आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुझको अपने गले लगा लो... (सुहास मुळे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक झुलू दंतकथा आहे. आपल्या ओंजळीमध्ये अस्तंगत होणारा सूर्य घेऊन, समुद्रभर हेलकावे खाणारी एक देवता असते, तिचं नाव चंद्रदेवता! ही शापभ्रष्ट देवता लाटालाटांवर पिंगा घेत आर्त गाणी गाते, आणि कधी कधी तर आपल्याच गाण्यानं बेचैन होऊन हुंदके देते. चंद्रदेवतेचं हे गाणं म्हणजेच, समुद्राचा निनाद आहे, असं म्हणतात. तंबोऱ्याच्या घनगंभीर खर्जासारखा सतत घोंगावणारा!! म्हटलं तर साथसंगत करणारा... म्हटलं तर आपण किती क्षुद्र आणि एकाकी आहोत, याची जाणीव करून देणारा...

मुंबईतल्या जोगेश्वरीच्या (पश्चिम) एका जुनाट इमारतीच्या पायऱ्या चढून परवा मी अशाच एका चंद्रदेवतेच्या भेटीला आलो होतो, तिचं नाव ‘मुबारक बेगम’! भेटीचं कारण, निश्चितच आनंददायी नव्हतं. बेगम सध्या अतिशय विषण्ण आणि हतबल जीवन जगत आहेत, उपचारांसाठी रसिकांना आर्थिक मदत करण्याची आर्त साद घालत आहेत, अशी मनाला चर्र करणारी बातमी विविध चॅनेलवरून दाखवली जात होती. ती बातमी पाहून माझे पाय आपसूकच अतिशय वेगाने तिकडे वळले, ते अतिशय तातडीची आणि भरघोस मदत घेऊनच. त्या जीर्णशीर्ण पायऱ्या चढताना एका क्षणात बेगमने एके काळी गायलेली अनेक गीतं माझ्या कानाभोवती मधमाशांगत घोंगावत होती. जी गाणी आज पूर्णतः विस्मरणाच्या पडद्याआड धुळावली आणि निपचित पडली आहेत. चुकूनमाकून कुठे रेडिओवरून वाजली, तरी आजकाल हिंस्र श्वान मागे लागल्यागत निवेदन करणाऱ्या रेडिओ जॉकीला ते गाणे कुणी लिहिले? कुणी संगीतबद्ध केले? आणि कुणी गायले? असा ‘फालतू’ तपशील सांगण्यामध्ये बिलकूल स्वारस्य नसते. त्यामुळे निव्वल टाईमपास म्हणून गाणी ऐकणाऱ्यांना कोण कुठली मुबारक बेगम, हा रहस्यमयी संशोधनाचा विषय असणं साहजिक आहे.
याला कारण म्हणजे, ती कलाकृती ज्या थोर माणसांच्या एकत्रित सृजनामधून जन्माला आली, त्या कलाकारांचा उल्लेखदेखील न करता तो वेळ इतर फालतू चॅटिंग करण्यामध्ये घालणारी ही माध्यमे नकळत त्याच कलाकारांचा अनुल्लेखाने अक्षम्य अपमान करताना दिसतात. हे अगदी अधोरेखित करून सांगण्याचे कारण म्हणजे, बेगमसाठी आर्थिक
मदत गोळा करताना मला लोकांना त्यापैकी काही गाणी सुरात म्हणून दाखवून त्याची आठवण करून द्यावी लागली, तेव्हा समोरच्या व्यक्तींची प्रतिक्रिया अशी मिळाली, ‘अरे वा हे गाणं मुबारक बेगमने गायलं आहे?आम्ही ऐकतो नेहमी. पण माहीतच नव्हतं.’ असो...
चित्रपटसृष्टीच्या देदीप्यमान झगमगाटाच्या मागे एका विमनस्क आणि एकाकी अंधकाराची शून्य पोकळी असते. रसिकांच्या मनावर कोणे एके काळी अधिराज्य करणाऱ्या कलाकारांचे त्या काळडोहामध्ये असं घरंगळत जाणं, कितीही क्लेशदायक असलं, तरी अपरिहार्यपणे ते स्वीकारावंच लागतं. राहते ती फक्त आठवण नावाची पडछाया! तीदेखील हळूहळू धूसर होत जाते. वयाच्या १५व्या वर्षी १९५१मध्ये ‘आईए’ नावाच्या चित्रपटामध्ये बेगमने लतादीदींबरोबर ‘चल री सखी मोहे आने लगी अंगडाई’ हे गीत पहिल्यांदा गायले. त्यानंतर तब्बल चार-पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कमाल अमरोहींचा ‘दायरा’ नावाचा चित्रपट आला. त्यामध्ये बेगमने चक्क सर्वच्या सर्व म्हणजे सात गाणी गायली होती. त्यानंतर लगेचच एस. डी. बर्मनदांकडे ‘देवदास’साठी, तर बिमल रॉयकडे ‘मधुमती’साठी बेगमची निवड झाली होती. परंतु नशिबाचा दरवाजा पाहिजे तसा आणि पाहिजे तेवढा, उघडला गेलाच नाही. प्रत्येक कलाकाराच्या कुंडलीमध्ये ‘संघर्ष’ नावाचा जो दहावा ग्रह आगमन करतो, तो काहींना जन्मभर वक्रीच राहतो. तसंच काहीसं बेगमचं झालं. कारण १९६१मध्ये झळकलेल्या ‘हमारी याद आयेगी’च्या शीर्षक गीताने बेगम एका रात्रीमध्ये स्टार झाल्या. बेगमचा तो आर्त स्वर आजही रसिकांचं काळीज चिरून जातो, यात शंकाच नाही. त्यानंतर ‘मुझको अपने गले लगा लो’ हे ‘हमराही’चे शंकर जयकिशनचे गाणे प्रचंड गाजले. ‘यह दिल किसको दूँ?’मधले ‘नींद उड जाए तेरी’ हे गाणं तर माझं आजही आवडतं गीत आहे, असं बेगम आवर्जून सांगत होत्या.
त्याच कालखंडामधलं ‘मेरे आसूओंपे ना मुस्कुरा’ आणि ‘बेमुर्वत बेवफा’ ही गाणी म्हणजे दीपस्तंभासारखी आजही दूरवर उभी आहेत. भावनांच्या सागरामध्ये भरकटलेल्या गलबतांना भावनिक साथ करणारा, अश्रू ढाळणाऱ्यांच्या पाठीवर हात ठेवून मीदेखील तुझ्या बरोबर आहे, असा आभास निर्माण करणारा बेगमचा आर्त, तरीही धारदार असलेला स्वर हळूहळू संगीताच्या वादळांमध्ये विसावत गेला. १९६८मध्येच फिल्मी जगतातून बोलावणे अचानक अवेळी वयाच्या ३०व्या वर्षीच बंद झाले. परिणामतः आर्थिक विवंचना ताबा घेऊ लागली आणि त्यात भर म्हणून यजमानांनी तलाक घेतला. जमीन दुभंगली, आकाशही फाटलं! कोणतंही उत्पन्नाचं साधन राहिलं नाही, तरीही कसेबसे आपल्या दोन मुलांना घेऊन १९६८ ते २०१५ ही जवळजवळ ४७ वर्षांची घोर तपश्चर्या पार केली. विपरीत परिस्थितीशी झगडण्याची ही हद्द झाली. परंतु एक सुखाची झुळूक म्हणून २००१मध्ये मी बेगमवर वर्तमानपत्रामध्ये असाच एक लेख लिहिला होता. सुदैवाने तो खा. सुनिल दत्त यांच्याकडे व माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या हाती पडला आणि बेसहारा जिन्याखाली राहणाऱ्या बेगमला सरकारी कोट्यातून छोटासा फ्लॅट मिळाला. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीत बेगम अश्रूपूर्ण डोळ्यांनी माझा हात हातात घेऊन म्हणाल्या, ‘न जाने किस जनमके तुम मेरे क्या हो, मेरी आवाज सिर्फ तुम तक ही क्यो पहुचती है? कहाँ गये वो तमाम रईसजादे और चाहनेवाले?’ या प्रश्नांवर मी बेगमला काय समजावू? काही प्रश्नांचं उत्तरंदेखील एक प्रश्नच असतो. नाहीत उत्तरं ज्यांची, प्रश्न ते छळतात का? मिळतात उत्तरं ज्यांची, अंतरी ते जळतात का? हेदेखील यक्षप्रश्नच म्हणायचे.
चित्रपटसृष्टी म्हणजे दुधावर आलेलं शेत नाही किंवा झुळझुळ झरे वाहणारं गावं नाही. तिथे अस्तित्व टिकविण्यासाठी रोज रग्गड यशाच्या गल्लाभरू पावत्या फाडाव्या लागतात. अशा पावत्या फाडणं, हे संवेदनशील हृदयाचं काम नाही. मग त्या दृष्टीनं कुचकामी ठरलेल्या हृदयांचा वास तिथे लपून बसलेल्या व्यावसायिक लांडग्यांना अचूक लागतो आणि क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाते. आज वयाच्या ८०व्या वर्षी बेगम आयुष्याची वजाबाकीच दाखवणारी बेरीज करीत जुन्या आठवणींना उजाळा देत होत्या. १९७१मध्ये अहमदनगरमध्ये त्यांनी चक्क मोहम्मद रफी, मन्ना डे व तलत महमूद यांच्याबरोबर एक कार्यक्रम दिल्याची आठवण सांगितली. पण तीदेखील थोडी कटूच निघाली; कारण त्या म्हणाल्या की, ‘प्रोग्राम, खत्म होने के बाद, ऑर्गनायजर बगैर पैसे दिए लापता हो गया।’
आज एवढेच म्हणावेसे वाटते की, लाखो रुपयांची निव्वळ हौशी उधळण करून तथाकथित संगीत मैफली आयोजित करणाऱ्या गोंडस नावाच्या संस्था, त्यामधले ते रसिक आणि कार्यकर्ते, जे कार्यक्रमांदरम्यान प्रत्यक्ष कलाकारांपेक्षाही जास्त भारी शेरवान्या आणि झब्बे पायजमे घालून, अत्तरं शिंपडून उगीचच इकडे-तिकडे मिरवतात. वाह! वाह!! म्हणतात. त्यांनी अशा वेळी एक छदामाचीदेखील मदत न करणे म्हणजे, त्यांचा तो खोटा लब्धप्रतिष्ठीतपणा असल्याचे स्वतःच सिद्ध केल्यासारखे आहे. लाखो रुपयांचे प्रायोजकत्व ते नक्की कुणाची घरं भरण्यासाठी मिळवतात, हे एक उघडं रहस्य आहे. म्हणून हेच का ते संगीतप्रेमी? असा प्रश्नही पडतो.
बेगम मात्र आजही म्हणत आहेत की, ‘हम हाले दिल सुनायेंगे तुम सुनिए के, न सुनिए, सौ बार ये दोहराऐंगे’ बेगमने आपल्या प्रत्येक कलाबाजीची किंमत जबर मोजली. म्हणून तिच्यामधल्या डौलालासुद्धा आंतरिक व्यथेची किनार लाभली. मुळात बेगमची तहजीब भ्याड माणसाची नाहीच. एकट्या निःशस्त्र हातांनी आयुष्याशी सामना करणाऱ्या धुंद, मनस्वी कलाकाराची ती फकीरमस्ती आहे. बेगमने आपलं दुःख सुरात मांडलं आणि जगण्याची वेदना उन्मादीपणानं सेलिब्रेट केली.
शेवटी बेगमला हुंदका अनावर झाला. त्यांच्या रास्त अपेक्षाभंगाला फुंकर म्हणून त्यांच्याजवळून उठता उठता म्हणालो, ‘बेगम आपण नकारात्मतेचा विचारही करता कामा नये, कारण ही दुनियेची फार पुराणी रीत आहे. याबद्दल एक शायर म्हणतो,

मौसम के मिजाज बदलने पर,
परिंदे भी अपने ठिकाने बदल लेते है।
कौन किसका साथ देता है आखीर उम्रभर दोस्तो?
लोग तो जनाजे में भी कंधे बदलते रहते है।’
काळाचा पडदा कितीही झिरमिरीत असला, तरी तो निष्ठूरपणे अपारदर्शक असतो. हा एक विरोधाभास आहे. ज्या बेगमचं समग्र व्यक्तिमत्त्व जगासमोर आलंच नाही. त्या बेगमचं गम त्यांना कधी समजायचं?
सुहास मुळे
group_express@yahoo.co.in
....................

मदतीची प्रतीक्षा
बेगमला मदत द्यायची असेल तर त्यांनी श्रीमती मुबारक बेगम, स्टेट बँक ऑफ इंडिया, जोगेश्वरी (पश्चिम), खाते क्रमांक 10279252598, आयएफएस (एसबीआयएन) 004626/एमआयसीआर - 400002038). या खात्यात थेट रक्कम जमा करता येईल.
बातम्या आणखी आहेत...