आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suhasini Kulkarni Article About Being Independent Even In Old Age

सत्तरीतही स्वावलंबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाच्या चौ-याहत्तराव्या वर्षात प्रवेश करूनही प्रत्येक क्षणी मला स्वावलंबी असावेसे वाटते. आनंदी असण्याची आणि कायम आनंदी राहण्याची हीच तर खरी गुरुकिल्ली आहे. आजच्या पिढीतील मुली कायम स्वातंत्र्याच्या नावाने ओरडा करत असतात. पण आमची पिढी मात्र स्वातंत्र्याच्या कल्पनेपेक्षा स्वावलंबनाच्या कल्पनेला अधिक महत्त्व देते. त्यातही वयाच्या विशिष्ट वळणानंतर महिला म्हणून कुटुंबाची जबाबदारी पेलताना माझ्यात ही जाणीव अधिक प्रकर्षाने रुजली.
आमच्या पिढीने गरिबी अनुभवली आहे. तसंच मुलगी म्हणून आपल्यावर समाजाने लादलेली बंधनेही त्या त्या काळानुरूप जगली आहेत. त्यामुळेच परिस्थितीतून मार्ग काढण्याची, त्यासाठी बुद्धीबरोबरच अहोरात्र कष्ट करण्याची आमची तयारी कायमच असते. आजच्या पिढीसाठी आधारवड म्हणून उभे राहताना अनेक वर्षांचा संघर्ष आणि त्यातून गाठीशी आलेला अनुभव आमच्या मुळाशी आहे. त्यामुळेच म्हणा ना, आमचं कुठेही अडत नाही.


पाटा-वरवंट्यावर केलेल्या चटणीचा स्वाद जिभेवर अद्याप रेंगाळत असला तरीही मिक्सरमधून भर्रकन फिरवून काही क्षणात केलेली चटणीही मी तितकीच एन्जॉय करते. ऐनवेळेला लाइट गेले आणि मग फजिती झाली असे प्रसंग विरळाच! फ्रिज, वॉशिंग मशीन, फूड प्रोसेसर अशी अत्याधुनिक उपकरणे लीलया वापरताना काळ किती बदलला हे जाणवतं, पण काळानुरूप बदलताना आपली मुळं विसरून चालत नाही हे मात्र वयच शिकवतं. नुकतीच मी माझ्या धाकट्या लेकीच्या बाळंतपणासाठी फिनलंडला जाऊन आले. मी व माझे पती दत्तात्रय कुलकर्णी यांची विमान प्रवासाची केवळ दुसरी वेळ. परक्या देशात, परक्या भाषेतील लोकांशी संवाद साधताना सुरुवातीला अडखळलो खरे, पण स्वावलंबनाची कास धरल्याने व कायम शिकण्याची तयारी असल्याने फारसे जड गेले नाही. परदेशवारी आजकाल अगदी सहज, सुलभ बाब झाली आहे, असं क्षणभर तुमच्या मनात येईल; पण आमच्या वयाचा आणि अगदी साधेपणाने आयुष्य घालवलेल्या परिस्थितीचा विचार करता आमच्यासाठी तो किती कठीण असावा याचा अंदाज तुम्हाला नक्कीच येईल. प्रवाशांची गर्दी, सामानाचं ओझं हे तर नेहमीचंच, पण आमच्यासाठी काहीसं कठीण म्हणजे पावलोपावली करावा लागणारा वेगवेगळ्या यंत्रांशी संघर्ष. स्वयंचलित, सरकते जिने, भलामोठा विमानतळ, मिनी बसेस या सा-यांचा सामना करताना आनंद होत होताच, कारण कोणत्याही कामासाठी कोणावर अवलंबून न राहण्याची वृत्ती.


भारतामध्ये घराघरात धुणंभांडी आणि अन्य घरकामाला बाई ठेवता येते. परदेशात हे सुख नाही. यंत्रांवर अवलंबून राहिले तरी घरकाम आपले आपणच करावे लागते. लेकीचं बाळंतपण करताना स्वावलंबी वृत्तीमुळेच मला कुठेही अडसर आला नाही. नातवाचा चेहरा पाहिल्यावर तर सारे श्रम कुठल्या कुठे पळून गेले.


समाजाने महिलांवर नातीगोती आणि रीतभात सांभाळण्याची एक मोठी जबाबदारी देऊ केली आहे. ती तशी जबाबदारी आम्हीच का पेलायची, या वादात पडणेदेखील आमच्या पिढीला फारसे गरजेचे वाटले नाही. एकदा आपलं म्हटलं की ते माणूस त्याच्या गुणदोषांसहित आपलंच, हाच विचार आमच्या गाठीशी. त्यामुळेच स्वावलंबनाला महत्त्व देताना नात्यांचा सुंदर गोफदेखील आम्ही सहज विणला. आजकाल मात्र तसं राहिलेलं नाही. माणसांची बदललेली वृत्ती आणि स्वार्थासाठी निभावलेली नाती हे कदाचित यामागचं कारण असावं. मात्र, आमच्या पिढीने नातेवाईक, गणगोत यांच्या सहवासात, प्रसंगी रुसव्याफुगव्यात आनंद शोधला.


वृद्धापकाळात तुमच्या गाठीशी काय आहे, असा सवाल कुणी केला तर मी निश्चितच सांगेन की नात्यांच्या रेशमी गोफात गुंफलेली माझी माणसं, अनुभवांची शिदोरी, स्वावलंबन आणि आजही नव्या गोष्टी शिकण्याची तयारी. या सा-या बाबींमुळेच माझं स्त्री असणं मला अधिक अभिमानास्पद वाटतं.