आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यशोधक ब्रॅडली!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९७२ मध्ये अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने रिचर्ड निक्सन यांच्या विरोधात जॉर्ज मॅकगव्हर्न या डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवाराचा पुरस्कार केला होता. मॅकगव्हर्न यांचा व्हिएतनाम युद्धाला विरोध होता व या युद्धाने अमेरिकेत एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती. १९६८ नंतर प्रत्येक विद्यापीठातील व महाविद्यालयातील विद्यार्थी व्हिएतनाममधून सैन्य मागे घ्या, युद्ध थांबवा, अशा घोषणा देत मोर्चे काढत. या मोर्चांमध्ये मॅकगव्हर्न सामील होत. याच वातावरणात ‘पेंटागॉन पेपर्स’ नावाने ओळखली गेलेली अमेरिकन संरक्षण खात्यातील कागदपत्रे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केली होती. ते वर्ष होते जून १९७१. त्यानंतर एक वर्षाने १७ जून १९७२ रोजी डेमोक्रेटिक पार्टीच्या वॉटरगेट संकुलातील मुख्यालयावर दरोडा पडला. या दरोड्याच्या शोधप्रक्रियेतून जे काही निर्माण होत गेले, त्यातून इतिहास घडला. या इतिहासाने ‘व्हाइट हाउस’चे राजकारण ढवळून निघाले. या एकाच प्रकरणामुळे पत्रकारिता ही प्रस्थापितांना आव्हान देणारी लोकशक्ती बनली.

वॉटरगेट इमारतीवर दरोडा घालणारी टोळी ही निक्सन यांच्या निवडणूक कचेरीतील पाच जणांची एक गुप्त टीम होती. या टीमकडे जॉर्ज मॅकगव्हर्न यांच्या प्रचाराचे डावपेच शोधून काढण्याचे काम दिले गेले होते. पत्रकार व डेमोक्रेटिक पार्टी यांच्यातील गुप्त संबंधांची माहिती काढायची. पेंटागॉन पेपर्ससारखे संरक्षण-लष्करी गुप्त दस्तऐवज डेमोक्रेटिक पार्टीकडे कसे पोहोचतात, याचा छडा लावायचा, असा हा सगळा व्यापक कट होता. या अगोदर ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये पेंटागॉन पेपर्स प्रसिद्ध झाल्यानंतर निक्सन सरकारने या वृत्तपत्राच्या संपादकांवर व डॅनिएल एल्सबर्ग यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला होता. परंतु या दोघांनीही, हे गुप्त दस्तऐवज युद्ध थांबवण्यासाठी व लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी प्रसिद्ध केले, असा युक्तिवाद न्यायालयापुढे केला. या युक्तिवादाला ग्राह्य धरून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. पत्रकारिता व लोकशाही यांचे अतूट नाते असते व लोकहित मांडणार्‍या पत्रकारितेवर अंकुश ठेवता येत नाही, असे न्यायालयाचे म्हणणे होते. या एकूण घटनांचा धसका निक्सन सरकारने घेतला होता. पुढे भीतीपोटीच वॉटरगेट प्रकरण उद्भवले. निक्सन यांच्या टोळीने डेमोक्रेटिक पक्षाच्या कार्यालयातील फायली, प्रचारनीती, वृत्तपत्रांशी असलेले संबंध रिपब्लिकन पक्षाला कळावेत, म्हणून हा दरोडा घातला. पण ज्या वेळी दरोडा घालण्यात आला, त्या दिवशी १७ जून १९७२ च्या पहाटे सुरक्षा रक्षकांनी या दरोडेखोरांना अटक केली. दुसर्‍या दिवशी न्यायालयात त्यांना हजर केले गेले.

त्या सुनावणीदरम्यान ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे बॉब वुडवर्ड व कार्ल बर्नस्टीन हे दोन तरुण वार्ताहर उपस्थित होते. या टोळीतील एका तरुणाने आपल्याकडे सीआयएचे पूर्वीचा कर्मचारी असल्याचे ओळखपत्र आहे, असे जेव्हा न्यायालयाला सांगितले, तेव्हा हे दोघे वार्ताहर चकित झाले. या प्रकरणात वेगळेच काही शिजतेय, असा त्यांनी अंदाज बांधला. त्यांनी ही माहिती त्यांचे कार्यकारी संपादक बेन ब्रॅडली यांना सांगितली. ब्रॅडली यांनी त्या बातमीचा पाठपुरावा करण्याचे ठरवले.

त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मग बॉब वुडवर्ड व कार्ल बर्नस्टीन या दोघांनी वॉटरगेट प्रकरणाचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधून निक्सन सरकारची लक्तरे बाहेर येऊ लागली. अमेरिकेतील सर्वच मीडिया ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बाजूने उभा राहिला. निक्सन यांच्या विरोधातील सर्व बातम्या अस्सल व विश्वसनीय होत्या. याला कारण या बातम्या देणारी व्यक्ती (मार्क फेल्ट- बातम्यांचा सोर्स म्हणून टोपणनाव ‘डीप थ्रोट’ होते) ही खुद्ध त्या वेळी एफबीआयच्या उपसंचालकपदी होती. मार्क फेल्ट यांचे नाव तीस वर्षांनंतर जगापुढे आले. पण वॉटरगेटच्या बातम्यांनी निक्सन यांची चोहोबाजूंनी कोंडी झाली, जगभर अवहेलना झाली. अखेर त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

निक्सन यांचा राजीनामा, हा केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर जगाच्या राजकारणात एक भूकंप होता. बेडर, निर्भीड, प्रस्थापितांच्या विरोधातील पत्रकारितेचा तो विजय होता. या विजयाचा एक शिल्पकार होता, बेंजामिन ब्रॅडली! पत्रकारिता ही केवळ बातम्यांपुरती मर्यादित असता कामा नये; तर आपली भूमिका स्पष्टपणे, बेडरपणे, जिवावर उदार होऊन मांडली पाहिजे, कोणतीही बातमी असो ती सत्यपूर्ण असली पाहिजे, अशा बातमीचे समर्थन करणारे ढीगभर पुरावे, नोंदी पत्रकारांकडे असल्या पाहिजेत, या मताचा ब्रॅडली होता. ब्रॅडली आपल्या वार्ताहरांना तशा स्पष्टपणे सूचनाही देत असे. तो वार्ताहरांशी बातमीबाबत चर्चा करताना टेपरेकॉर्डर वापरत असे. बातमी संदिग्ध असता कामा नये, ती बिनचूक असावी, त्यामध्ये पारदर्शकता असावी व मुख्यतः ती वर्तमानपत्राला गोत्यात आणणारी वा उलटवणारी नसावी, याबाबत ब्रॅडली सदैव जागरूक असायचा.

आजच्यासारखी इंटरनेट, फेसबुक, ट्विटर अशी माध्यमे नसताना ब्रॅडली बातम्यांच्या नि:स्पृहतेबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल दक्ष असायचा. मुळात, तो आपल्या वार्ताहरांवर विश्वास टाकायचा. वार्ताहरांनी आणलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या स्टोरीवर तो स्वतः काम करायचा, वेळप्रसंगी बातमी बदलण्याच्या सूचना द्यायच्या किंवा त्या बातम्या केरात फेकूनही द्यायचा. त्याच्या बातमीबाबतच्या अशा मेहनतीमुळे, समाजाच्या हितासाठी पत्रकारितेची बांधिलकी जपल्यामुळे १९६८ ते १९९१ अशा काळात ब्रॅडलीने ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला १८ मानाचे पुलित्झर पुरस्कार मिळवून दिले. मात्र एका पुरस्काराच्या निमित्ताने तो गोत्यातही आला होता व त्याने संपादकपदाचा राजीनामाही दिला होता. पण ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या व्यवस्थापनाने त्याचा राजीनामा फेटाळला. ब्रॅडलीचे वॉशिंग्टन पोस्टच्या मालकीणबाई कॅथरिन ग्रॅहम यांच्याशी उत्तम सूर जुळले होते. त्यामुळे या दोघांच्या काळात वॉशिंग्टन पोस्टचा प्रवास एक सामान्य वर्तमानपत्र ते महत्त्वाकांक्षी, बेडर, श्रीमंत व दर्जेदार वर्तमानपत्र, असा झाला. ब्रॅडली हा मूल्याधारित पत्रकारितेवर विश्वास ठेवणारा संपादक होता. आपल्या, ‘ए गुड लाइफ’ या आत्मचरित्रात ब्रॅडलीने व्हिएतनाम युद्धाबद्दल असे म्हटलेय की, ‘माझ्या दृष्टीने या युद्धात कोणाची खरी बाजू वा खोटी बाजू महत्त्वाची नव्हती, तर या युद्धाने अमेरिकेमध्ये प्रत्यक्ष काय परिस्थिती निर्माण केली व अमेरिकी समाजाला काय भोगावे लागत आहे, यावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.’ ब्रॅडलीची पत्रकारितेमागची भूमिका स्पष्ट व निखळ असल्याने निश्चितच ती त्या काळात सगळ्यांपुढील आदर्श होती.

जगभरच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याची प्रेरणा निर्माण करणार्‍या घटनांमागे ‘वॉटरगेट’ प्रकरणामागची पत्रकारिता होती. भारतातही ७०च्या दशकात आणीबाणीच्या काळात मतस्वातंत्र्यावर निर्बंध आल्यानंतर सर्वच वर्तमानपत्रांनी आपला कणखरपणा दाखवून दिला होता. २००१ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील बेकायदा पेट्रोल पंप वाटप प्रकरण असो, संरक्षण खात्यातील शवपेट्यांचे प्रकरण असो, भाजपचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांचे लाचप्रकरण असो, ही सर्व प्रकरणे म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेविरोधात पत्रकारितेने पुकारलेले बंड होते. २००२ च्या गुजरातमधील भीषण दंगलीचे वृत्तांकन हेही निर्भय पत्रकारितेचे एक उदाहरण आहे. तहलका, कोब्रा पोस्ट यांसारख्या छोट्या नियतकालिकांनी ही मोठी प्रकरणे त्या वेळेस उघडकीस आणली होती. या नियतकालिकांच्या संपादकांना सत्तेविरोधात दोन हात करताना बर्‍याच संघर्षाला सामोरे जावे लागले होते. तुरुंगवास, न्यायालयीन अडचणींचा सामना त्यांना करावा लागला होता. त्यांचा हा संघर्ष आजही सुरू आहे.

व्यक्तिस्वातंत्र्य व मतस्वातंत्र्य हा लोकशाहीचा प्राण आहे. ही लोकशाही मूल्ये जेव्हा धोक्यात येतात, तेव्हा त्यासाठी लढणारे क्रांतिकारी साहित्य निर्माण करण्याचे काम प्रसारमाध्यमांचे असते. आजची पत्रकारिताही त्या मूल्यांसाठी भांडते, असे चित्र दिसत नाही. ‘पेड न्यूज’मुळे पत्रकारिता कलंकित झालेली आहे. स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली एकमेकांचे राजकीय हिशेब चुकवण्याचे काम केले जाते. आजचा मीडिया हा राजकीय नेत्यांवर पोसला जातो, असेही चित्र आहे. राजकीय नेत्यांची जी आयडॉलॉजी ती माध्यमाची, असेही दिसून येत आहे. अशा काळात ब्रॅडलीसारखा संपादक निर्माण होणे, ही बाब पत्रकारिता आणि लोकशाहीच्या भवितव्यासाठी अपरिहार्य ठरणार आहे.
sujayshastri@gmail.com