आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगळेवेगळे गो-विद्यापीठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्यानं सुरू होणार्‍या खासगी शाळा, नव्यानं सुरू होणारी विनाअनुदानित महाविद्यालयं, नव्यानं सुरू होणारे चाकोरीबाहेरचे अभ्यासक्रम या रांगेत बसण्याचा मान आता नव्यानं सुरू होणार्‍या खासगी विद्यापीठांना मिळण्याच्या शक्यता निर्माण होऊ लागल्या आहेत. आयआयटी, आयआयएमचं वाढतं प्रस्थ भारताला नवं नाहीच. ते तर विद्यार्थिप्रिय असे अभ्यासक्रम. परंतु आता याहीपेक्षा सर्वस्वी वेगळं असं एक विद्यापीठ सुरू होतं आहे, आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात. कोंडाविडू या गावाजवळ हे विद्यापीठ उभं करण्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
हे विद्यापीठ आहे गो-विद्यापीठ. गोवंशाचं संवर्धन, संरक्षण आणि ते करता करता निरक्षर ग्रामीण युवकांना रोजगाराची उपलब्धता हे मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून ते उभं करण्याचा घाट ‘इस्कॉन’नं घातला आहे. ‘इस्कॉन’ ही कृष्णभक्तांची चळवळ आणि गोरक्षण हे कृष्णभक्तांचं आद्य कर्तव्य. ते ध्यानात ठेवूनच जुलै महिन्याच्या 13 तारखेला यातला एक्कावन्न कोटी रुपये खर्चाचा गोशालेचा पहिला टप्पा सुरूही झाला. त्याशिवाय गुंटूर जिल्ह्यातल्या या परिसरात एक भलंथोरलं, देखणं कृष्ण मंदिर उभं करण्याची तयारीही ‘इस्कॉन’नं सुरू केली आहे ती वेगळीच.
‘इस्कॉन’च्या या विद्यापीठात शेणापासून तसेच गोमूत्रापासून औषधं आणि जीवनोपयोगी उत्पादनं बनवण्याचं प्रशिक्षण द्यायचाही विचार सुरू आहे. कत्तलखान्याला पाठवल्या जाणार्‍या वीस गायी जरी एखाद्या तरुणानं मिळवल्या आणि त्यांची गोशाला सुरू केली, तरी त्या गायींच्या शेण-मूत्रापासून दरमहा तीस हजार रुपये मिळवण्याएवढं उत्पादन निघू शकतं, असं ‘इस्कॉन’चं म्हणणं. ‘इस्कॉन’नं गुंटूरची निवड केली आहे, ती आणखी एका कारणानं. गुंटूर हा जिल्हा सर्वाधिक खतं वापरणारा जिल्हा म्हणून देशात ओळखला जातो. या खतांमुळे गुंटूरची जमीन निकृष्ट बनते आहेच, परंतु मानवी तसेच प्राणिमात्रांच्या जिवाला भविष्यात धोकाही उत्पन्न होण्याची शक्यता वाढते आहे.
गोवंशाची मोठ्या प्रमाणावर होणारी हत्या हा अनेकांच्या चिंतेचा विषय. जय जिनेंद्र फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांची हुंकार, जीना है हमें भी ही गोवंशाच्या रक्षणासाठी याच चिंतेतून सुरू झालेली चळवळ. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 48मध्ये गोवंशाच्या संरक्षणाविषयीचा, संवर्धनाविषयीचा सरकारच्या जबाबदारीचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यात असं म्हटलं आहे,“The state shall endeavour to organize agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall in particular take steps for preserving and improving the breeds and prohibiting the slaughter of cows and calves and other milch and draught cattle.” ¸ महात्मा गांधी हे तर राष्ट्रपिता. त्यांचं छायाचित्र सरकारी कार्यालयांमध्ये लावलं जातं, ते त्यांच्या विचारांचा आदर्श राज्यकर्त्यांसमोर राहावा म्हणूनच. गोवंशाच्या रक्षणासंदर्भात त्यांनी म्हटलं आहे, ‘मेरे लिये गोवध मनुष्य वध के समान और गोहत्या बंदी मेरे लिये स्वराज्य से भी अधिक महत्वपूर्ण प्रश्न है. गोरक्षा के द्वारा ही हिंदुओं के हिंदुत्व का अस्तित्व है, रहेगा।’

गायीचं आणि गोवंशाचं महत्त्व हे काही केवळ भारतीय राज्यघटनेनं किंवा महात्मा गांधींनीच सांगितलेलं नाही. जगभर या संदर्भातलं संशोधन सुरू आहे, त्यातनं मिळणारे परिणाम थक्क करून टाकणारे ठरत आहेत. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी मॅक्लनाहान न्यूट्रिएंट सेपरेशन सिस्टिम नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून गायीच्या शेणापासून स्वच्छ पाणी बनविण्यात यश मिळवलं आहे. या प्रक्रियेत शेणातील पाणी आणि अन्य रासायनिक घटक वेगळे केले जातात, आणि त्यातून बनणारं पाणी हे जनावरांना पिण्यासाठी देता येईल, ते पूर्णपणे स्वच्छ असेल, निर्भेळ असेल, असा निर्वाळा विद्यापीठातील प्रा. स्टीव्ह सफरमन यांनी देऊ केला आहे.

सफरमन यांचं म्हणणं असं की, आपल्याकडे एक हजार गायी वर्षभरात एक कोटी गॅलन शेण देतात. त्यात 90 टक्के पाणी असतं. परंतु उरलेल्या घटकांमध्ये पोषक तत्त्वं, कार्बन आणि रोगाणूही असतात. ते सारे घटक योग्य प्रकारे निरनिराळे केल्यावर 100 गॅलन शेणापासून 50 गॅलन पाणी मिळू शकतं. उरलेले घटक खत म्हणून शेतात वापरता येतात. हे करत असताना दुय्यम उत्पादनातून जी ऊर्जा निर्माण होते, तिचा वापर पाणी निर्मितीच्या प्लँटसाठी करता येऊ शकतो.
sumajo51@gmail.com