आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sudhir Joglekar Article About Cherrapunji, Divya Marathi

आधी हाताला चटके...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेघालय पूर्वांचलाचं स्कॉटलंड. उगवत्या सूर्याची पहिली किरणं ज्या भूमीला सर्वप्रथम स्पर्श करतात, त्या सप्तभगिनींच्या प्रदेशातला हा एक प्रदेश. खोल दर्‍या, घनदाट जंगल आणि बर्फाच्छादित डोंगरांचा मिळून बनलेला. शाळेत असताना ‘चेरापुंजी’ हे नाव आपल्यापैकी प्रत्येकानं वाचलेलं असायचं. सर्वाधिक पाऊस पडणारं देशातलं एकमेव ठिकाण, असं त्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं असायचं. मेघांचं आलय म्हणजे मेघालय, अशी त्या भूप्रदेशाची एक व्याख्याही केली जायची. ती स्थिती आता मात्र राहिलेली नाही. त्याला असलेली कारणं अनेक. मोठ्या प्रमाणावर होणारी बेकायदा जंगलतोड हे त्यापैकी एक. मेघालयाची सीमारेषा सुरक्षित नाही. बांगलादेशातून होणारी प्रचंड घुसखोरी हा इथला चिंतेचा विषय खराच; परंतु अंतर्गत दंडेलशाही आणि रात्रीचे पडणारे दरोडे हाही डोकेदुखीचाच विषय. या आणि अशा अनेक कारणांमुळे इथलं जीवन अतिशय हलाखीचं. अंधारात चाचपडवणारं...

मेघालयाचे भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही पडणारे तीन विभाग. पूर्वेला जयंतिया हिल्स, मध्य भागात खासी हिल्स आणि पश्चिमेला गारो हिल्स. या विभागांत राहणारे ओळखले जातात तेही जयंतिया, खासी आणि गारो म्हणूनच. तिघांच्या भाषाही वेगळ्या. पण तिघांच्याही भाळी लिहिलेलं ललाटलिखित एकच.

इथली जीवनपद्धती मातृसत्ताक. पण सत्ताक या शब्दाचा वास्तवार्थ वेगळाच. संसारही स्त्रीनंच चालवायचा, घर-संसार चालवण्यासाठी पैसाही स्त्रीनंच कमवून आणायचा, आणि आशा-अपेक्षांचे किरण मुलांच्या वाट्याला यावेत म्हणून अडथळ्यांशी झुंज द्यायची, तीही स्त्रीनेच. संकटांशी करायच्या मुकाबल्याची यादी इथेच संपत नाही. गावातल्या गुन्हेगारीविरोधात, मुलींच्या छेडछाडीच्या विरोधात, बेधडक होऊन हातात काठी-लाठी घ्यायची तीही स्त्रीनेच, आणि उन्हातान्हात किंवा रात्रीच्या गर्द अंधारात जागं राहून जंगलांचं रक्षण करायचं तेही इथल्या स्त्रीनंच. आयुष्य पणाला लावून केलं जाणारं हे काम प्रत्यक्ष पाहावं, कॅमेर्‍यात टिपावं, या उद्देशानं ठाण्याच्या फोटो सर्कल सोसायटीनं तीन महिला छायाचित्रकारांचा एक चमूच पूर्वांचलात पाठवला. त्या चमूनं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि मणिपूर या चार राज्यांचा विस्तृत दौरा केला, महिला जीवनाचं जवळून निरीक्षण केलं, विविध प्रकारे कार्यरत असलेल्या धाडसी, सेवाभावी महिला कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या, आणि त्या सर्वावर आधारलेलं एक छायाचित्र-प्रदर्शन ठाण्यात भरवलं. त्या प्रदर्शनाचं नावच होतं ‘विद्युल्लता’. तसं पाहिल्यास विद्युल्लताचं हे तिसरं वर्ष. महिला दिनाच्या निमित्तानं प्रतिवर्षी स्त्री-जीवनाला भिडणारा एखादा विषय घ्यायचा आणि त्याभोवती छायांकन करायचं, हे या उपक्रमाचं स्वरूप.

या चमूतलीच एक छायाचित्रकार होती डोंबिवलीची संघमित्रा बेंडखळे. कविवर्य बाळ बेंडखळ्यांची मुलगी. बिनधास्त आणि बेधडक जीवन जगणं हे बेंडखळे कुटुंबाचंच वैशिष्ट्य. ‘भुयार’ हे त्यांचं अलीकडचं आत्मचरित्रपर लेखन. अपरिचित भुयारं धुंडाळायची, आतमध्ये शिरल्यानंतर कसल्या आणि कुठल्या अनवस्था प्रसंगांना सामोरं जावं लागेल, याची इतकीशीही फिकीर करायची नाही, आणि जे काही अनुभवाला येईल ते नजरेनं टिपत, कॅमेर्‍यानं बंदिस्त करत जगासमोर ठेवायचं, हे त्यांचं वेगळेपणच. संघमित्रानं तेच केलं. याच प्रवासादरम्यान तिनं टिपलं ते इम्फाळमधलं इमा मार्केट.

तब्बल चार हजार महिला विक्रेत्यांचंच मिळून असलेलं हे मार्केट. महिलांनी चालवलेलं आशियातलं तर ते सर्वात मोठं मार्केट आहेच; परंतु गुगलवर केलेल्या शोधानंतर लक्षात आलेलं वास्तव असं, की निव्वळ महिलांनीच चालवलेलं इमा हे जगातलंही एकमेव मार्केट आहे. संघमित्रा त्या मार्केटमध्ये फिरली, तिनं त्या विक्रेत्या महिलांशी गप्पा मारल्या, त्यांचं जीवन समजून घेतलं, कष्ट करून पैसा कमावणार्‍या महिलांना कष्ट न करता केवळ राजकारणच करणार्‍या नवर्‍यांपायी पुकारल्या जाणार्‍या बंदला कसं सामोरं जावं लागतं, आणि उत्पन्नाला मुकावं लागतं, हेही तिनं जाणून घेतलं. त्यातून साकारलं तिचं एक वेगळंच छायादालन. ‘सॅव्ही’ या इंग्रजी नियतकालिकानं त्याची दखल घेतली.

तब्बल दहा पानांची चित्रकथा त्याभोवती गुंफली. या मार्केटचं वैशिष्ट्य असं की, इथे विकला जाणारा शेतमाल सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला की रासायनिक, हे त्या शेतमालाकडे टाकलेल्या पहिल्या नजरेनंच बाया ओळखतात. तिथल्या भाषेत इमा म्हणजे आई. इमा मार्केट म्हणजे आईचं मार्केट. ते सुरू होऊन शंभरहून अधिक वर्षं होऊन गेली, पण जुनं ते सोनं तशी या मार्केटची नजाकत आहे. या मार्केटचं वेगळेपण आणखीही आहे. तिथे बसणार्‍या बाया नुसता माल विकत नाहीत, त्या प्रचलित राजकारणावर-समाजकारणावर-अर्थकारणावर चर्चाही करतात. समाजमनही घडवतात. 1939ची ब्रिटिशविरोधी उठावाची पहिली ठिणगी पडली, ती याच मार्केटमधून. 90च्या दशकात तत्कालीन राज्यपाल चिंतामणी पाणिग्रही यांनी या मार्केटचं नूतनीकरण केलं, नव्या चकचकीत इमारतीत मार्केट शिफ्ट झालं, पण मार्केटमधले गाळे त्याच कुटुंबाकडे राहिले, एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित होत राहिले.