आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘होम मिनिस्टर’ म्हणाल्या, ‘तथास्तु’!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदेश बांदेकर, तथास्तु, परिपूर्ण शॉपिंग मॉल, पैठणी आणि होम मिनिस्टर हे आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातलं एक अतूट असं समीकरण बनून गेलं आहे. पुण्यात जन्मलेला हा अस्सल मराठमोळा ब्रॅण्ड आता कोल्हापूर-गोवा असा बहरत चालला आहे...
पैठणीच काय, साध्याशा साडी विक्रीचाही पूर्वानुभव नसताना वस्त्रप्रावरणांच्या क्षेत्रात उतरायचं, मारवाडी-माहेश्वरी-गुजराती-जैन बांधवांचे प्राबल्य असलेल्या पुण्याच्या बाजारपेठेत जम बसवायचा आणि स्वत:चा अस्सल मराठमोळा ब्रॅण्ड सुस्थापित करायचा, ही साधीसुधी गोष्ट नाही. पण, ही हिंमत दाखवली, मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या परंतु आता पुणेकर झालेल्या जनार्दन धोंडिबा कुराडे यांनी. त्यांच्या या प्रयत्नांना बळ दिलं, ते ‘तथास्तु’ हे नाव ज्यांच्यामुळे जगभर पोहोचलं, त्या आदेश बांदेकरांच्या ‘होम मिनिस्टर’कार्यक्रमानं. आज आदेश बांदेकर, तथास्तु, परिपूर्ण शॉपिंग मॉल, पैठणी आणि होम मिनिस्टर हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातलं एक अतूट असं समीकरण बनून गेलं आहे.
कुराडे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातले. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय पादत्राणांचा. त्यातही त्यांचं वेगळेपण कोल्हापुरी चपलांचं. ते चर्मकार समाजातले. त्यांच्या वडिलांनी कोल्हापुरात पादत्राणांच्या व्यवसायात नाव कमावलेलं. पण उत्पादनांना अधिक चांगली बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने जनार्दनजी १९८५मध्ये पुण्यात आले. कोल्हापुरी चपलांचं होलसेल विक्रीचं दुकान सुरू केलं. ते धो धो चाललं. लक्ष्मी शू एम्पोरियम हे त्याचं त्या वेळचं नाव. होलसेल विक्रीला मिळणारा प्रतिसाद पाहिल्यानंतर किरकोळ विक्रीही सुरू करावी, असं कुराडेंच्या मनानं घेतलं, आणि १९९२मध्ये सुरू झालं डेक्कनवरचं ‘शू’ वर्ल्ड. लक्ष्मी शू एम्पोरियम आणि शू वर्ल्डला मिळालेल्या पुणेकरांच्या प्रतिसादानंतर काही नवं करावं, क्षेत्रबदल करावा, असं कुराडेंना वाटायला लागलं होतं.
परंतु काय करायचं, हे निश्चित होत नव्हतं. एव्हाना कुमठेकर रस्त्यावरची पूर्वी कधी तरी पैसे गुंतवून घेऊन ठेवलेली जागा मूळ मालकांमधले सगळे वाद संपून ताब्यात येण्याची शक्यता दिसू लागली होती. एवढ्या मोठ्या जागेचा वापर करायचा, तर त्या जागेत दुसऱ्या कुणाला भाड्यानं जागा न देता आपण स्वत:चंच काही सब कुछ महिलांसाठी सुरू करावं, असा विचार कुराडेंच्या मनाशी पक्का होत आला होता. कुमठेकर रस्त्यावर उभ्या राहात असलेल्या चार मजली इमारतीत ‘तथास्तु’ नावाचा वेडिंग कलेक्शन, साड्या, रेडिमेड‌्स, वेस्टर्न आऊटफिट‌्स, ड्रेस मटेरियल, इनर-वेअर्स, फूटवेअर, अॅक्सेसरीज, इमिटेशन ज्वेलरी हे सर्व एकाच छत्राखाली उपलब्ध करून देणारा मॉल त्यांना उभा करायचा होता. परंतु तसं करताना, साडीच्या ‘सा’पासून सगळंच शिकावं लागणार होतं. साडीचे उत्पादक, रंग-पोताचं गणित, बदलत्या आवडींमध्ये माल पडून न राहता तो सारखा बदलता राहील यासाठी करावी लागणारी धावपळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कुमठेकर रस्त्यावर धंदा करायचा, तर साड्यांचे सर्व प्रकार ठेवण्याबरोबरच, एका विशेष प्रकारात नाव कमावणं गरजेचं होतं. जनार्दनजींनी पैठणी निश्चित केली आणि सुरू झाला, एक अथक प्रवास.
तब्बल १६ हजार चौरस फुटांचा ‘तथास्तु’ मॉल तर सुरू झाला, परंतु येणारं गिऱ्हाईक पुणेरी. त्यातही सदाशिवपेठी, त्यातही लक्ष्मी रोडवरचं चोखंदळ. विंडो शॉपिंगची सवय असलेलं. जनार्दनजींना याचा विचार करून ‘तथास्तु’मध्ये शिरलेल्या ग्राहकाला कुठलीही स्त्री योग्य वस्तू विकत घेण्यासाठी इतरत्र जावं लागणार नाही, याचा चोख बंदोबस्त केला. कामगारांचं प्रशिक्षण केलं, ग्राहक मानसिकतेचा अभ्यास करायला लावला. मुलगा अभ्यास करणार आहे, हे गृहीत धरून सगळं आपल्यालाच करायचं आहे, याचं भान ठेवत पादत्राणांचा व्यवसाय, लेडिज शॉपिंग मॉलसाठीची खरेदी-विक्री आणि त्यातही पैठणीसारख्या प्रकारावर विशेष लक्ष केंद्रित करायचं असेल तर त्याचंही अद्ययावत ज्ञान गरजेचं होतं. शिकता शिकता व्यवसाय करायचा होता आणि कुमठेकर रस्त्यावरच्या पहिल्यावहिल्या मराठी पैठणी व्यावसायिकाला अपयशी होऊ द्यायचं नव्हतं.
मॉल उभा राहिला. साड्यांच्या व्यवसायाचं व्यवहारज्ञान प्राप्त झालं. परंतु मार्केटिंगचं तंत्र कुठेतरी कमी पडत होतं. तशातच साकेत कम्युनिकेशन्सच्या विनित कुबेरांशी कुराडेंची भेट झाली. चार पैसे ज्यादा खर्च करावे लागले तरी बेहत्तर, असा पवित्रा घेत प्रिंट-इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाहिरातीसाठी खर्च करायचा, असं ठरलं. झी वाहिनीवर तमाम गृहिणींच्या पसंतीस उतरत चाललेला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम सुरू होताच. परंतु कार्यक्रमाचा प्रायोजक असलेला ब्रॅण्ड अडचणीत आला होता. त्यानं धंद्यातून अंग काढून घेतलं होतं. तो निर्णायक क्षण कुबेर-कुराडेंनी टिपला. धाडसाने ‘होम मिनिस्टर’चं प्रायोजकत्व घेतलं. थोडा महागडाच व्यवहार झाला तो. परंतु यशाचा मार्ग गवसला. पैठणीचं ब्रॅण्डिंगही झालं. मुख्य म्हणजे, कार्यक्रमाचा सूत्रसंचालक (अँकर) ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणूनही मिळाला.
प्रारंभ केला, तेव्हा महिन्याला दहा-पंधरा पैठण्या बनवून देण्याइतकंच कारागिरांचं मनुष्यबळ पदरी होतं. मात्र, प्रायोजकत्व सुरू झालं, तशी मागणी वाढू लागली. दहा कारागिरांचे जागी शंभर-शंभर कारागीर पैठण्या बनवू लागले. ही वेळ कसोटी बघणारी होती. कारागिरांच्या कामाकडे लक्ष ठेवायचं आणि पैठणीखेरीजचंही असलेलं साडी मार्केट सांभाळायचं, ही तारेवरची कसरत होती. प्रसाद हा त्यांचा एकुलता एक मुलगा. सीए फायनल करत बसण्यापेक्षा प्रसादनं घरच्या व्यवसायात उतरावं, असं जनार्दनजींना वाटत होतं. प्रसादनं वेळीच निर्णय घेतला आणि तो जनार्दनजींना मदत करायला कंबर कसून उभा राहिला. जनार्दनजींनी मोहरा बदलायचा ठरवलं. नवं क्षेत्र जनार्दनजींना खुणावू लागलं होतं. बांधकाम व्यवसायात रग्गड पैसा आहे, हे ध्यानात येऊ लागलं होतं. क्षेत्र बदलायचं तर पुणं सोडून कोल्हापूर गाठावं लागणार होतं. आपल्या मूळ गावात जायचं होतं. कोल्हापूर शहरातला एक भूखंड ताब्यात येऊ पाहात होता, परंतु तिघा भावांपैकी एक जण नडत होता. कालांतरानं तोही पटला आणि तथास्तु कॉर्नरचा मार्ग मोकळा झाला. आता कोल्हापूरप्रमाणेच गोव्यातही वास्को विमानतळाच्या जवळ तथास्तुची नवीन इमारत उभी राहते आहे.
बऱ्याच वर्षांपूर्वी गदिमा-परांजपे-फडके या त्रिकूटाचा "जगाच्या पाठीवर' हा सिनेमा पाहिला होता, त्यातल्या ‘एक धागा सुखाचा’ या गाण्यानं रसिकांना अक्षरश: वेड लावलं होतं. गाणं चित्रित करण्यात आलं होतं, तुरुंगात असलेल्या आणि हातमागावर विणकाम करणाऱ्या कारागिरावर. त्यात एक ओळ होती, ‘या वस्त्राते विणतो कोण, एकसारखी नसती दोन’, ‘कुणा न दिसले त्रिखंडात या हात विणकराचे’. चित्रण जरी हातमागावर विणकाम करणाऱ्या कारागिरावरचं असलं, तरी ओळींमागचा भावार्थ वेगळाच होता. तो एका सार्वकालिक सत्याचा होता. कुराडेंच्या दुकानात पैठणी घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला त्या पैठणीतली, वा त्या भरजरी साडीतली कलाकुसर पाहिल्यानंतर असाच प्रश्न पडत होता. काय कारागिरी आहे, हे शब्द नकळत तोंडातून फुटत होते. अगदी स्वाभाविकच होतं ते. इतकं चांगलं विणकाम करणारा, नक्षी करणारा तो कलाकार कोण असेल, ही उत्सुकता त्यांच्याही मनात उत्पन्न होत होती. ती उत्सुकता कशी पुरी करायची, त्या कलाकाराला कसा न्याय आणि सन्मान मिळवून द्यायचा, याचा विचार कुराडेंच्या डोक्यात सारखा सुरू होता, आणि आजही असतोच.
‘तथास्तु’चं अर्थकारण समजून घेत असताना, पैठणीची गाैरवशाली परंपरा जाणून घेत असताना आणि त्याहीपेक्षा संस्कृती जपणाऱ्या उत्पादनाची निर्मिती प्रक्रिया समजून घेत असताना, मी तो कलाकारांविषयीचा प्रश्न त्यांना विचारलाही. त्याचं नेमकं उत्तर त्यांनी दिलं नाही, परंतु त्या कलाकारांविषयीची आदरयुक्त भावना त्यांच्या मनात खोलवर रुजली आहे, हे मला जाणवल्यावाचून राहिलं नाही.
sumajo51@gmail.com