आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब 'गोली' खा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेकार मराठी माणसाला पोटापुरते चार पैसे मिळवून देण्यासाठी म्हणून दादर स्टेशनबाहेर अशोक वैद्य यांनी १९७०मध्ये सुरू केलेला आणि पुढे शिवसेनेनं राजाश्रय दिलेला वडापाव आता कॉर्पोरेट बनला आहे, आणि सारं काही योजल्याप्रमाणे पार पडलंच तर २०१६मध्ये तो ग्लोबलही बनेल, अशी चिन्हं दिसू लागली आहेत. शिवसेनेनं राजाश्रय दिलेल्या त्या वडापावच्या गाड्यांवर अनेक मराठी पोरं श्रीमंत झाली, राजकारणी बनली, मंत्री-नगरसेवक झाली; परंतु वडा-पावचा व्यवसाय मात्र मराठमोळा आणि स्ट्रीटसाइड व्यवसायच राहिला. मात्र त्याला कॉर्पोरेट लुक द्यावा आणि मॅकडोनाल्ड-केलॉग-केएफसीच्या रांगेत बसवावं, असा विचार आणि त्या दृष्टीने प्रयत्न व्यंकटेश अय्यर आणि शिवदास मेनन या दोघा दाक्षिणात्य तरुणांनी केला.

व्यंकटेश आणि शिवदास हे नावापुरतेच दाक्षिणात्य; एरवी ते अस्सल कल्याणकर, सच्चे महाराष्ट्रीय आहेत, आणि तसं असण्याचा त्यांना सार्थ अभिमानही आहे. व्यंकटेशनं करिअर सुरू केलं ते सेंच्युरियन बॅँकेपासून. चारेक वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर फायनान्शियल सर्व्हिसेसच्या क्षेत्रात उतरावं, असं व्यंकटेशच्या मनानं घेतलं आणि त्यानं बालाजी कॉर्पोरेट सर्व्हिसेस नावाची कंपनी सुरू केली. जवळपास वीस वर्षं ती कंपनी चालवल्यानंतर व्यंकटेशनं कॉर्पोरेट फायनान्सचं आकर्षक आणि हमखास उत्पन्नाचं क्षेत्र सोडून अनाकर्षक तसंच अस्थिर वाटणारं, तद्दन गोरगरिबांचं खाद्य भासणारं, दोन-पाच रुपये किमतीतही विकलं जाणारं वडापावचं क्षेत्र उद्योगासाठी निवडायचं मनाशी ठरवलं.

अर्थातच त्याला निमित्त झालं ते त्याचं शेजार्‍याबरोबरचं सहज बोलणं. तो शेजारी साधासुधा नव्हता, तो होता केलॉग इंडिया कंपनीचा सीईओ. गप्पांच्या ओघात त्यानं सांगितलं की, आम्ही कितीही विदेशी चवीचे पदार्थ विकले, तरी भारतीय माणसाला आकर्षण आहे ते देशी पदार्थांचंच. व्यंकटेशच्या डोक्यात पहिली ठिणगी पडली ती तिथे. लुक कॉर्पोरेटचा द्यायचा, परंतु पदार्थ अस्सल देशी विकायचे, हे त्याच्या मनानं घेतलं आणि शोध सुरू झाला. इडली की वडा, हा प्रश्न उभा राहिला. मूळच्या दाक्षिणात्याला इडली आधी पसंत पडायला हवी होती. परंतु झालं उलटंच. व्यंकटेशनं विचारपूर्वक वडा स्वीकारला. शिवदास हा त्याचा परममित्र. त्यानं त्याच्याशी चर्चा केली, आणि गाठीशी असलेली चाळीस-पन्नास लाखांची पुंजी घालून वडापावलाच कॉर्पोरेट लुक द्यायचा बेत आखला. त्यानं मित्रांशीही ही कल्पना शेअर केली, मित्रांना त्यात फारसा दम वाटला नाही. व्यंकटेश आजवर कमावलेला सगळा पैसा गुंतवून वडापावचा धंदा सुरू करतोय, ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. भिकेचे डोहाळे लागलेत, असंही कुणी बोललं. उगाच काहीतरी फंटे मारू नकोस, असं काहींनी सुचवलं. काही जण तर "पुड्या सोडणं'च्या धर्तीवर गोळी सोडणं पुरे, असंही म्हटलं आणि व्यंकटेशला आयतंच ब्रॅँडनेम सापडलं. गोली वडापाव हे नाव नक्की झालं.

१९९५मध्ये सुरू केलेल्या प्रयत्नाला खरं फळ लागलं ते २००४च्या सुमारास. कल्याण शहरातच गोली वडापावचं पहिलं विक्रीकेंद्र सुरू झालं, डोंबिवलीत किचन उभं राहिलं. परंतु सारं काही योजल्याप्रमाणे होतं तर ते नशीब कसलं. अडचणी येत राहिल्या, कधी पैशाच्या, कधी कामगारांनी चालवलेल्या चोरीमारीच्या, कधी वड्यासाठी केलेलं सारणच खराब होण्याच्या, तर कधी सारणाची विशिष्ट रेसिपी ज्याला कळली त्यानंच नोकरी सोडून इतरत्र निघून जाण्याच्या.

ही स्थिती धंदा वाढायला उपकारक नव्हतीच, परंतु कॉर्पोरेट लुकचं स्वप्नंही हवेतच विरेल, असं सूचित करणारी होती. पण तेच ते शेजारी पुन्हा धावून आले. चव कायम राखायची, खराबी होणं टाळायचं तर मॅकडोनाल्ड-केएफसी-केलॉगसारख्या जागतिक कंपन्यांनी अवलंबलेला मार्ग अवलंबा, असं त्यांनी सांगितलं. या कंपन्यांचं किचन सांभाळणार्‍या कंपनीलाच गाठायचं, आपली धडपड समजावून सांगायची, त्यांची किंमत मोजायची, त्यांचे नियम-संकेत पाळायचे आणि थोडा खर्चिक वाटणारा मार्ग पत्करायचा, असं व्यंकटेश-शिवदासच्या मनानं घेतलं आणि सुरुवात झाली.

मॅकडोनाल्डसाठी किचन चालविणार्‍या व्हिस्टा प्रोसेस्ड फूड‌्सकडे दोघंही गेले. व्हिस्टाजनं हो म्हटलं नाही, परंतु नाहीही म्हटलं नाही. संपूर्ण प्रोजेक्टचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी वर्ष घेतलं आणि अखेरीस हो म्हटलं.
व्हिस्टाच्या हो म्हणण्यानं महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागणार होते. वड्यातील सारणाची जी गोळी व्हिस्टावाले बनवणार होते, ती शून्याखाली १८ अंश इतक्या तापमानात ठेवली जाणार होती. नऊ महिने ती टिकू शकेल, याची खात्री व्हिस्टानं दिली होती. व्हिस्टाचा प्लॅन्ट हस्तस्पर्शापासून सर्वस्वी मुक्त होता. वड्याच्या गोळीला हाताचाच काय बोटाचाही स्पर्श होणार नाही, याची पुरती काळजी घेतली जाणार होती. व्हिस्टा प्रोसेस्ड फूड‌्स ही ओएसआय कॉर्पोरेशन आणि मॅकडोनाल्ड कॉर्पोरेशन या अमेरिकी कंपन्यांची मिळून संयुक्त कंपनी, तिच्या तळोजातल्या किचनमध्ये सारणाच्या रोज एक लाख गोळ्या बनवल्या जाणार होत्या आणि देशभरात मिळून ७५ हजार ते एक लाख वडे रोज संपतील, असा अंदाज बांधण्यात आला होता.

२००४मध्ये गोली वडापावचं विक्री केंद्र सुरू झालं, ते पहिलंवहिलं क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट म्हणून. गोली वडापाव हे नाव जरी देशी असलं, तरी त्यात ताकद होती विदेशी फास्ट फूडला टक्कर देण्याइतकी. परंतु केवळ वडापाव एवढं एकच प्रॉडक्ट पुरणारं नव्हतं. जोडीला आणखी काही अस्सल भारतीय पदार्थ ठेवण्याची गरज ध्यानी येऊ लागली होती. त्यातून जन्म झाला वडापावच्याच विविध प्रकारांचा. क्लासिक वडापाव, मक्कई व्हेज वडापाव, चीज वडापाव, मसाला वडापाव, मक्का पालक वडापाव, चीज उंगली, शेझवान वडापाव, साबुदाणा वडापाव, सोया वडापाव, हरियाली पॉप्स आणि वडा लपेट.

मुंबईत तीनेकशे फ्रँचाइझी उभ्या करण्याचं स्वप्न अय्यर-मेनन पाहात होते. परंतु जागांची अनुपलब्धता आणि जागांचे सतत चढणारे भाव, यामुळे काही पर्यायी विचार करता येईल का, याचा शोध सुरू होता. अशा वेळेस कल्पना पुढे आली, ती द्वितीय श्रेणीची शहरं धुंडाळण्याची. अवघ्या १८ महिन्यांत नाशिक-औरंगाबाद-बीड-लातूर-जालना-परभणी-नागपूर अशा राज्यातील शहरांमध्ये ७५ गोली वडापाव केंद्रं उभी राहिली. हळूहळू ही साखळी उत्तरेत गोरखपूरपासून दक्षिणेत कोचीपर्यंत आणि पश्चिमेस पोरबंदरपासून पूर्वेस कोलकात्यापर्यंत पसरत गेली. महाराष्ट्राबरोबरच केरळ, तामीळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, ओदिशातही गोली वडापावची केंद्रे उभी राहिली.

आज ही संख्या साडेतीनशेच्या घरात आहे, तर गोली वडापाव हा नुसता खाद्यपदार्थ उरलेला नाही. हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसमध्ये, स्वित्झर्लंडच्या आयएमडीमध्ये, आणि अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठामध्ये गोली वडापाव हा अभ्यासाचा विषय बनला आहे. २०१३-१४ सालचं कोका कोला कंपनीचं गोल्डन स्पून अ‍ॅवॉर्ड, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगचं जे. एस. मेमोरियल अ‍ॅवॉर्ड, जगभरातल्या पहिल्या २० क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट‌्समध्ये स्थान, स्मार्ट इनॉव्हेशन श्रेणीतलं गुणवत्ता प्रमाणपत्र, आणि भारतातला सहाव्या क्रमांकाचा क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट ब्रॅन्ड हे सन्मान गोलीच्या वाट्याला आले आहेत.

गोली वडापावला कॉर्पोरेट लुक देण्यासाठी नवं बोधचिन्ह, नवा ब्रॅण्डच निर्माण करावा लागला. गोलीचं बोधचिन्ह तीन रंगांचं बनलं. त्यातला लाल रंग होता तिखट-मसालेदार चवीचा. पांढरा रंग होता स्वच्छतेचा आणि हिरवा रंग होता वड्याच्या मसालेदार चवीचा निदर्शक. त्या बोधचिन्हात आहे एक सामान्य माणसाचा चेहरा, डोक्यावर टोपी असलेला आणि जाडजूड मिशी राखणारा. त्याचं अस्सल देशीपण, ग्रामीणत्व ओळखता यावं यासाठी निवडलेला.

वडापाव या डिशचं मुळात वैशिष्ट्यच हे आहे की, त्यासाठी प्लेट लागत नाही, चमचे लागत नाहीत, टेबल असलंच पाहिजे अशी गरज असत नाही, खुर्चीचा तर प्रश्नच उद‌्भवत नाही. त्यामुळे वरखर्च काहीच नसलेला आणि प्रसंगी चालताचालता, बोलताबोलता, उभ्याउभ्याने, प्रवासात किंवा अगदी काही खरेदी करताकरता आपण तो खाऊ शकतो. व्यंकटेशनं आणि शिवदासनं बनवलेलं त्याचं एक गणित अभ्यासण्यासारखं आहे. ते म्हणतात, सव्वाशे कोटी लोकसंख्येतल्या पन्नास कोटी लोकांनी १० रुपये किमतीचा वडापाव खायचं ठरवलं तर ५०० कोटीचं उत्पन्न मिळेल. वर्षभरात एक माणूस दहा वडापाव खातो, असं गृहीत धरलं तर याच ५० कोटी जनतेकडून वर्षाला ५००० कोटी उत्पन्न होतील.

गणेश चतुर्थीचा आणि गोकुळाष्टमीचा सण हा वडापाव खाणार्‍यांचा सण आणि या काळात होणारी त्याची विक्रीही विक्रमी. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या वा अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत प्रचंड मोठा वडापाव तयार करून त्यावर बसवलेल्या गोली गणपतीची मिरवणूक हा मोठाच आकर्षणाचा विषय बनतो. १९ राज्यं, ८९ शहरं आणि ३५० विक्री केंद्रे अशा पसार्‍यासह गोली वडापावची वाटचाल सुरू आहे. येत्या ३ ते ५ वर्षांत ही संख्या एक हजारावर नेण्यासाठी व्यंकटेश आणि शिवदासनं कंबर कसली आहे. त्यांना गोली वडापावला बर्गर आणि पिझ्झाच्या रांगेत नेऊन बसवायचं आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड बनवायचं आहे.

सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com
बातम्या आणखी आहेत...