आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुगंधी 'सायकल'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सायकल’ हा उदबत्ती ब्रॅण्ड जन्मास आला ते वर्ष होतं १९४८ आणि तो उपलब्ध करून देणारा उद्योजक होता एन. रंगा राव. मैसूरसारख्या शांत तरीही उद्यमशील गावात जन्मलेल्या एन. रंगांना वयाच्या सहाव्या वर्षीच पितृछत्र हरवल्यानं आणि अनेक प्रकारची आजारपणं झेलावी लागल्यानं, कष्टमय जीवनाला सामोरं जावं लागलं. अकराव्या वर्षी त्यांनी बिस्किटं विकण्याचाही धंदा करून पाहिला. पैसे मिळताहेत, असं दिसल्यावर वर्गातल्याच आणखी एका मुलानं तोच व्यवसाय करून पाहायचा ठरवलं. रंगांनी शक्कल लढवली, एका बिस्किटावर एक पेपरमिंट फुकट द्यायला सुरुवात केली आणि समोरचा स्पर्धक पळून गेला. रंगांनी मग काही काळ कोडगूमधल्या कॉफी मळ्यातही काम केलं.
ही धाडसी वृत्ती पुढेही कामी आली. सुटीच्या दिवशी कोडगूहून मैसूरला यायचं, मन रमवायचं. अशाच एका मैसूर भेटीत रंगांनी मनाशी निश्चय केला आणि ‘मैसूर प्रॉडक्ट‌्स अ‍ॅण्ड जनरल ट्रेडिंग’ कंपनीची स्थापना केली. साबण पावडर, हळद पावडर, उदबत्ती विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. अंगी बाणल्या गेलेल्या नैतिकता-धैर्य-प्रामाणिकपणा आणि शिस्तीच्या आधारानं रंगा त्यात यशस्वीही होत गेले. ही घटना १९४८ सालची. परंतु अखेरीस त्यांनी लक्ष केंद्रित करायचं ठरवलं ते उदबत्तीवर.
उदबत्ती वा अगरबत्ती ही प्रत्येकाचीच गरज. ती आस्तिकालाही हवी आणि नास्तिकालाही. त्यामुळे या व्यवसायात नावीन्य आणलं, नवनव्या गंधांचा शोध लावला, वेगवेगळ्या आकार-प्रकारानं उदबत्त्या बाजारात आणल्या तर धंद्याला मरण नाही, हे त्यांनी ओळखलं. १९४८ ते २०१५ असा हा तब्बल ६७ वर्षांचा एन. रंगांच्या उद्योगाचा प्रवास. कोडगूतून जिद्दीनं सुरू झालेला, मैसूरच्या मातीनं पोसलेला, परंतु आता ६५ देशांमध्ये पोहोचलेला आणि रंगांच्या तिसऱ्या पिढीच्या हाती सुपूर्द झालेला. ‘सायकल’ हे ब्रॅण्डनेम रंगांनी निवडलं ते १९५२मध्ये. १०० रुपये भांडवलावर एन. रंगांनी सुरू केलेला आणि आता हजार कोटी रु.च्या आसपास पोहोचलेला. ‘मैसूर प्रॉडक्ट‌्स अ‍ॅण्ड जनरल ट्रेडिंग कंपनी’ ही या उद्योगाची मातृसंस्था; परंतु आता तो चालतो ‘एन. रंगा राव अ‍ॅण्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नावानं. अर्जुन रंगा हे त्याचे सध्याचे अध्वर्यू. १९६०मध्ये एन. रंगांचे चिरंजीव आर. एन. मूर्ती या व्यवसायात आले आणि रंगांच्या जोडीनं तब्बल वीस वर्षे त्यांनी कंपनीची धुरा वाहिली. १९८०मध्ये एन. रंगांचं निधन झालं.
एन. रंगांना उदबत्ती उद्योगाशिवाय दुसरं विश्वच नव्हतं. उजाडल्यापासून ते थेट सूर्य मावळून अंधार पडेपर्यंत एन. रंगांचा आणि त्यांच्या पत्नीचा मुक्काम फॅक्टरीतच असे. अर्जुन आणि किरण या नातवंडांनी त्यांना कधीच घरी पाहिलं नाही. त्यामुळे अर्जुन आणि किरण एन. रंगांना म्हणत ‘फॅक्टरी अप्पा’ आणि आजीला म्हणत ‘फॅक्टरी अम्मा’. आर. एन. मूर्ती हे अर्जुन आणि किरणचे पिताश्री. आजही ते फॅक्टरीत येतात, संचालक मंडळावर काम करतात. अर्जुननं मैसूरच्याच अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग केलं आणि एमबीए करण्यासाठी ते अमेरिकेत गेले. तिथल्याच एका केमिकल मार्केट रिसर्च करणाऱ्या कंपनीत त्यांनी नोकरीही केली. परंतु शेवटी घरच्या व्यवसायाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. ते भारतात परत आले आणि त्यांनी वडिलांकडून व्यवसायाची सूत्रं स्वीकारली. प्रारंभी ‘मनमोहक अगरबत्ती’ या उपकंपनीची धुरा अर्जुनकडे सोपवण्यात आली. ती यशस्वी होताच, ‘सायकल’मध्ये विसर्जित करण्यात आली आणि ‘सायकल’ ब्रॅण्ड अर्जुनच्या ताब्यात आला. किरणनं शिक्षण घेतलं तेच मुळी गंधांच्या दुनियेचं. ‘सायकल’ ब्रॅण्डच्या नावानं जे काही दोनेकशे गंध आज बाजारात आहेत, त्यातलं बरंच मोठं संशोधनात्मक काम किरणचं.

‘नॅचरल अ‍ॅण्ड इसेन्शियल ऑइल्स प्रायव्हेट लिमिटेड’ हे त्या उद्योगाचं दुसरं भावंडं. ते १९७९मध्ये सुरू झालं. ‘रंगसन्स मार्केटिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ हे एन. आर. ग्रुपचं तिसरं भावंडं, ते १९८३ सालातलं. ‘एनआर ग्रुप’चं मार्केटिंग सांभाळणारं. ‘रिपल फ्रॅग्रन्सेस प्रायव्हेट लिमिटेड’ हे या उद्योगाचं चौथं भावंडं. ते तुलनेनं अलीकडचं, २००५ सालातलं. ‘एन. रंगा राव अ‍ॅण्ड सन्स एक्स्पोर्ट‌्स’ हे पाचवं भावंडं. ६५ देशांमधल्या मार्केटिंगची सारी जबाबदारी यांच्याकडे. आणि ‘एन. आर. फाऊंडेशन’ हे सहावं. जे समाजानं दिलं ते समाजाला मुक्तहस्तानं देऊ करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली ही ना-नफा तत्त्वावरची सेवाभावी संस्था. तो आहे एक धर्मादाय विश्वस्त निधी. शिक्षण-आरोग्य-कला-संस्कृती-सेवा या क्षेत्रात प्रचंड काम करणारी अशी ही संस्था.
‘एन. रंगा राव अ‍ॅण्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेड’चा ‘सायकल’ हा एकमेव ब्रॅण्ड नव्हे. त्या खेरीज ‘लिया’, ‘फ्लूट’, ‘ऱ्हिदम’ आणि ‘वुड्स’ असे आणखी चार ब्रॅण्ड‌्स कंपनीच्या नावे आहेत, आणि प्रत्येकाची एक स्वतंत्र खासियत आहे.
गेल्या सहा दशकांत एन. रंगानं मिळवलेल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची गणनाच करता येणार नाही. ‘रंगा राव मेमोरियल स्कूल फॉर डिसेबल्ड’, झोपडपट्टीतील मुलांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करणारी ‘प्रेरेपना’, कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून सुरू केलेली ‘उन्नती’ ही शिष्यवृत्ती योजना, ‘रंगा ज्ञान विनिमय केंद्र’, गोरगरीब घरातील आणि तुरुंगातील गरजू महिलांना चरितार्थासाठी साहाय्य करणारी ‘उदबत्ती निर्मिती योजना’, मुलींमधल्या नृत्यकलेला प्रोत्साहन देणारी पश्चिम बंगालमधली ‘ता ता थय थय’ ही नृत्यसंस्था आणि स्पर्धा, बाहुली कलेचं संवर्धन-जतन करणारी ‘कोलू’ स्पर्धा, अस्तंगत होत चाललेला शेरी गरबा जपण्यासाठी नवरात्री उत्सवात केले जाणारे त्याचे जाहीर प्रदर्शन असं कितीतरी.
एन. रंगांच्या ‘सायकल’ला आता कार्बन न्यूट्रल प्रमाणता मिळाली आहे. देशभरातल्या उदबत्ती उद्योगातला रंगांचा वाटा आहे, जवळपास ३० टक्क्यांचा. तीसेक हजार अशिक्षित महिलांना घरबसल्या साडेतीन हजार रुपये मिळवून देणाऱ्या या उद्योगानं आता उदबत्ती निर्मितीचे विक्रम प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे. ऑॅगस्ट २०१५ पासून सगळ्याच राष्ट्रीय वाहिन्यांवर अमिताभ बच्चन यांची भूमिका असणारी एक नवी जाहिरात झळकू लागली आहे. ही जाहिरात आहे ‘सायकल’ या उदबत्ती ब्रॅण्डची. प्रार्थनेची शुद्धता ही तिच्यासाठी नव्यानं तयार करण्यात आलेली स्लोगन. २००५मध्ये या उत्पादनाची जाहिरात सर्वप्रथम करण्यात आली, तेव्हा स्लोगन होती ‘हवा पलट दे’. ती हवा आता खरोखरीच पालटली आहे.

भारतीय कंपन्यांना मिळणारं यश आणि जगभरानं त्यावर उमटवलेलं पसंतीचं शिक्कामोर्तब पाहून चीन आणि थायलंडनंही आता या उद्योगात उडी मारली आहे. त्यांनी डिझाइनिंगवर दिलेलं लक्ष ध्यानात घेऊन आता सायकलनंही अमिताभ बच्चन यांना जाहिरातीसाठी वापरलं आहे. गुजरातमधली बच्चन यांची लोकप्रियता आणि मध्यप्रदेशासह ओरिसाच्या ग्राहकक्षेत्रातील त्यांचं फॉलोइंग त्याला कारणीभूत ठरलं आहे. उदबत्तीच्या नऊशे कोटी काड्या प्रतिवर्षी बनवायच्या, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर धरून एन. रंगा अ‍ॅण्ड सन्सची वाटचाल सुरू आहे.
sumajo51@gmail.com