आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्काम पोस्ट, अंतराळ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रह्मांडाचा वेध घेणारी मानवाची जिज्ञासा किंवा प्रयत्न हे जितके मानसिक आहेत, तितकेच ते शारीरिकही आहेत. चंद्रावर जगण्यायोग्य वातावरण नाही, याची कल्पना असतानाही मानवाने तिथे पाऊल ठेवण्याचा महापराक्रम केला. आजपर्यंत पुराण, आध्यात्मिक तत्त्वज्ञानातून म्हणजे, कल्पनेच्या जोरावर माणसाने विश्वाचे स्वरूप समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण हे ज्ञान किंवा ही माहिती खरी आहे की नाही, याची शास्त्रीय पातळीवर कसोटी त्याला आवश्यक वाटली होती. २०व्या शतकातले विज्ञान हे तसे आक्रमक होते. या विज्ञानाच्या आधारे मानवाला लाखो वर्षांपासून चालत आलेली मिथके, परंपरा यांना धक्का द्यायचा होता. म्हणून माणसाचे चंद्रावरच्या मातीत उमटलेले छोटेसे पाऊल हे मानवी महत्त्वाकांक्षेचे प्रतीक होते, असे म्हटले गेले. त्या वेळी असेही म्हटले गेले होते की, माणसाने विज्ञानाच्या मदतीने पृथ्वीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तो आता ब्रह्मांडही पादाक्रांत करायला निघाला आहे! पण विज्ञान अशा संकुचित चौकटीत काम करत नाही. यावर वादविवादही होऊ शकतो; एक मात्र खरे की, विज्ञानाला मानवी जिज्ञासांची परिपूर्ती करण्यासाठी उत्तरे शोधावी लागतात व त्यासाठी ते अव्याहत संशोधनाच्या नव-नव्या दिशा धुंडाळत काम करत असते.

गेल्या आठवड्यात रशियन अंतराळवीर गेनेडी पडल्का (वय ५७) याने अवकाशात ८७९ दिवस म्हणजे जवळपास अडीच वर्षे राहण्याचा विश्वविक्रम केला. गेनेडीने त्याचाच एक सहकारी सर्जी कर्कलेव्ह याचा ८०३ दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम मोडला. या विश्वविक्रमाची पाश्चात्त्य प्रसारमाध्यमाने प्राधान्याने दखल घेतली. एवढेच नव्हे, तर गेनेडीचे पॅराशूट जेव्हा कझाकिस्तानमधील गवताळ प्रदेशात अलगदपणे उतरले, तेव्हा त्याचे स्वागत करण्यासाठी कझाकी अध्यक्ष नूरसुलतान नझारबायेव्ह जातीने हजर होते. त्यांनी गेनेडीच्या पराक्रमाचे योग्य शब्दांत वर्णन करताना म्हटले की, ‘या पृथ्वीवर २०० देश आहेत; पण या देशांकडे त्यांचा नागरिक अवकाशात पाठवण्याचे भाग्य नाही. आमच्या देशाने एक नाही, तर तीन अंतराळवीर अवकाशात पाठवले आहेत.’ आपल्याकडच्या प्रसारमाध्यमांना गेनेडी पडल्काचा विश्वविक्रमही लक्षात आला नाही किंवा विज्ञानाने या विक्रमातून नेमके काय साध्य केले आहे, तेही पाहावेसे वाटले नाही.

गेनेडीने इतके दिवस अवकाशात राहून काय केले, हा प्रश्न कोणालाही पडू शकतो. याचे उत्तर असे की, अवकाशात अधिक काळ माणूस राहिला, तर सूक्ष्म गुरुवात्कषर्णाचे मानवी शरीरावर, त्याच्या विचारांवर, मेंदूच्या रचनेवर काय परिणाम होतात व त्यावर भविष्यात कोणत्या प्रकारचे संशोधन केले जाऊ शकते, यावर अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ व रशिया संयुक्तरीत्या (एका बाजूला राजकीय-लष्करी संघर्ष होत असले तरीही या दोन देशांचे अवकाश संशोधनातले साहचर्य नोंद घेण्यासारखेच) काम करत आहे. या अभ्यासाचा भाग म्हणून पृथ्वीवरून सुमारे २५० किमी दूर अंतरावर अवकाशात बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन-आयएसएस) विविध चाचण्या घेतल्या जात आहे. आजपर्यंत पृथ्वी ते आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक अशा विविध मोहिमा हाती घेण्यात आल्या असून गेनेडी हा या एका मोहिमेतला अवकाशवीर होता. या एकूणच मोहिमेचा व्यापक उद्देश असा की, नासाने २०३० पर्यंत मंगळ ग्रहावर माणूस पाठवण्याचे ध्येय ठेवले आहे. या ध्येयपूर्तीसाठी नासाने मानवी क्षमतांचा सखोल अभ्यास सुरू केला आहे.

गेनेडीच्या शारीर क्षमतांचा अभ्यास करताना नासाला आढळलेली निरीक्षणे जेवढी रोचक आहेत, तेवढीच ती मानवी शरीराच्या मर्यादाही स्पष्ट करणारी आहेत. एखादा अवकाशवीर साधारण तीन ते पाच महिन्यांनंतर गुरुत्वाकर्षणविरहित वातावरणात राहतो, तेव्हा त्याच्या नैसर्गिक प्रतिक्षिप्त क्रिया, विचार प्रेरणा व शरीररचनेत बदल झालेले दिसतात. या‌शिवाय मानवी हाडे ठिसूळ होण्यास सुरुवात होते. हाडांमधील क्षार कमी होऊ लागतात. स्नायू आकुंचन पावू लागतात. माणूस कृश होऊ लागतो. शरीरातील सुमारे ४० टक्के स्नायू आकुंचित होतात व हाडांचे आकारमान १२ टक्क्यांनी घसरते. थोडक्यात, २० वर्षांचा अंतराळवीर पाच महिने अवकाशात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतल्यास ६० वर्षांच्या वृद्धासारखा दिसू लागतो. अवकाशवीराच्या नैसर्गिक प्रेरणाही बदलतात. वास्तविक माणूस हा पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस स्वत:ला आधुनिक म्हणवून घेत असला तरी त्याच्या प्रतिक्षिप्त क्रिया या नैसर्गिकच आहेत. म्हणजे माणसाच्या सभोवताली माणसांपासून झाडे, पशू, पक्षी, गर्दी, वाहने, मोकळी मैदाने, शेती, उंच इमारती किंवा अनेक गोष्टी असतात त्या पाहून माणूस प्रतिक्रिया देत असतो. गुरुत्वाकर्षण विरहित अवकाशात प्रतिक्षिप्त क्रिया देण्यास वाव नसतो. अवकाशवीरापुढे अथांग, अनंत अशी पोकळी असते. अशा वातावरणात प्रदीर्घ काळ राहिल्यामुळे लाखो वर्षांपासून मानवाच्या शरीरात ज्या नैसर्गिक प्रेरणा रुजल्या आहेत, त्यांचा गोंधळ उडतो. कालौघात माणूस गुरुत्वाकर्षण अवकाश पोकळीशी तादात्म्य साधण्याचा प्रयत्न करतो. त्याचे शरीर ही परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करते, पण हा प्रयत्न आजपर्यंत दीर्घ काळ लांबवता आलेला नाही. म्हणून अवकाशातून परतलेल्या अवकाशवीराला पटकन पृथ्वीवरील परिस्थितीशी जमवून घेताना अडचणी येतात. जमिनीवर पाय ठेवल्यानंतरही लगेचच उभे राहता येत नाही (दोन वर्षांपूर्वी हॉलीवूड चित्रपट ‘ग्रॅव्हिटी’ प्रदर्शित झाला होता, त्यामध्ये असे वास्तववादी चित्रण दाखवण्यात आले होते. त्यामुळे जेव्हा गेनेडीचे पॅराशूट अलगदपणे पृथ्वीवर उतरले, तेव्हा त्याला सहा-सात जणांनी उचलले व एका अॅम्ब्युलन्समध्ये निरीक्षणासाठी ठेवले. त्याच्या शरीरावर गुरुत्वाकर्षण विरहित वातावरणाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव असल्याने त्याच्या सर्व नैसर्गिक प्रेरणा पूर्ववत होण्यास अजून काही वेळ लागणार आहे. गेनेडीचे शरीर आता काही महिने डॉक्टर व अवकाशतज्ज्ञ यांच्या निरीक्षणाखाली तपासले जाणार आहे.) अवकाशात प्रदीर्घ काळ राहणाऱ्यांना वाहने चालवताना संतुलन सांभाळता येत नाही. त्यांच्या हृदयाच्याही तक्रारी वाढू लागतात. अवकाशात दीर्घ काळ राहिल्याने तेथील रेडिएशनमुळे त्वचेचा कर्करोग किंवा शरीर खंगण्याचे आजार माणसाला होऊ शकतात. याचाच अर्थ, हा अवकाश प्रयोग अनेक प्रकारची आव्हाने घेऊन येणारा आहे, तरीही तो करत राहणे गरजेचे आहे. नव्हे तेच विज्ञानाचे ब्रीदही आहे. हे ब्रीद कसोशीने पाळल्यानेच मानवी जिज्ञासेच्या कक्षा विस्तारत चालल्या आहेत. त्यातून लागणाऱ्या नवनवीन शोधांमुळेच माणूस आपल्या अस्तित्वाच्या खाणाखुणा अज्ञातापर्यंत नेण्यात यशस्वी ठरतो आहे.
एकूणातच, गेनेडी सुमारे अडीच वर्षांनंतर पृथ्वीवर आल्यानंतर ‘नासा’चे मनोबल वाढले आहे. तेथील शास्त्रज्ञांमध्येही हुरूप आला आहे. मंगळ मोहिमेत येणाऱ्या अडचणी काय असू शकतात, याची सुस्पष्ट कल्पना शास्त्रज्ञांना येत आहे. म्हणूनच गेनेडीचा अवकाशातील ८७९ दिवस राहण्याचा महापराक्रम हा मंगळ ग्रहावर माणसाला घेऊन जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतला मैलाचा दगड ठरला आहे.

sujayshastri@gmail.com