आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमस्त गोखले, दुर्लक्षित गोखले !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑगस्टच्या दुसर्‍या पंधरवड्याच्या तोंडावर ‘द वीक’ नावाच्या इंग्रजी नियतकालिकाचा ‘ब्लडलाइन्स ऑफ हीरोज’ या शीर्षककथेचा विशेषांक प्रसिद्ध केला. लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, नेताजी सुभाषचंद्र बोस, अबुल कलाम आझाद, सरदार भगतसिंग यांच्यासारख्या पाच-पंचवीस राष्ट्रपुरुषांचे वारस आज नेमके काय करताहेत, याचा शोध घेण्याचा एक प्रयत्न या अंकातून ‘वीक’नं केला होता. या आमुखकथेतील एक राष्ट्रपुरुष गोपाळ कृष्ण गोखले. गोखले आणि टिळक तसे समकालीन. दोघंही पुण्याचे. गोखले नेमस्त, तर टिळक चळवळे. रस्त्यावर उतरून केलेली आंदोलनं आणि उभारलेल्या चळवळी हे टिळकांचं वैशिष्ट्य, तर संसदीय मार्गांचे शांततापूर्ण, अहिंसक लढे हे गोखले यांचं वैशिष्ट्य. स्वाभाविकपणेच गोखले यांचं व्यक्तिमत्त्व टिळकांपुढे फिकं पडलं.

गोखले यांचं निधन फेब्रुवारी १९१५मध्ये झालं. म्हणजे फेब्रुवारी २०१५हे गोखले यांचं स्मृतिशताब्दी वर्ष. गोखले यांना मुलगा नव्हता. त्यांचा पुढचा वारस म्हणजे, त्यांची कन्या काशी ढवळे आणि काशी यांचे सुपुत्र बळवंत ढवळे. बळवंत यांची पत्नी आभा. त्या ज्येष्ठ सनदी अधिकारी जे. एन. दीक्षित यांच्या कन्या. त्यांची मुलं म्हणजे श्रीधर, विद्याधर आणि ज्योत्स्ना. श्रीधर व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट, तर विद्याधर संयुक्त राष्ट्रांच्या सेवेत अमेरिकेमध्ये. त्यांना दोन मुलं, त्यातला एक अभिषेक भारतात राहून शिकणारा, तर दुसरा जयदेव अमेरिकेत शिकणारा. अभिषेक पुण्यातल्याच फर्ग्युसन महाविद्यालयात शिकतो, जे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटी या त्याच्या पणजोबांनी स्थापन केलेल्या संस्थेतर्फे चालवलं जातं. गोखले हे महात्मा गांधी आणि बॅ. जिना या दोघांचेही गुरू. ‘सर्व्हंट‌‌्स ऑफ इंडिया’ सोसायटीची स्थापनाही गोखले यांनीच केली. पुण्यात साथीचे आजार आल्यानंतर डेक्कन जिमखान्यावरच्या स्वच्छ मोकळ्या जागेत अनेकांनी बंगले बांधून राहायला सुरुवात केली, त्यात गोखलेही एक होते.

आजही ढवळे कुटुंब ज्या बंगल्यात राहतं, तो बंगला १९०८मध्ये गोखले यांनीच बांधून घेतलेला होता. त्या बंगल्यालाही आता १०६ वर्षं पूर्ण झाली. बंगल्याच्या आवारात आजही त्या काळी लावलेली आंब्याची झाडं आहेत, आणि दोन लोखंडी बाकंही आहेत. महात्मा गांधी ज्या बाकावर बसून गोखले यांच्याकडे राजकारणाचे धडे गिरवत, तेच ते बाक. गोखले यांचा अवघा एक पुतळा पुणे शहरात आहे, आणि गोखलेनगर नावाचं एक पुनर्वसन संकुल आहे तितकंच. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्याआधी भारतीय राजकारण्यांनी संसदीय लोकशाही समजून घेतली पाहिजे, असं गोखले मानत. गोखले इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते. तत्कालीन ब्रिटिश सरकारनं त्यांना ‘नाइटहूड’चा किताब देऊ केला होता, परंतु गोखले यांनी तो नाकारला होता. तो नाकारलेला किताब ब्रिटिश सरकारनं नंतर पाठवून दिला. बंगल्यातल्या एका भिंतीवर तो किताब आजही लटकतो आहे.

गोखले यांचं पुण्यातलं एक उत्तम स्मारक म्हणजे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स. त्यांच्या मृत्यूनंतर, परंतु स्वातंत्र्य प्राप्त होण्याआधीच ते स्मारक उभं राहिलं. त्यामुळे त्यांची स्मृती जपणारं स्वातंत्र्यानंतर उभं राहिलेलं, असं स्मारकच नाही. गोखले हे उत्तम संसदपटू होते. ‘हाऊस ऑफ कॉमन्स’च्या सन्माननीय सदस्यत्वासाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू होता. परंतु ते प्रत्यक्षात घडण्याआधीच त्यांचं निधन झालं. भारत स्वतंत्र झाल्यालाही आता ६८ वर्षं झाली, परंतु महात्मा गांधींचेही गुरू मानल्या जाणार्‍या गोखले यांचं साधं तैलचित्र संसदेत लावावं, असं सत्ताधारी पक्षाला कधी वाटलं नाही. सत्ताधारी पक्षात दीर्घकाळ वावरूनही टिळकांच्या वारसांनीदेखील त्यासाठी कधी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही.

बळवंत ढवळे हे गोखले यांचे नातू, मुलीचे चिरंजीव; ते सनदी सेवेत होते. भारतातील सर्वात वयस्कर सनदी अधिकारी असा त्यांचा उल्लेख ‘द वीक’नं त्या आमुखकथेत केला होता. परंतु त्याची सत्यता पडताळून पाहावी लागेल.

...आणि एका विद्यमान सनदी अधिकार्‍याची शताब्दी!
बळवंत ढवळे यांच्याविषयी तसा फारसा उल्लेख ‘द वीक’च्या अंकात नाही, तो इंटरनेटवर शोधूनही सापडला नाही. त्यामुळे बळवंत ढवळे नेमके किती वयाचे, याची काहीच कल्पना येऊ शकली नाही. हयात सनदी अधिकार्‍यांमधले ते सर्वाधिक ज्येष्ठ मानावे की नाही, याचीही खात्री पटवता आली नाही. परंतु ‘द वीक’ हे नियतकालिक ज्या केरळमधून प्रकाशित होतं, त्या केरळमधलेच एक सनदी अधिकारी सी. थॉमस यांनी मात्र एप्रिल २०१४मध्ये वयाची शंभरी पूर्ण केली, ही घटना दृष्टीआड करता येणारी नाही.

थिरुअनंतपुरममधील कौडियार भागात थॉमस आजही राहतात. ते सनदी सेवेत वावरले ते त्रावणकोर सिव्हिल सर्व्हिस, इंडियन सिव्हिल सर्व्हिस आणि इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस अशा तिन्ही सर्व्हिसेसद्वारे. १९७३मध्ये केरळ सरकारचे मुख्य सचिव म्हणून थॉमस सेवानिवृत्त झाले. १९७८-७९मध्ये थॉमस यांच्या सन्मानार्थ एका समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. इंडियन एअरलाइन्सच्या विमानानं थॉमस त्या समारंभात सहभागी होण्यासाठी म्हणून निघाले होते. विमानानं उड्डाण केल्यानंतर ४० मिनिटांनी विमानाचा संपर्क तुटला, प्रवाशांना काय घडतं आहे, याची कल्पना देण्यात आली. विमानाला प्रत्यक्ष अपघातही झाला, परंतु सुदैवानं थॉमस त्यातून बचावले. इकडं अपघाताचं वृत्त कळल्यानंतर थॉमस यांच्या सन्मानार्थ जमलेले सर्व सनदी अधिकारी परतले, मुद्दाम बनवून घेतलेला केक परत करावा लागला. आणि सुखद धक्का देणारी थॉमस जिवंत असल्याची बातमी आली. त्यांच्या त्या अपघातालाही तब्बल तीन तपं होऊन गेली. ‘आपुले मरण पाहिले म्यां डोळा’ अशीच थॉमस यांची अवस्था झाली असावी. २५ एप्रिल २०१४ला त्यांनी ९९ वर्षं पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण केलं, तेव्हा ही स्मृतींच्या पडद्याआड गेलेली आठवण पुन्हा उसळून आली. आणि ‘द वीक’च्या त्या अंकाच्या निमित्तानं सर्वाधिक वयाचे सनदी अधिकारी म्हणून थॉमस यांचं नाव पुन्हा एकदा स्मृितपटलावर आलं
sumajo51@gmail.com