आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुनं ते सोनं

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमल्याचं आकर्षण ब्रिटिशांना होतंच, त्याचमुळे 1830च्या सुमारासच शिमला हे ब्रिटिशांचं महत्त्वाचं केंद्र होऊ लागलं होतं. 1864मध्ये तर ते ब्रिटिशांचं हिवाळी राजधानीचं ठिकाण बनलं आणि ब्रिटिश सैन्याधिकार्‍यांनी तर ते लष्कराचं मुख्य केंद्रच बनवून टाकलं. ब्रिटिश अधिकार्‍यांचा शिमल्यापर्यंतचा सारा प्रवास बैलगाड्यांतून किंवा घोडागाडीतून पार पडत असे, असा तो काळ होता. पण 1853मध्ये मुंबईत रेल्वे अवतरली आणि देशभर अनेक ठिकाणी रेल्वेचं जाळं विणलं जाऊ लागलं. 1891मध्ये दिल्ली-काल्का रेल्वेमार्ग सुरू झाला आणि काल्कापासून शिमल्यापर्यंतची रेल्वेलाइन टाकली गेली, 1898 मध्ये. 95-96 किलोमीटर लांबीचा तो लोहमार्ग 1903मध्ये बांधून पूर्ण झाला आणि तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड कर्झनच्या हस्ते त्याचं रीतसर उद्घाटनही झालं. काळ ब्रिटिशांचा असला तरी काय झालं, 86 लाख 78 हजारांचा तो प्रकल्प, अंदाजित खर्चाच्या कितीतरी पुढे गेला आणि तो पुरा झाला, तेव्हा त्याचा खर्च जाऊन पोहोचला तो दोन कोटींच्या जवळपास. काल्का-शिमला रेल्वेमार्ग बांधण्यात आला तो ब्रिटिशांची शीतकालीन राजधानी उर्वरित देशाच्या रेल्वेमार्गाशी जोडली जावी आणि देशभरच्या तमाम ब्रिटिश अधिकार्‍यांना शिमल्याला लवकरात लवकर पोहोचता यावं, यासाठी. आज शिमला ही हिमाचल प्रदेशाची राजधानी बनली आहे, तर काल्का गेलं आहे हरियाणात. मुळातच दोन हजार फूट उंचीवर असलेल्या काल्कापासून या गाडीचा प्रवास सुरू होतो आणि तो संपतो तो सात हजार फूट उंचीवर असलेल्या शिमल्यामध्ये! 95 किलोमीटरच्या या अंतरात आहेत एकूण 20 स्टेशन्स. ही सगळी स्टेशन्स बांधण्यात आली आहेत, एक तर मोठ्या पुलांच्या शेजारी किंवा मोठ्या बोगद्यांच्या शेजारी. त्या पुलांचं वा बोगद्यांचं बांधकाम करणारे कामगार तिथे राहत.

आज ती गरजच उरलेली नसल्यानं यातली काही स्टेशन्स आता बंद करण्यात आली आहेत. या मार्गावर एकूण 107 बोगदे खोदण्यात आले, 1930 मध्ये त्यातले चार बंद करण्यात आले आणि 103 बोगदेच उरले. 2006 मध्ये आणखी एक बोगदा बंद करण्यात आला आणि आता ती संख्या झाली आहे 102. पण शेवटचा शिमल्याजवळचा बोगदा मात्र अजूनही 103 क्रमांकाचा बोगदा म्हणूनच ओळखला जातो आणि त्याचा शिमलावासीयांना अभिमानही आहे. बारोग हे या मार्गावरचं एक स्टेशन. तिथल्या बोगद्याचं बांधकाम ज्याच्या देखरेखीखाली झालं, तो होता ब्रिटिश अभियंता बारोग. त्यानं दोन्ही बाजूंनी बोगदा खणायला सुरुवात केली; पण खोदताना दोन टोकं एकत्र आलीच नाहीत. बारोगला एक रुपया दंड ठोठावला गेला. आपलं अपयश बारोगला पचवता आलं नाही आणि त्यानं त्या अर्धवट खणलेल्या बोगद्यातच गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. पुढे भालकू नावाच्या एका साधूनं चूक दाखवली, मार्ग बदलायला भाग पाडलं आणि मुख्य अभियंता र्हलिंग्टनच्या नेतृत्वाखाली त्या बोगद्याचं काम पूर्ण झालं. 95 किलोमीटरच्या या मार्गावर तब्बल 864 लहानमोठे पूल आहेत, हे ध्यानात घेतलं की ते काम किती अवघड होतं, याची कल्पना येऊ शकेल. याच मार्गावर असलेली वळणंही तब्बल 900हून अधिक आहेत आणि त्यातलं एक तर 48 अंशात वळावं लागेल, इतकं अवघड आहे. केसी 520 क्रमांकाचं नॅरो गेजवर धावू शकणारं इंजिन गेल्या आठवड्यात तब्बल 109 वर्षांनी बाहेर काढण्यात आलं. अमृतसरमध्ये त्यावर प्राथमिक काम करण्यात आलं आणि ते तंदुरुस्त झाल्याची खात्री पटताच शिमला ते काथलीघाट या 22 किलोमीटरच्या मार्गावर ते दौडवण्यात आलं. अमेरिकेतून आलेल्या गुलहौशी 12 प्रवाशांनी 96 हजार रुपये मोजून तो प्रवास केला आणि एका ऐतिहासिक सफरीचा आनंद लुटला.

प्रवाशांविना, गाड्यांविना ओसाड बनलेलं वझीर मॅन्शन रेल्वेस्टेशन...
रेल्वेचा ब्रिटिशकालीन इतिहास भारतात अशा पद्धतीनं जपला जात असताना तिकडे पाकिस्तानात मात्र ब्रिटिशांनी ज्या म. अली जिनांना पुढे करून भारताची फाळणी घडवून आणली आणि पाकिस्तानची निर्मिती करवली, त्या कायदे आझमच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेलं वझीर मॅन्शन रेल्वेस्टेशन आज ओसाड बनलं आहे. गेल्या तीन वर्षांत त्या स्टेशनवर पाकिस्तान रेल्वेची, म्हणजे कराची सर्क्युलर रेल्वेची, एकही गाडी थांबलेली नाही. इतकंच नव्हे, तर त्या मार्गावरून एकही गाडी धावलेलीदेखील नाही. या मार्गावरून शेवटची गाडी धावली, ती नोव्हेंबर 2011 मध्ये. ती शेवटची अशासाठी ठरली, कारण नोव्हेंबर 2011 मध्येच कराची सर्क्युलर रेल्वे बंद झाली. त्यानंतर कराची सर्क्युलर रेल्वेचं ओझं आलं पाकिस्तान रेल्वेच्या बोडक्यावर. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तान रेल्वेला ते पेलणारं नव्हतंच. त्यामुळेच त्या मार्गावरून धावणारी गाडी बंद झाली, आणि त्या स्थानकावर काम करणार्‍या 15 कर्मचार्‍यांपैकी 10 कर्मचार्‍यांना इतरत्र सामावून घेण्यात आलं. स्टेशनमास्तर, सिग्नलमन, लाइनमन, रेल्वे ट्रॅक इन्स्पेक्टर आणि एक गार्ड एवढेच काय ते आता वझीर मॅन्शन रेल्वेस्टेशनच्या सेवेत उरले आहेत. कराची सर्क्युलर रेल्वेचं रूपांतर आता झालं आहे कराची अर्बन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये आणि हे कर्मचारी मात्र अजूनही सेवेत आहेत, ते पाकिस्तान रेल्वेच्या. त्यांना पगार मिळतो आहे, पाकिस्तान रेल्वेकडून. काहीही काम न करता. खालिद हे स्टेशनमास्तर. रेल्वेच्या हद्दीत झालेलं अतिक्रमण, लोहमार्गांचा कचरा डेपोसारखा होत असलेला वापर यामुळे परिस्थिती बिकट बनली आहे, हे खरंच; परंतु स्टेशनाची मालमत्ताही परस्पर भाड्यानं देऊन टाकण्यात आली असल्यानं आणि त्यातून येणारा पैसा अधिकार्‍यांच्या खिशात जात असल्यानं ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’चा मामला मात्र तिथे सुरू आहे.