आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते अस्फुट स्मित-हास्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्यासा, साहब बीवी और गुलाम आणि कागज के फूल या अजरामर कलाकृतींची निर्मिती करणारे लेखक-दिग्दर्शक-अभिनेता गुरुदत्त यांच्या ५०व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून "प्रभात रुपवाणी' आणि "ग्रंथाली' यांच्या सहयोगाने सुधीर नांदगांवकर संपादित "गुरुदत्त' नावाच्या लेखसंग्रहाचे १३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. त्या संग्रहातील लेखाचा हा संपादित अंश...
१०ऑक्टोबर १९६४! गुरुदत्त यांच्या निधनामुळे हा दिवस भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला एक अशुभ दिवस ठरला! या घटनेला २०१४मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. चित्रपट-समीक्षक व त्या अशुभ दिवसाचा साक्षीदार म्हणून, ५० वर्षे उलटली तरी तो दिवस माझ्या स्मरणात आजही शिलालेखासारखा कोरला गेला आहे.
आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ दैनिकात मी चित्रपट-समीक्षक म्हणून काम करत होतो. निरनिराळ्या दिग्दर्शकांच्या मुलाखती मी घेत होतो. सिनेमाच्या साप्ताहिक पार्ट्यांतून हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेकांना भेटत होतो. त्यांच्याशी बोलत होतो. पण गुरुदत्तांना भेटायची संधी येत नव्हती. स्वतःच्या चित्रपटाचा प्रीमियर सोडून गुरुदत्त कधीच कोणत्या फिल्मी समारंभात किंवा पार्टीत जात नसत. मग त्यांना भेटायचे कसे?
एकेदिवशी अचानक नाझ सिनेमाच्या परिसरात गुरुदत्तांचा प्रसिद्धी अधिकारी राजदान भेटला. मला गुरुदत्त यांना भेटायचे आहे, अशी इच्छा त्याच्याजवळ व्यक्त केली. तो म्हणाला, “सध्या गुरुदत्त लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर गेलेत. पुढच्या आठवड्यात ते परतले की मी तुमची भेटीची वेळ ठरवतो.”
पुढचा आठवडा उगवला तो गुरुदत्तांच्या आकस्मिक निधनाची बातमी घेऊनच! गुरुदत्तांची भेट होऊ शकली नाही, ही हळहळ मला कायमची लागून राहिली.
गुरुदत्तांचे निधन सकाळी साडेसहा वाजता झाले. तेव्हा फोन मिळणे दुष्कर होते. मोबाइल तर नव्हतेच. तरीही गुरुदत्तांच्या निधनाची बातमी वा-यासारखी मुंबईभर पसरली. मलाही कळली. मी तेव्हा गिरगावात राहत असे. तसाच टॅक्सी करून ‘आर्क रॉयल’वर पोहोचलो, तेव्हा ११ वाजले होते. आर्क रॉयलच्या तिस-या मजल्यावर पोहोचलो, तेव्हा तेथे २०-२५ लोक होते-सारेच अनोळखी. एवढ्यात राज कपूर आला. तिथे येऊन पोहोचलेला चित्रपट व्यवसायातला हा पहिला नामवंत कलावंत. नेहमी उशिरा उठणारा, पण ही वार्ता ऐकून सर्वप्रथम तोच ‘आर्क रॉयल’वर पोहोचला.
वास्तविक गुरुदत्त व राज कपूर यांचा काहीच संबंध नव्हता. दोघांचेही आपापले स्टुडिओ होते. दोघेही अमर्याद पिणारे. राजला नर्गिस सोडून गेल्याचे दुःख, तसाच गुरुदत्तांना वहिदा रहमान सोडून गेली, तो धक्का. दोघेही अभिनेते. एवढेच साम्य. अन्यथा गुरुदत्त व राज कपूर यांचा सिनेमा-निर्मितीचा आलेख आणि दृष्टिकोन पूर्णतः भिन्न होता.
स्वाभाविकच मला थोडे आश्चर्य वाटले.
नंतर बरेच दिवसांनी मला कळले की, ‘संगम’ निर्माण करताना राज कपूरने पटकथेबाबत गुरुदत्तांचा सल्ला घेतला होता. ‘संगम’च्या दुस-या भागावर गुरुदत्तांची छाप जाणकाराला ओळखता येते.
राज कपूरबरोबरच आम्ही चार-पाच पत्रकारांनी गुरुदत्तांचे अखेरचे दर्शन घेतले. तेव्हा माझ्यावर पुन्हा एकदा चकित व्हायची वेळ आली. गुरुदत्त बिछान्यावर शांतपणे झोपले आहेत, असे भासत होते. जणू काही त्यांना काही तरी सुंदर स्वप्न पडत असावे. त्यांच्या चेह-यावर निरागस, अस्फुट स्मित-हास्य विलसत होते. मूल जन्मल्यानंतर ते डोळे उघडेपर्यंत एक निरागस भाव नवजात बालकाच्या चेह-यावर उमटलेला असतो, तसाच काहीसा निरागस भाव गुरुदत्तांच्या मुद्रेवर होता.
५० वर्षे उलटून गेली, तरी गुरुदत्तांच्या चेह-यावरचे ते अस्फुट निरागस स्मित माझ्या डोळ्यांसमोर तसेच्या तसे स्पष्टपणे तरळते आहे. तो शांत चेहरा, मिटलेले डोळे आणि ते अस्फुट स्मित यामुळे या कुडीतून प्राण उडून गेला आहे, असे वाटतच नव्हते. गुरुदत्त चिरनिद्रा अनुभवत होते. तेवढ्यात कोणी तरी गुलाबाची फुले आणली.
राज कपूरने तो पुडा स्वतः फोडला. त्यातले एक-दोन गुलाब उचलून गुरुदत्तांच्या चरणांवर वाहिले. ‘फिल्मफेअर’, ‘स्क्रीन’चे पत्रकार, मी स्वतः, आणखी एक-दोन पत्रकार तेथे होतो. राज कपूर आमच्याकडे वळून म्हणाला, “काल रात्री आमचं फोनवर बोलणं झालं. गुरुदत्तांशी बोललेला मी शेवटचा माणूस!”
गुरुदत्त या जगात नाहीत, याची वेदना राज कपूरच्या चेह-यावर उमटली होती.
गर्दी वाढू लागली. ओळखीचे सिनेपत्रकार, फोटोग्राफर येतच होते. आम्ही सारेच खाली लॉनवर उभे होतो. पण गुरुदत्तांची एकही नायिका तोपर्यंत आलेली नव्हती.
फोटोग्राफर श्याम औरंगाबादकर म्हणाला, “त्यांना मेकअप करायला वेळ लागतो. त्यानंतर पांढरी साडी नेसून त्या फोटो काढायला येतील.”
वर गुरुदत्तांच्या दुस-या रूममध्ये नातेवाईक बसले होते. गीता दत्त उसासून रडत होती, तिच्या डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते, असे कोणी तरी सांगितले.
एवढे होईपर्यंत १२ वाजत आले. कोणी तरी येऊन सांगितले, अंत्ययात्रा लवकर सुरू होणार नाही. शव पोस्टमॉर्टेमला पाठवले जाणार आहे. गुरुदत्तांच्या त्या अस्फुट निरागस स्मितात बुडालेला मी; माझ्यातला पत्रकार जागा झाला. तडक मी वरळीच्या ‘मराठा’ कार्यालयात पोहोचलो. आमच्या फोटोग्राफरला फोन करून आर्क रॉयलवर जायला सांगितले. एवढ्यात ‘मराठा’चे संचालक व्यंकटेश पै यांचे मला बोलावणे आले. व्यंकटेश पै कारवारी सारस्वत. गुरुदत्तही कारवारी सारस्वत. म्हणून त्यांना त्यांच्याबद्दल जिव्हाळा होता. मला बोलावून त्यांनी काय घडले, त्याची माहिती घेतली. त्यांच्या चेह-यावर उदासीची छाया पसरली. मी पुन्हा संपादकीय कार्यालयात येऊन एक-दोघांच्या प्रतिक्रिया घेतल्या. बातमी तयार केली. गुरुदत्तांचे अल्पचरित्र, चित्रपट-सूची तयार केली आणि उदास चेह-याने कार्यालयातल्या खुर्चीवर बसून राहिलो. जेवायचीही आठवण नव्हती. पोस्टमॉर्टेम होणार असल्याने अंत्ययात्रा उशिरा सुरू होणार, असा माझ्या पत्रकार मित्राचा ‘आर्क रॉयल’च्या जवळच्या हॉटेलमधून मला फोन आला.
चार वाजून गेले होते. पुन्हा त्या अंत्ययात्रेत सामील व्हायला, माझे मन धजेना. तसाच उठलो. हॉटेलमध्ये पोटपूजा केली. कार्यालयात परतलो. तोपर्यंत फोटोग्राफर पोस्टमॉर्टेला शव नेण्याआधीचे फोटो घेऊन आला होता.
दुस-या दिवशी सकाळच्या वृत्तपत्रांत ‘गुरुदत्तांची आत्महत्या’ अशा शीर्षकाखाली बातम्या आल्या. ‘मराठा’च्या बातमीत मी बुद्धिपुरस्सर आत्महत्येचा उल्लेख टाळला होता.
याला कारणही तसेच होते. ‘आर्क रॉयल’मध्ये मी दोन-अडीच तास होतो. तेव्हा मला समजले होते, आदल्या रात्री गुरुदत्त अबरार अल्वींबरोबर ‘बहारें फिर भी आएँगी’च्या पटकथेवर चर्चा करत होते. अबरार सीन लिहीत होते. गुरुदत्त ते दुरुस्त करत होते. मध्येच ११ वाजता गुरुदत्त आपल्या खोलीत गेले. पुन्हा येऊन चर्चेला बसले. रात्री बारा वाजता दोघे जेवायला बसले. गुरुदत्त जेवणाच्या टेबलावर बसले, पण जेवलेच नाहीत. अबरार यांना पुढचा सीन लिहायला सांगून ते झोपायला आपल्या बेडरूममध्ये निघून गेले. अबरार पुढचा सीन लिहून रात्री एक वाजता आपल्या गाडीतून जुहूला आपल्या घरी गेले.
माझ्या मनात विचार आला. गुरुदत्त हा मनस्वी कलावंत होता. त्या आधी त्याने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या बातम्या आल्या होत्या, हे खरे असले तरी कलावंत जेव्हा नवनिर्मितीत दंग असतो, तेव्हा आत्महत्येचा विचार त्याच्या मनात येणारच नाही.
इथे तर गुरुदत्त पटकथा-लेखनात मग्न होते. मी माझ्या बातमीत आत्महत्येचा उल्लेखही केला नव्हता.
दुस-या दिवशी माझ्या सहका-यांनी मला वेड्यात काढले. दोन कारणांसाठी- एक तर आत्महत्येचा उल्लेख माझ्या बातमीत नव्हता आणि दुसरे म्हणजे गुरुदत्तांचा फोटो ते बिछान्यावर झोपले आहेत, असा होता. मोठ्या व्यक्तींचे निधन झाल्यावर त्यांच्या मृतदेहाचा फोटो कोणी छापत नाहीत, असा संकेत होता, म्हणे.
माझे या टीकेकडे लक्ष नव्हते. एक तर गुरुदत्तांच्या चेह-यावरचे निरागस स्मित माझ्या डोळ्यांत तरळत होते. आणि माझी ठाम खात्री होती, आणि आजही आहे की गुरुदत्तांनी आत्महत्या केली नाही. १९६४च्या अखेरीला केव्हा तरी मुंबईच्या कॉरोनर कोर्टाने निर्णय दिला, झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेऊन गुरुदत्तांनी आत्महत्या केली. माझे मन आक्रंदून म्हणाले, ‘छे छे! ती आत्महत्या नव्हतीच.’