आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suhasini Mujumdar Article About Marriage, Divya Marathi

सल कमी व्हावा म्हणून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्‍याच दिवसांपासून माझ्या मनाला टोचणी लागून राहिली आहे. मनात सल आहे. एकटी असल्यावर मला माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळच्या घटना आठवतात आणि मी व माझे मिस्टर आम्हा दोघांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात.

माझी मुलगी सारा बीईच्या शेवटच्या वर्षाला होती. वधू-वर सूचीमध्ये आम्ही तिचे फोटो/पत्रिका दिली होती. मुलगी सुंदर व इंजिनिअर असल्यामुळे पुष्कळ फोन येत होते. आमची परिस्थिती उत्तमच होती. आम्ही मुलीला लाडात वाढवलेली. आम्हाला जावई पण तसाच हवा होता.

तिच्या परीक्षा चालू होत्या. तशात एक स्थळ आलं. ते लोक मुलगी पाहण्याची घाई करू लागले. परीक्षा चालू असल्यामुळे आणि हिच्या मनात अजून लग्नाचे विचार नसल्यामुळे नाराजीतच बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलगा दिसायला अत्यंत साधारण, वयात अंतर आठ वर्षे. त्यामुळे मुलगी लग्नाला तयार नव्हती; पण मुलाचा मुंबईला फ्लॅट होता, 9 लाखांचे पॅकेज होते, शिवाय माणसं ओळखीतली म्हणून आमचा आग्रह चाललेला. आमच्या आग्रहाखातर मुलीने हो म्हटले व बैठक झाली. छोटासा कार्यक्रम झाला. अजून साखरपुडा व्हायचा होता. मग हिची परीक्षा संपली. निवांत वेळ होता. फेसबुकवर मुलाचा फोटो हिने नीट पाहिला. मुलगा खूपच साधारण होता. मुलगी रडायला लागली व म्हणाली, मला या मुलाशी लग्न करायचे नाही. आता काय करावे? बैठक झालेली.

पाहुणे गावातलेच, शिवाय माझा व यांचा सगळा गोतावळा इथलाच, त्यामुळे सगळ्यांना लग्न जमल्याचे कळले होते. आता ही नाही म्हणते. आम्हाला काय करावे सुचेना. पोरीला समजावून, रागावून, समाजाची भीती घालून लग्नाला तयार केले. केवळ आमच्या इज्जतीसाठी, मानसन्मानासाठी मुलीला पसंत नसताना ती लग्नाला तयार झाली; पण अत्यंत उदास राहायची. पण आता लग्न होऊन 2 वर्षे झाली. मुलगी सासरी रमली आहे. ही गोष्ट ती विसरूनही गेलीय; पण आम्ही नाही. ठरवलेलं लग्न रद्द केलं तर लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, एवढ्यासाठी या कोवळ्या मनाच्या मुलीचा विचार आम्ही केला नाही, याचे वाईट वाटते; पण शेवट गोड, ते सगळं गोड, म्हणून आनंदही वाटतो. मनातला सल थोडा कमी व्हावा. आमच्या मुलीच्या ऋणातून थोडे मुक्त व्हावे म्हणून पत्रप्रपंच.