आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रँड अम्मा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2014च्या लोकसभा निवडणुका मे महिन्यात पार पडल्या. त्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून मोदींचं सरकार सत्तेवर आलं. मोदींच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं या निवडणुकीत जे यश मिळवलं, त्यानं माध्यमतज्ज्ञांचे आणि राजकीय भाष्यकारांचेही डोळे दिपले. काहींची बोबडीही वळली. पण या सगळ्या मोदी लाटेत आपलं वेगळेपण ज्यांनी टिकवून ठेवलं, त्यातल्या एक होत्या जयललिता!

जयललितांच्या अण्णाद्रमुकनं निवडणुकीच्या आधी तर मोदींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी हातमिळवणी केली नाहीच; परंतु निवडणुकीनंतर असं काही वातावरण निर्माण करून दाखवलं की, मोदींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आगामी विधानसभा निवडणुका आणि राज्यसभेतलं बहुमत लक्षात घेऊन जयललितांशी हातमिळवणी करणारं पाऊल उचलणं क्रमप्राप्तच होऊन बसलं.

जयललितांना मिळालेलं हे यश, त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि तामिळनाडूच्या म्युझिक अँड फाइन आटर््स युनिव्हर्सिटीनं त्यांच्या 66व्या वाढदिवसाला 66 तासांचा नॉनस्टॉप संगीत महोत्सव सादर करून साजरं केलं. आरोग्य खात्यानं त्याच दिवशी 660 वैद्यकीय शिबिरं राज्यभर भरवली, तर 66 लाख झाडं त्या दिवशी राज्यभरात लावण्यात आली. रक्तदान शिबिराचाही उपक्रम असाच धडाक्यात पार पाडण्यात आला आणि गिनीज बुकमध्ये नोंद व्हावं इतकं 50 हजार बाटल्या रक्त एकाच दिवशी संकलित करण्यात आलं. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात आल्या आणि त्यांचीही संख्या राज्यभर मिळून 6.44 लाख इतकी भरली. सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या 5.5 लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणारी एक योजनाही तामिळनाडूत सध्या सुरू आहे.

जयललितांना हे जे यश मिळालं, त्याला कारणीभूत ठरली ती त्यांची अशीच आणखी काही लोकसेवेची पावलं. शेवटी सैन्यदेखील चालतं ते पोटावर, हे माहीत असलेल्या जयललितांनी दोन वेळची पोटाची खळगीही भरू न शकणार्‍या गोरगरिबांसाठी एक रुपयात इडली, तीन रुपयात कर्ड-राइस, तीनच रुपयात दाल-चपाती, पाच रुपयात सांबार-राइस, पोंगल किंवा लेमन राइस देणारी दोनशेहून अधिक कँटीन्स चेन्नईत सुरू केली आणि चमत्कार घडला. तशी मतदारांना भुरळ घालणारी पावलं तर जयललितांनी आधीपासूनच टाकायला सुरुवात केली होती; पण ती पावलं होती भेटवस्तू स्वरूपातली. त्यानं थेट पोट भरू शकत नव्हतं. ते घडलं आणि त्या कँटीन्सची ताकद राजकारण्यांच्या ध्यानात आली. महाराष्ट्रात जशी झुणका भाकर केंदे्र सुरू झाली होती, तद्वतच हा प्रकार.

त्यांना मिळणारं यश पाहून त्यांचं नाव बदलून ‘अम्मा कँटीन्स’ करण्यात आलं. ही कँटीन्स सुरू करण्यात आली 2013मध्ये; पण निवडणुकीतल्या यशानंतर जयललितांनी आता राज्यभरात आणखी 360 कँटीन्स सुरू करायचं ठरवलं आहे. त्यामुळे कँटीन्सची एकूण संख्या होते आहे 654. चेन्नईचे महापौर साईदाई दोराईस्वामी गेल्या वर्षी जगभरातल्या महानगरांच्या महापौर शिखर परिषदेनिमित्तानं सिंगापूरला आणि यंदा त्याच परिषदेसाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यांनी तिथे सादर केलेल्या चित्रफितीचा परिणाम एवढा झाला की इजिप्त सरकारचं एक आधिकारिक शिष्टमंडळ नुकतंच तामिळनाडूला येऊन या योजनेची पाहणी करून गेलं. ही पाहणी केल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की, अमेरिकेच्या फूड स्टॅम्प योजनेपेक्षा ही योजना अधिक नेमकी आणि लाभार्थींसाठी उपयुक्त वाटते, अत्यल्प किमतीत सरकार देत असलेल्या आरोग्यदायी आणि सत्त्वयुक्त पदार्थांसारखे पदार्थ आम्हीही द्यावेत, असं आम्हाला वाटतं.

जयललितांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुक सरकारनं अम्मा कँटीन्ससारख्याच आणखी सहा योजना अम्मा या ब्रँडनं सुरू केल्या आहेत. त्यातली एक आहे अम्मा वॉटर. एक लिटर शुद्ध पाण्याची बाटली दहा रुपयात उपलब्ध करून देणारी ही योजना. दुसरी आहे अम्मा सॉल्टची; म्हणजे अम्मा मिठाची. तीन प्रतींचं मीठ तामिळनाडू सरकारनं बाजारात आणलं आहे. सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातलं मिठाचं महत्त्व दस्तुरखुद्द महात्मा गांधींनीही ओळखलं होतं, आणि तेच मीठ शस्त्र म्हणून ब्रिटिश सत्तेविरोधात वापरत महात्माजींनी स्वातंत्र्यलढ्याचं रणशिंग फुंकलं होतं. डबल फोर्टिफाइड सॉल्ट, लो सोडियम सॉल्ट आणि रिफाइंड फ्री आयोडाइज्ड सॉल्ट, हे ते तीन प्रकार. खुल्या बाजारात हे प्रकार 21 ते 25 रुपये किलो भावानं विकले जात असताना, तामिळनाडू सरकारनं मात्र ते अनुक्रमे 14, 21 आणि 10 रुपये किलो भावानं उपलब्ध करून दिले आहेत.

तामिळनाडू सरकारची अम्मा ब्रँड योजनेतली आणखी एक योजना अम्मा चहाची. तामिळनाडू टी प्लँटेशन कॉर्पोरेशननं हाती घेतलेली ही योजना. टँटी (TANTEA)) हे तामिळनाडू टी प्लँटेशन कॉर्पोरेशनचं अधिकृत उत्पादन. त्याचं बाजारातलं स्थान अवघं दोन टक्के इतकंच. तामिळनाडूच्या निलगिरी आणि कोइम्बतूर जिल्ह्यात चहाचे मळे मोठ्या प्रमाणावर असूनही तामिळनाडू प्रसिद्ध आहे कॉफीसाठी. ही प्रतिमा बदलण्यासाठी तामिळनाडू टी प्लँटेशन कॉर्पोरेशननं गेल्या तीन ते पाच वर्षांत खूप प्रयत्न केले. आता हे स्थान 20 टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे. तोट्यात जाणारं कॉर्पोरेशन थोडा का होईना, नफा दाखवू लागलं आहे. अम्मा सिनेमा थिएटर्स ही अशीच एक योजना. चित्रपटनिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या तामिळनाडूत सवलतीच्या दरात सिनेमा तिकिटं देऊ करून प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सरकारी मदतीनं चित्रपट निर्मात्यांनीच सुरू केलेला हा उपक्रम. या सर्वावर कळस चढवणारा पुढचा उपक्रम अम्मा फार्मसी नावाचा.

एमआरपीवर दहा टक्के सवलतीत औषधं रुग्णांना सरसकट मिळावीत, हा हेतू त्यामागे आहे. सरकारनं त्या दृष्टीनं शंभरेक औषधविक्रेती दुकानं राज्यभर उपलब्ध करून दिली आहेत. राज्याचा विचार केल्यास ही संख्या कमी वाटते; परंतु जिल्ह्याच्या मुख्य स्थानी उपचाराकरिता येणार्‍या गोरगरिबांना त्याचा फायदा व्हावा, हा हेतू त्यामागे आहे.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तामिळनाडूतलं जयललितांचं सरकार विद्यार्थ्यांना दिलेल्या वस्तू वगळल्या, तर बाकीच्या योजना चालवताना महाराष्ट्रासारखी माफीची आणि मोफतची सवय न लावता प्रत्येक गोष्ट पैसे मोजूनच घेतली पाहिजे, याची सवय नागरिकांना लावते आहे. स्वत:च्या नावाचा एक ब्रँड बाजारात सुस्थापित करते आहे. महाराष्ट्राचं सरकार शिकेल का हे कधी?