आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sudhir Joglekar Article About Padyatra, Divya Marathi

दिवस पदयात्रांचे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदयात्रांचं अप्रूप भारताला तरी निश्चित नाही. कारण पदयात्रा ही संकल्पनाच मुळात अस्सल देशी आहे. भारतीय आहे. भारतातील पदयात्रांचा इतिहास तसा बाराशे-तेराशे वर्षांपूर्वीपासूनचा. आद्य शंकराचार्यांनी धर्मप्रसारासाठी देशाच्या चारही कोपर्‍यांत मठांची स्थापना केली, ती अशा पदयात्रा करूनच. ज्ञानदेव-नामदेवांपासून रामदासांपर्यंतच्या संतमहंतांनी धर्म जागरणासाठी देश पायी तुडवला, तोदेखील पदयात्रा करतच. विसाव्या शतकाच्या अखेरीस मात्र या यात्रांचा समर्पक दृष्टिकोनातून वापर करून घेतला, तो स्वामी विवेकानंदांनी. रामकृष्ण परमहंसांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर, देशस्थितीचं जवळून अवलोकन करण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशानं स्वामीजींनी परिव्राजक अवस्थेत भारतभ्रमण सुरू केलं, ते एका विशिष्ट उद्देशानं आणि एका प्रदीर्घ कालखंडासाठी...

आणि अगदी अलीकडच्या काळात या पदयात्रा प्रकरणाचा उपयोग राजकीय नेत्यांनी करून घेतला, तो धर्मापेक्षाही देश जागरणासाठी. महात्मा गांधींनी 1930मध्ये ब्रिटिशांच्या विरोधातल्या लढ्याचं प्रतीक म्हणून दांडी ते साबरमती अशी पदयात्रा काढून पदयात्रांना स्वातंत्र्यलढ्यातलं एक आधुनिक हत्यार बनवलं. त्यांच्यानंतर या यात्रा प्रकरणाचा समाज जागरणासाठी योग्य उपयोग करून घेतला, तो आचार्य विनोबा भावे यांनी. त्यांनी भूदान चळवळीसाठी पदयात्रा हे साधन म्हणून वापरलं, आणि लक्षावधी एकर पडिक जमीन दानरूपात मिळवली.

गेल्या पन्नास वर्षांत मात्र या हत्याराचा वापर म्हणावा तसा, आणि म्हणावा तितक्या तीव्रतेनं झाला नाही. नाही म्हणायला, माजी पंतप्रधान चंद्रशेखरांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी काश्मीर ते कन्याकुमारी अशी पदयात्रा काढली. त्यांच्यानंतर आणखीही काही राजकीय नेत्यांनी पदयात्रा काढल्या; पण त्या मोजक्या भागापुरत्या. या खेरीजही अनेकांनी देशभ्रमण केलं, पण ते एक तर वाहनात बसून किंवा स्वत: वाहन चालवून.

2013 या वर्षानं मात्र तीन यात्रा निघालेल्या पाहिल्या. त्यातल्या दोन होत्या व्यक्तिगत स्तरावर सुरू केलेल्या आणि एक काही सायकलस्वार तरुणींनी एकत्रितपणे केलेली. त्यातली एक पदयात्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सीतारामजी केडिलाय यांची. त्यांची भारत परिक्रमा स्वामी विवेकानंदांचं सार्ध शती वर्ष साधून सुरू झाली, ती 9 ऑगस्ट 2012 रोजी. कन्याकुमारीहून सुरू झालेली आणि पाच वर्षे चालणारी ही पदयात्रा सुमारे 15 हजार किलोमीटरचं अंतर कापून 2016मध्ये काश्मिरात संपणार आहे. ते वर्ष असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद शिला स्मारकाचे संकल्पक एकनाथजी रानडे यांच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष. गावावर प्रेम करा, मानवतेवर प्रेम करा, पाण्याचं संवर्धन करा, ज्येष्ठांचा मान राखा, भारतमातेचा मान राखा, गोवंशाचं जतन करा, निसर्गाची पूजा करा, हा संदेश घेऊन सीतारामजी देशभर फिरताहेत. पहाटे सहा वाजता गोपूजन करून सीतारामजींची पदयात्रा सुरू होते. वृक्षारोपण करणं, शालेय मुलांशी अनौपचारिक गप्पा मारणं, गावातल्या सत्संगाला उपस्थित राहणं, गावातील व्यावसायिकांशी संभाषण करणं, गावाची स्थिती समजून घेणं आणि रोजचं किमान दहा किलोमीटरचं अंतर कापणं, हा असतो त्यांचा दिनक्रम.

दुसरी पदयात्रा स्वातंत्र्यलढ्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते कै. अण्णा भुस्कुटे आणि कै. वि. म. भुस्कुटे यांचा समर्थ वारसा सांगणार्‍या डोंबिवलीच्या विद्याधर भुस्कुटे यांची. वयाच्या 62व्या वर्षी विद्याधर यांनी ही पदयात्रा सुरू केली, ती कुणाचीही मदत न घेता; सर्वस्वी स्वत:च्या ताकदीवर. त्यांनी आपली यात्रा सुरू केली काश्मीरमधून आणि ती संपणार आहे कन्याकुमारीत. सुमारे 4 हजार किलोमीटरचं अंतर कापून विद्याधर एप्रिलअखेर कन्याकुमारीस पोहोचतील. शांतता-पर्यावरण-सुशिक्षण-भ्रूणहत्याविरोध-मानवता या मूल्यांच्या संवर्धनासाठी आणि त्या दिशेनं जनमत जागं करण्यासाठी विद्याधर भुस्कुटे यांनी ही पदयात्रा सुरू केली आहे. कपाळाला बांधलेला पट्टा, त्यात खोवलेली विजेरी एवढ्याच जामानिम्यानिशी भल्या पहाटे पाच वाजल्यानंतर काळोखातच विद्याधरजींचं चालणं सुरू होतं. ऊन असो किंवा वारा, पाऊस असो किंवा थंडी, धुकं असो किंवा तीव्र आर्द्रता; विद्याधरजी ठरलेल्या वेळेला मुक्काम सोडतात आणि रोजचं चाळीस किलोमीटरचं अंतर कापल्याशिवाय मुक्काम करत नाहीत. रस्ते चांगले असोत की वाईट, त्यावर खडी असो की धूळ, मार्ग डोंगरांवरून असो की दर्‍याखोर्‍यांतून, वाटेत जंगलं असोत की नद्या, रस्ता हिंस्र पशूंनी अडवलेला असो की दरोडेखोर-लुटारूंनी; विद्याधरजी थांबतच नाहीत. आल्या प्रसंगाला सामोरं जायचं आणि मनात असलेला जनजागृतीचा संदेश देत वाट कापायची, हे त्यांचं ध्येय ठरूनच गेलेलं आहे. तीन हजार किलोमीटरचं अंतर कापून विद्याधरजी आता आंध्रातून पुढे चालले आहेत. येत्या सव्वा महिन्यात उरलेलं हजार किलोमीटरचं अंतर पार करून आपण कन्याकुमारीला पोहोचू, असा दृढ विश्वास त्यांच्या मनात आहे.

यात्रांच्या मालिकेतली तिसरी यात्रा सायकलयात्रा. कच्छ ते कोची हे 2500 किलोमीटरचं अंतर कापणारी. वुमेन अ‍ॅडव्हेंचरर्स नेटवर्क ऑफ इंडिया (वाणी) या संस्थेतर्फे काढण्यात आलेल्या या यात्रेत सहभागी झाल्या होत्या चौदा जणी. रोज 70 ते 80 किलोमीटरचं अंतर कापायचं आणि नियत मुक्कामी थांबायचं, हा दिनक्रम. 5 जानेवारीला या चौदा जणींनी कच्छ सोडलं आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी कोची गाठलं. या चौदा जणींत दोघी जणी त्यांच्या त्यांच्या कन्यांना घेऊन सहभागी झाल्या होत्या. माऊंट अबूमधील एका कॉलेजच्या प्राचार्या असलेल्या चौला जागीरदार आपल्या तेरा वर्षांच्या कन्येसह सायकल मोहिमेत सहभागी झाल्या, तर बंगळुरूच्या वसुमतींसोबत होती यांची कन्या स्मिता श्रीनिवासन. लष्करात मेजर या हुद्द्यावर काम करणारी विशिष्ट सेवा पदकाची मानकरी अश्विनी पवार अकरा महिन्यांच्या मुलाला घेऊन यात्रेत उतरली होती. यात्रा सुरू झाली की विनायक ट्रकमध्ये असे. विनायकचा पहिला वाढदिवस यात्रेदरम्यानच साजरा झाला. पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीचा संदेश घेऊन निघालेली ही सायकलयात्रा गो ग्रीन गर्ल्स टीम नावानंच ओळखली गेली. वाटेतल्या मुक्कामात शक्य तिथे सायकल क्लब्जची स्थापना करत पुढे पुढे जात तिनं चक्क इतिहासच घडवला. या तिन्ही यात्रा महाराष्ट्राच्या शिवभूमीला स्पर्शून गेल्या, हे विशेष.