१८८०नंतरच्या कालखंडात पूर्वांचलाचा सध्या निरोप दिला जाणारा लोहमार्ग ब्रिटिशांनी बांधला होता. त्यातला दिब्रू-सादिया लोहमार्ग १८८२ मधला, तर आसाम-बंगाल रेल्वेवरचा बदरपूर-लुमडिंग लोहमार्ग १८९२ मधला. १९व्या शतकात ब्रिटिश अभियंत्यांनी हे लोहमार्ग बांधले, ते पूर्व भारतातून आणि अफगाणिस्तानातून आणलेल्या मजुरांच्या जिवावर. हे बांधकाम सुरू असताना वाघ-सिंह, हत्ती-गेंडे यांसारखे रानटी सोबती तर होतेच, परंतु डासही प्राणघातक ठरत होते, असा तो काळ. दिमासा-झेमी या इथल्या आदिवासी जमाती. रेल्वेमार्गाचं इथे येणं, हे सोय वाटण्यापेक्षाही
आपल्या खाजगी जीवनावरचं अतिक्रमण वाटावं आणि त्या विरोधात त्यांनी रेल्वे मजुरांशी लढावं, असेच ते क्षण. अरूपकुमार दत्त नावाच्या अभ्यासकानं ‘इंडियन रेल्वेज : द फायनल फ्रंटियर’ नावाचा या रेल्वेचा मोठा रंजक इतिहास २००२मध्ये लिहून हातावेगळा केला, त्यात हे सारं थरारक वर्णन आलं आहे. लुमडिंग ते हाफलॉँग हिल हे ११६ किलोमीटर एवढंच अंतर. परंतु ते कापायला या मीटर गेज रेल्वेला सहा तास लागत. काळाच्या ओघात जे बदल अपरिहार्य ठरतात, त्यातलाच एक बदल सध्या या लोहमार्गाच्या जीवनात सुरू आहे. हा संपूर्ण मार्ग आता मीटर गेजवरून ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत होतो आहे. परवाच्या
१ ऑक्टोबरला २२१ किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण रेल्वेमार्ग सहा महिन्यांसाठी बंद करण्यात आला.
तसंही तो बंद होण्याआधीपासूनच नव्या ब्रॉडगेज लोहमार्गाची उभारणी सुरू झाली होती. या मार्गासाठीचे ४१९ नवे पूल आणि लहानमोठे बोगदे केव्हाच बांधून तयार झाले होते. त्यातला एक बोगदा तर तब्बल तीन किलोमीटर लांबीचा आणि दुसरा दीड किलोमीटर लांबीचा. डोयांगचा पूल तर जुना कायम ठेवून नव्यानं बांधला. ६१ मीटर लांब आणि ५४ मीटर उंच असा हा पूल, आणि तोही अवकाशाच्या दिशेनं झेप घेणारा. जुने पूल आणि बोगदे तसे अरुंद होते. त्यावरची वाहतूक सुरू ठेवून नव्या लोहमार्गाची उभारणी करणं शक्यच नव्हतं. आर. एस. जिंगर हे नॉर्थ-इस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य अभियंता. कोकण रेल्वे उभी करताना जे बोगद्यांचं आणि पुलांचं दिव्य ई. श्रीधरन यांना पार पाडावं लागलं, तसं वा त्याच्याहीपेक्षा कितीतरी पट अधिक असं दिव्य जिंगर यांना पार पाडावं लागलं. अतिरेक्यांचा विरोध आणि रानटी श्वापदांचा धोका हे त्यामागचं कारण.
आसाममधलं एकमेव हिलस्टेशन म्हणून ओळखलं जाणारं, हाफलॉँग हे रेल्वे स्थानक तर १११ वर्षं इतकं जुनं. ३० सप्टेंबरच्या सोमवारी ०५६९७ क्रमांकाची हिल क्वीन एक्स्प्रेस या मार्गावरून शेवटची धावली आणि जुने ३७ बोगदे तसेच ५८६ पूल कायमचेच काळाच्या पडद्याआड जायला सुरुवात झाली. हाफलाँगचं रेल्वे स्थानक आता ऐतिहासिक वारसा ठरावं, असा प्रयत्न सुरू झाला आहे.
स्वागत नव्या राजधानी एक्स्प्रेसचं...
ऑक्टोबरनं एका लोहमार्गाला निरोप दिला, तर नोव्हेंबर प्रतीक्षेत आहे, एका नव्यानं पूर्ण झालेल्या लोहमार्गावरून नव्यानंच धावणा-या राजधानी एक्स्प्रेसच्या. आसाममधलं हरमुती आणि अरुणाचलमधलं नहरलागून यांच्या दरम्यानचा ३३ किलोमीटर लांबीचा लोहमार्ग नुकताच पूर्ण झाला आहे. नहरलागून हे गुवाहाटीपासून अवघं १५ किलोमीटर अंतरावर असणारं गाव. येत्या नोव्हेंबरपासून नहरलागून ते नवी दिल्ली आणि गुवाहाटी ते नवी दिल्ली अशा दोन संपूर्णपणे आरक्षित अशा गाड्या धावायच्या आहेत, त्यातली एक आहे अर्थातच ‘राजधानी एक्स्प्रेस’. अरुणाचल प्रदेशात प्रवेश करताना इनर लाइन परमिट आवश्यक धरलं जातं. या दोन्ही गाड्यांनी प्रवास करणा-या आरक्षित तिकीटधारकांची व्यक्तिगत खातरजमा तिकीट काढतानाच करून घेतली जाणार असल्याने आता या तिकीटधारकांना वेगळं इनरलाइन परमिट काढायची गरजच राहणार नाही. प्रश्न उरेल, तो अनारक्षित तिकीटधारकांचा. नहरलागून व गुवाहाटी स्थानकांवर एक प्रतीक्षा कक्ष सुरू होत असून त्या कक्षातच प्रवाशांच्या अधिकृततेची खातरजमा करून घेऊन, त्यांना इनरलाइन परमिट दिलं जाणार आहे. परंतु विरोधी पक्ष याला तयार होतील, असं चित्र आज तरी दिसत नाही. १८७३चा बंगाल इस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन आणि १८९६चा चीन हिल रेग्युलेशन हे कायदे आजही अस्तित्वात आहेतच. अरुणाचलाच्या मूलवासींचं शांत जिणं कायम राखण्यासाठी सरकारला या कायद्यांची बूज राखावीच लागेल.
निरोप पहिल्या महिला मुख्य सचिवाला...
नागालॅँडच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बानुओ झमीर गेल्या मंगळवारी निवृत्त झाल्या. अपंगांच्या शिक्षणासाठी भरीव कामगिरी करणारा प्रशासनिक यंत्रणेतला एक महत्त्वाचा दुवा दूर झाला. सनदी अधिकारी म्हणून तब्बल ३७ वर्षं झमीर यांनी केलेल्या नागालॅँडच्या सेवेचा यथोचित गौरव अनेक अधिका-यांनी या वेळी भाषणांद्वारे केला. झमीर यांचं वैशिष्ट्य किंवा वेगळेपण असं की, नागालॅँडच्या मुख्य सचिवपदाची धुरा या आधी त्यांचे पती अलेमतेमशी झमीर यांनी वाहिली, आणि वरिष्ठतेनुसार आपल्या मागोमाग असलेल्या आपल्या पत्नीला मुख्य सचिव होता यावं, म्हणून अलेमतेमशींनी मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारून बानुओंचा मार्ग सुकर करून दिला. एकाच राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा सांभाळणारं झमीर हे बहुधा सनदी अधिका-यांमधलं पहिलं आणि एकमेव जोडपं ठरावं. बानुओंनीही तब्बल ३७ वर्षं नागालॅँडची सेवा केली.
स्वागत आमुर फाल्कनचं...
वोखा हा नागालॅँडमधला जिल्हा सध्या नव्या पाहुण्यांच्या आगमनानं गजबजून गेला आहे. हे पाहुणे आहेत मंगोलियातून आलेले आणि सैबेरिया, उत्तर चीन, जपानमार्गे वोखात येऊन पुढल्या महिन्या-दोन महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दिशेनं निघून जाणारे.या पाहुण्यांना अरबी महासागर ओलांडून भारतात यावं लागतं, ते तब्बल तीन-साडेतीन दिवस क्षणाचीही विश्रांती न घेता. २०१३मध्ये त्या उड्डाणावरची एक चित्रफीत उपग्रहाच्या माध्यमातनं चित्रित करण्यात आली, आणि सारं जग तिकडे आकर्षित झालं. हे नवे पाहुणे म्हणजेच ससाण्याच्या जातीतले आमुर फाल्कन. भारतात ते येतात, ते साडेचार ते पाच लाख एवढ्या संख्येत. गेली अनेक वर्षं त्यांची सरसहा कत्तल केली जात असे. परंतु जसजशी जागृती होत गेली, २०१३ची दुर्मीळ चित्रफीत लोकांनी पाहिली, तशी ही कत्तल थांबली. बानो हरालू नावाचे एक पत्रकार आणि नागालॅँड वाइल्डलाइफ अॅँड बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व्हेशन ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त. त्यांचे प्रयत्न ही कत्तल थांबविण्यासाठी उपयुक्त ठरले आणि रॉयल बॅँक ऑफ स्कॉटलंडचं अर्थ हीरोज अॅवॉर्ड त्यांना घोषित झालं.
sumajo51@gmail.com