आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरहद्दीचे गौरवगीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उगवत्या सूर्याचा पहिला किरण ज्या भूमीला स्पर्श करतो, ती उगवतीची भूमी म्हणजेच अरुणाचल. पूर्वोत्तर भारतातलं सीमेलगतचं एक छोटेखानी राज्य. लोकसंख्या जेमतेम 14 लाख. क्षेत्रफळाशी लोकसंख्येचं प्रमाण मांडायचंच तर दर किलोमीटरला 17 इतकंसुद्धा पडणार नाही. 1962चं भारत-चीन युद्ध प्रत्यक्ष छेडलं गेलं, ते याच भूमीत 20 ऑक्टोबरला. 2012मध्येच तसं पाहता या युद्धाला 50 वर्षं पूर्ण झाली. 33 दिवसांच्या या लढाईपर्वात भारतानं भूमीही गमावली आणि तीन हजारांहून अधिक जवानही गमावले.
याच युद्धातलं एक रोमांचक पर्व लढलं गेलं, ते नूरानांगमध्ये. युद्ध संपल्यानंतर त्या जागेला नाव दिलं गेलं ते जसवंतगढ असं. नूरानांग हे 14 हजार फूट उंचीवरचं सेला पास जवळचं स्थान. युद्धदृष्टिकोनातून
अतिशय उपयुक्त ठरणारी अशी ती जागा; भारतीय सैनिकांनी अपु-या मनुष्यबळात, अपु-या शस्त्रसज्जतेत आणि अपु-या संपर्क यंत्रणेत लढलेली आणि गाजवलेली अशी तिथली एकाकी लढाई. 17 ते 19 नोव्हेंबरदरम्यान लढली गेलेली.
जसवंतसिंह त्या तुकडीतला एक साधासुधा रायफलमन. 4 गढवाल रायफल हे त्याचं युनिट. तीन दिवसांतल्या त्या भीमपराक्रमात महत्त्वाचा वाटा होता, तो जसवंतसिंहाचा. उपाशीपोटीच नव्हे, तर तहानल्यापोटी राहून जसवंतसिंहानं तब्बल 72 तास चिनी सैन्याला रोखून धरलं. शेवटी त्याच्याकडील जुन्यापुराण्या भंगार बंदुकीच्या गोळ्या संपल्या. चिनी सैनिकांनी त्याला घेरलं, ताब्यात घेतलं आणि एका झाडाला टांगून जिवंत फाशी दिलं. जसवंतसिंह जिथे मेला, ती जागा म्हणजेच जसवंतगढ...
युद्ध संपल्यासंपल्या
डॉ. भूपेन हजारिका पत्रकार बनून तवांगला गेले होते. तिथून पुढे जवळच असलेल्या सेला पासच्या रस्त्यावरच्या जसवंतगढला त्यांनी भेट दिली होती आणि अत्यंत विव्हळ होऊन ते बोमदिलाला परतले होते. त्यांचं असमिया भाषेतलं ‘कतो जोवानोर मृत्यू होल’, हे गीत त्यानंतर लगेचच 16 डिसेंबरला जन्माला आलं होतं. आणि जसवंतगढच्या लढाईचं वर्णन ऐकूनच कवी प्रदीप यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे अजरामर गीत रचलं होतं...
2012 हे या दोन्ही गीतांचंदेखील सुवर्णमहोत्सवी वर्ष. संस्कार भारतीनं हा योग साधून एका स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पूर्वांचलातल्या सर्व राज्यांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली होती. ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गीत सादर करण्याचीच ती स्पर्धा. आठही राज्यांत जिल्हा स्तरापासून ही स्पर्धा घेण्यात आली आणि अंतिम 23 जणांना 22 ते 24 नोव्हेंबर 2013 दरम्यान पार पडलेल्या ‘सरहद को स्वरांजली’ कार्यक्रमात ते गीत सादर करण्याची संधी मिळाली. आसामच्या श्रुती बुजरबरूआ तसंच मीनाक्षी देवींनी प्रथम तसेच द्वितीय क्रमांक पटकावला, तर तृतीय क्रमांकाचा विजेता ठरला मणिपूरचा मार्टिन...
दुस-या दिवसाचा, 23 नोव्हेंबरचा कार्यक्रम होता सलग 24 तासांचा. लय-ताल-सुरांनी नटलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात झाली, ती पूर्वांचलातील जनजातींनी आपापल्या देव-देवतांच्या केलेल्या पूजेनं. बिठूरमध्ये पार पडलेल्या नमन 1857 कार्यक्रमातील अभिषिक्त माती आणि अरुणाचलाच्या सीमावर्ती भागातील युद्धभूमीवरची माती एकत्र करून शहिदांच्या वारसांना दिल्या जाणा-या स्मृतिचिन्हांवर त्या मातीनं अभिषेक करण्यात आला.
23 नोव्हेंबरला पहाटे 5.41 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम 24 नोव्हेंबरला पहाटे 5.42ला सूर्योदयाच्या साक्षीनंच संपला...
24 नोव्हेंबरला होता, स्वरांजलीचा शेवटचा दिवस. इटानगरच्या गांधी पार्कमध्ये भरलेल्या त्या सोहळ्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. जसवंतसिंहांची आई लीला देवी या कार्यक्रमाला खास उत्तराखंडातून आली होती.
92 वर्षीय लीला देवींची उपस्थितीच शहीद कुटुंबीयांच्या नातेवाइकांना प्रेरणा देणारी होती. पासीघाटच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या 450 विद्यार्थी-विद्याथिनींनी 1962च्या युद्धाच्या स्मृती जागवणारं एक नृत्यनाट्य सादर केलं आणि सारा श्रोतृवृंद भावव्याकुळ होऊन गेला. त्या नृत्यनाट्याचा आणि त्रिदिवसीय स्वरांजली कार्यक्रमाचा शेवटही झाला, तो हजारो कंठातून गायल्या गेलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या गीतानं. नाबम तुकी हे अरुणाचलचे मुख्यमंत्री. ते आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सहकारी या तिन्ही दिवसांच्या सोहळ्याला उपस्थित होते. 62च्या युद्धातील शहीद जवानांचं स्मारक इटानगरमध्येच उभं करण्याचं आश्वासन नाबम तुकींनी दिलं आणि आठवडाभरातच अरुणाचलच्या मंत्रिमंडळानं त्यावर शिक्कामोर्तबही केलं...