आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्ध संवेदनशील सर्बियन सिनेमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडचा सर्बियन सिनेमा काय आहे, कसा आहे, त्याची झलक कळावी यासाठी रिपब्लिक ऑफ सर्बिया, नॅशनल फिल्मअर्काइव्ह ऑफ इंडिया आणि आशय फिल्म क्लब पुणे यांनी सर्बियन चित्रपट महोत्सव आयोजित केला होता. सर्बियन चित्रपट किती संवेदनशील आहे, चांगला आहे, प्रगत आहे, याची कल्पना या चित्रपट महोत्सवातून येते.

शेवटी तरुण मुलाने आपले म्हणणे खरे केलेच. म्हातारी आई आणि छोट्याशा वस्तीवरील जीव लावणारी माणसे या सर्वांची इच्छा डावलून, जमिनीचा आपला छोटासा तुकडा त्याने विकून टाकला आहे. आलेल्या पैशातून म्हाताऱ्या आईच्या वाटणीचे पैसे खिन्न होऊन बसलेल्या आईच्या पुढ्यात त्याने टाकलेत, आणि आपली बॅग उचलून तो आईला, वस्तीला सोडून दूर शहराकडे निघून चाललाय. शून्यात नजर लावून बसलेल्या आईच्या डोळ्यांसमोर वाऱ्यामुळे धूळ उडतेय आणि त्या नोटाही उडतउडत तरंगत दूर जाताहेत...
या दर्शकांना हतबुद्ध करणाऱ्या चित्रचौकटीवर सिनेमा संपतो. 

मराठवाड्यातील वा देशाच्या कुठल्याही दुष्काळी, गरीब प्रदेशातील लोक खेड्यातील आपली मालमत्ता विकूनटिकून हजारोंच्या संख्येने शहराकडे स्थलांतर करतात. त्या प्रदेशाचा हा सिनेमा नाही. त्या लोकांचा हा सिनेमा नाही. तिथून हजारो किलोमीटर्स दूर असलेल्या ‘सर्बिया’ नामक एका छोट्याशा देशातील हा सिनेमा आहे. त्याचे नाव आहे, ‘विदरिंग’. त्याला २०१३मध्ये अथेन्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकपसंतीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. दिग्दर्शक आहेत मिलोस पुसीक आणि कलावंतांमध्ये आपल्या राज कपूरची आठवण करून देणारा तिकडचा प्रख्यात नट आहे, ब्रानिस्लाव ट्रिफोनोविक... ‘विदरिंग’ म्हणजे हळूहळू विरत जाणे, झिजत जाणे, संपत जाणे. बहुतांश लोकांच्या, बहुतांश स्वप्नांच्या वाट्याला हे विदरिंग येत असतं का? देश वेगळा, भाषा वेगळी, कलावंतांचे रंगरूप वेगळे. परंतु माणसं, माणसांची स्वप्नं, त्यांचं विरत जाणं हे जगाच्या पाठीवर सर्वत्रच चालू नाही काय?

अलीकडचा सर्बियन सिनेमा किती संवेदनशील होत चालला आहे, त्याचे हे एक उदाहरण. काहीसा असाच आशय व्यक्त करणारा अलीकडचा आणखी एक चित्रपट आहे, ‘आईस’. या चित्रपटासही २०१३च्या सायप्रस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती असे तीन पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचे दिग्दर्शन केलेय हेलेना बाझिक योसीक नामक एका गुणी तरुणीने. सद्यकालीन सर्बियन चित्रउद्योगातील हे एक प्रतिभावंत नाव. माणसाचं आयुष्य आशानिराशेच्या लाटांवर सतत हेलकावे खात पुढे जात असतं. मांजराने उंदराला खेळवावे, तशी नियती माणसाला खेळवत असते. प्रयत्न करणं, आशावादी दृष्टिकोन ठेवणं एवढंच माणसाच्या हातात असतं; बाकी त्याच्या हातात काहीही नसतं, या त्रिकालाबाधित सत्याचा सुरेख अाविष्कार एका हृदयस्पर्शी कथेतून दिग्दर्शिकेने या चित्रपटात केलेला आहे. यातल्या नायकाचं ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून ड्रायव्हर बनायचं स्वप्न आहे. ते लायसन्स मिळालं तरच त्याची प्रेयसी त्याला मिळणार असते. पण त्याचं हे छोटंसं स्वप्नही नियती पूर्ण होऊ देत नाही. त्याच्या वडलांचा खाणकाम करताना अंगावर दरड कोसळून अकाली मृत्यू झालाय. त्याच्या विधवा आईवर शेजारचा एक माणूस मनापासून प्रेम करत असतो. पण लाजेकाजेखातर, समाजाखातर तिला हे प्रेम माहीत असूनही स्वीकारता येत नाही. शेवटी त्याचं बहारदाररीत्या फुललेलं, हातातोंडाशी आलेलं गव्हाचं पीक गारपिटीत सापडून हातचं जातं. हातात उरतात त्या नुसत्या गारा. निर्दयी नियतीच्या दुष्ट खेळातील या पात्रांच्या हाती काहीच उरत नाही, अशी ही सुन्न करणारी कहाणी आहे. स्वत:चा काहीही दोष नसताना माणसाला नियतीचे फटके खावे लागतातच ना!

अलीकडचा सर्बियन सिनेमा काय आहे, कसा आहे, त्याची झलक कळावी यासाठी रिपब्लिक ऑफ सर्बिया, नॅशनल फिल्मअर्काइव्ह ऑफ इंडिया आणि आशय फिल्म क्लब पुणे यांनी सर्बियन चित्रपट महोत्सव आयोजित केला होता. त्यात दाखवलेल्या एकूण सात चित्रपटांपैकी काही चित्रांची झलक इथे पेश केलेली आहे. परंतु त्यावरून सर्बियन चित्रपट किती संवेदनशील आहे, चांगला आहे, प्रगत आहे, ते नक्की कळते. सर्बिया हा देश लोकसंख्या, आकारमान आणि त्याचे जागतिक राजकारणातील स्थान अशा अनेक संदर्भात एक छोटा देश आहे. तिथे तयार होणाऱ्या चित्रपटांची संख्याही मोजकीच असते. परंतु आशयविषय, तांत्रिक सफाई, हाताळणी हे खूप सफाईदार असते, हे नक्की. पूर्वीच्या युगोस्लाव्हिया या देशाचे विभाजन होऊन त्याचे जे सहा देश झाले, त्यातला मुख्य महत्त्वाचा देश म्हणजे सर्बिया. बेलग्रेड हे त्याचे राजधानीचे शहर.
युगोस्लाव्हिया म्हटले की ताबडतोब नाव आठवतेे, मार्शल टिटो यांचे. मार्शल टिटो हे भारताचे पंतप्रधान पंडित नेहरूंचे जवळचे स्नेही होते. जागतिक राजकारणात अलिप्त राष्ट्रांची संघटना उभारण्यात नेहरू, नासेर, टिटो या तीन नेत्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. युगोस्लाव्हियाच्या दीर्घ इतिहासात विशेषत: अर्वाचीन काळापासूनच्या इतिहासात तेथील ओटोमन साम्राज्य, हंगेरियन राजवट आणि ओटोमन साम्राज्यातील संघर्ष, इ.स. १८१७च्या सुमारास युगोस्लाव्हियात झालेली राज्यक्रांती, पहिले व दुसरे महायुद्ध, त्यानंतर मार्शल टिटो यांचे नेतृत्व आणि त्यांचे तत्त्वज्ञान, युगोस्लाव्हिया आणि जर्मनी या दोन देशांतील ताणतणाव अशा ठळक घटना, घडामोडी महत्त्वाच्या आहेत. 

१९९०च्या दशकात बऱ्याच उलथापालथी होऊन ‘सर्बिया’ हा देश अस्तित्वात आला. बेलग्रेड शहर ही सर्बियाची राजधानी. दक्षिणपूर्व युरोप खंडातील हे एक स्ट्रॅटेजिक महत्त्व असणारे शहर. डॅन्युब आणि सावा या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसलेले आहे. या ऐतिहासिक शहर आणि परिसराने अनेक राजवटी पाहिल्या. नेते पाहिले. तेथील एेतिहासिक किल्ला पर्यटकांचे एक आकर्षण केंद्र आहे.

बेलग्रेड हे शहर सर्बियन चित्रपट उद्योगाचेही माहेरघर आहे. पूर्वी युगोस्लाव्हिया होता तेव्हापासून या देशात एक चित्रपटसंस्कृती विकसित झालेली आहे. हॉलीवूड चित्रपट उद्योगाशीही त्यांचे उत्तम संबंध होते. योगदान होते. आज सर्बियन चित्रपटमाध्यमांचे प्रगत अभ्यासक्रम शिकविणारी महाविद्यालये आहेत. शिक्षणसंस्था आहेत. चित्रपटसंग्रहालये आहेत. तिथे चित्रपटमाध्यमाच्या जन्मापासूनच्या म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या अनेक फिल्म जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. चित्रपटमाध्यमाचे उत्तम अभ्यासक, शिक्षक सर्बिया देशात आहेत. चित्रपटमाध्यमाच्या शक्तीची त्यातील अफाट शक्यतांची मार्शल टिटो आणि या भागातील अन्य नेत्यांना फार चांगली जाण होती. 

मार्शल टिटो आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही चित्रपटांचे विलक्षण चाहते होते. त्यांच्या निवासस्थानी सुसज्ज चित्रपटगृह होते. मार्शल टिटोंनी सिनेमाच्या विकासासाठी म्हणूनच भरीव प्रयत्नही केले. राजाश्रय असला, राजकारणाच्या निर्णयप्रक्रियेतील वरिष्ठ मंडळींना सिनेमाचे ज्ञान आणि रुची असली की ते क्षेत्र चांगली प्रगती करते. पूर्वीच्या युगोस्लाव्हियाच्या आणि आताच्या सर्बियाच्या सिनेसृष्टीस म्हणूनच राजकीय नेते, राज्यकर्ते यांचा खूप फायदा झालेला आहे.

सर्बियन चित्रपटांची दरसाल तयार होणारी संख्या खूप मर्यादित आहे. पण त्याची गुणवत्ता उच्च दर्जाची आहे, यात वाद नाही.

लेखकाचा संपर्क - ९७६६५६८२९०
sevekar.sr@gmail.com
बातम्या आणखी आहेत...