅफे एम्पोरिओ सीसीडीनं खरेदी केली आहे. त्यांचे ११ कॅफे झेक रिपब्लिकमध्ये आहेत. त्याशिवाय ऑस्ट्रिया, दुबई, मलेशिया, कैरोमध्येही कॅफे कॉफी डेची आऊटलेट‌्स निघाली आहेत.
कॅफे कॉफी डेनं आणखी अनेक क्षेत्रांत पावलं रोवली आहेत. त्यात कॉफी बीन आणि पावडर आऊटलेट‌्सची फ्रेश एन ग्राऊंड नावाची ४५० दुकानांची एक साखळी आहे. बंगळुरू, चेन्नई, मुंबई आणि नवी दिल्लीत कॉफी डे स्क्वेअर हा हाय लेव्हल कॉफी बार सुरू करण्यात आला आहे. याशिवाय ९०० कॉफी डे किऑस्क, १४ हजार कॉफी डे बिव्हरेजेसची व्हेंडिंग मशिन्स, कॉफी डे एक्स्पोर्ट‌्स, पॅकेज्ड कॉफी डिव्हिजन ही जलदगती ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री करणारी कॉफी डे परफेक्ट साखळी, कॉफी डे व्हेंडिंग मशिन्सचं उत्पादन करणारा कॉफी डे बी-टु-सी प्लॅँट असं कितीतरी.

सिद्धार्थनं एवढ्यावरच समाधान मानलेलं नाही. तीनेक हजार एकर जमिनीवर सिद्धार्थनं केळ्यांची लागवड केली आहे, आणि केळी निर्यात करण्याचीही त्याची योजना आहे. ‘द डार्क फॉरेस्ट’ फर्निचर कंपनी नावाची फर्निचर बनवणारी कंपनीही सिद्धार्थनं लॉँच केली आहे. चिकमगलूरमध्येच सहा लाख चौरस फूट जागेत, हे डिव्हिजन सुरू होतं आहे. कॉफी इस्टेटमधलीच कॉफी प्लॅन्टेशन्स तोडून त्यापासून फर्निचर बनवण्याचा जसा त्याचा विचार आहे, तसंच अ‍ॅमेझॉनच्या खोऱ्यातलं गियानाच्या रेनफॉरेस्टमधलं लाकूड मिळवायचीही त्याची योजना आहे. अ‍ॅमेझॉनच्या फॉरेस्टलॅण्डमधली १.८५ दशलक्ष हेक्टर जमीन सिद्धार्थनं तीस वर्षांच्या लीजवर घेतली आहे. तिथल्या उच्च दर्जाच्या लाकडाचे ओंडके कापून जहाजावर चढवायचे, जॉर्जटाऊनमधून निघून ते जहाज मंगलोरच्या बंदराला लावायचं, तिथून ते रस्त्यानं चिकमगलूरच्या फॅक्टरीत पोहोचवायचं. ‘अ‍ॅमेझॉन’च्या त्या हार्डवूड व्हरायटीमध्ये ग्रीनहार्ट, पर्पलहार्ट, वल्लाबा आणि बुलेटवूड जातीचं लाकूड असणार आहे. त्या लाकडापोटी केवढी मोठी रक्कम सिद्धार्थ गियाना सरकारला मोजेल, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. गियाना सरकारनं सिद्धार्थला अट घातली आहे, ती दर हेक्टर जागेतील अवघी चारच झाडं एका वेळी तोडण्याची. त्यातही जेवढी झाडं तोडली जातील, तेवढीच पुन्हा लावण्याचं बंधनही सिद्धार्थच्या कंपनीवर घालण्यात आलं आहेच.

सिद्धार्थ आता केवळ त्याच्याच मालकीच्या उद्योगांमध्ये संचालक पदांवर नाही, तो जीटीव्ही आणि वे टू वेल्थबरोबरच माइंडट्री, लिक्विड क्रिस्टल, इत्तियम नावाच्या आणखीही काही कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहे. फूड ब्रॅण्ड उभा करणं आणि तोही स्टारबक्स, मॅकडोनाल्ड‌्स, डंकिन डोनटसारख्या जागतिक ब्रॅण्ड‌्सना टक्कर देत उभा करणं, ही खायची गोष्ट नाहीच. त्यासाठी हिंमतही हवी आणि पैशाचं पाठबळही. सिद्धार्थकडे दोन्ही होतं आणि आहेही. कॉफीचे मळे हा त्याच्या खानदानाचाच व्यवसाय आहे, आणि नवं काही घडवण्याची जिद्द मनात धरूनच ८०च्या दशकात सिद्धार्थनं स्वत:चे व्यवसाय उभे केले आहेत. परंतु त्याहीपलीकडे एक गोष्ट त्याच्याकडे आहेच. माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची मुलगी ही सिद्धार्थची पत्नी आहे. राजकारण्यांचे जावई आपापल्या सासऱ्यांंना वा सासूला डोईजड होत असताना सिद्धार्थ मात्र सासऱ्याच्या गौरवात भरच घालतो आहे, घालत राहणार आहे.
(sumajo51@gmail.com)