आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sujay Shatri About Freedom Of Expression, Rasik, Divya Marathi, Divyamarathi.com, दिव्य मराठी

तिसरी ‘इंतिफादा’ लढाई...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅलेस्टाइनमधील "द फ्रीडम थिएटर' व दिल्लीतील "जन नाट्य मंच'तर्फे मुंबईत नुकतेच हिंदी व अरेबिक भाषेत एका नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होणारी गळचेपी व विस्तारत जाणारा अमेरिका-इस्रायलचा नवसाम्राज्यवाद यांना केंद्रस्थानी ठेवून हा प्रयोग करण्यात आला.
नाटकासारख्या माध्यमात चित्रपटासारखा स्थळ, काळ आणि तंत्राची मर्यादा भेदणारा अवकाश मिळत नसला तरी प्रखर वास्तव हे अभिनय-रुपके-प्रतिमा व आशय यांच्या बळावर भेदकपणे मांडता येते. पथनाट्ये ही प्रभावी ठरतात, ती विषयाच्या वैविध्यपूर्ण मांडणीमु‌ळे व मिळालेला अवकाश योग्यरीत्या वापरल्यामुळे. नुकताच पॅलेस्टाइनमधील "द फ्रीडम थिएटर' या संस्थेकडून मुंबईत एका नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता, पॅलेस्टाइनच्या भूमीमध्ये घुसखोरी करून पॅलेस्टाइन नागरिकाला हुसकावून लावणाऱ्या दमनकारी इस्रायली यंत्रणा व या देशाची कित्येक वर्षे अव्याहतपणे सुरू असलेली सर्वच पातळ्यांवरची दडपशाही. हा नाट्यप्रयोग केला होता, पॅलेस्टाइनमधील पश्चिम किनारपट्टीच्या (वेस्ट बँक) प्रदेशात जेनिन या निर्वासितांच्या छावण्यांत राहणाऱ्या सात युवकांनी व दिल्लीस्थित "जन नाट्य मंच'च्या काही कलाकारांनी. हिंदी व अरेबिक भाषेत हा प्रयोग होता. आयहब तलाहमेह (हेब्रॉन), इब्राहिम मकबूल (जेनिन), ओसामा अल अझाह (बेथलेहम-अल अजाह कॅम्प), अमीर अबू रॉब (जेनिन-कुबतेया), समाह मोहम्मद (जेनिन शहर), रानीन ओदेह (जेनिन शहर) हे सहा युवक व या नाटकाचा दिग्दर्शक फैझल यांच्या अथक प्रयत्नातून हा प्रयोग भारतात काही शहरांत केला जात आहे.
पॅलेस्टाइनची ही भूमी कधीकाळी समृद्ध भूमी होती. शेती बहरलेली असायची. तलाव काठोकाठ भरलेले असायचे. आठ-आठ खोल्यांची विस्तीर्ण घरे असायची, छोटी छोटी मुलं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत हुंदडत असायची. घरांना कुलपे लावण्याची गरज नसायची. नोव्हेंबर महिना आला की, पॅलेस्टाइनच्या भूमीवर स्वर्ग (झैतून) अवतरायचा. वेगळ्या पिकनिकची आवश्यकताच नसायची. पण एके दिवशी हे वास्तव एकाएकी बदलण्यास सुरुवात झाली. "तुम्ही राहता हीच आमची भूमी, या भूमीत राहायचा तुमचा अधिकार नाही.' असा अभिनिवेश घेत इस्रायलच्या सैनिकांच्या गोळ्या निष्पाप पॅलेस्टाइन नागरिकांच्या शरीरात घुसू लागल्या. प्रत्येक घरात ताबूत येऊ लागले. अनाथांची संख्या वाढू लागली. मोठाली घरे उद्ध्वस्त झाली. लहान मुलांच्या हातात पाटी-पेन्सिल नव्हे तर बंदुका आल्या. बघता बघता पॅलेस्टाइनची भूमी इस्रायली सैनिकांनी गिळंकृत केली, जागोजागी रस्त्यांवर, गल्लीबोळात रणगाडे फिरू लागले. अमेरिकेच्या आर्थिक व लष्करी ताकदीच्या पाठिंब्यावर इस्रायलने पॅलेस्टाइन भूमीवर अक्षरश: नांगर फिरवला. शेकडो शांतता करार झाले, पण हिंसाचाराच्या घटनांचा हिशेब लागला नाही. किती माणसे मेली, याची नोंद नाही. स्वत:च्या भूमीतून लाखो पॅलेस्टाइन नागरिक कायमचे निर्वासित झाले. निर्वासितांच्या छावण्या म्हणजे क्षणभर विश्रांती. तेथूनही इस्रायल सरकारने नागरिकांना हुसकावून लावले. इतिहासाने अशी काही अनेक वळणे घेतली गेली, या "पवित्र भूमी'ची शांतताच कायमची नष्ट झाली. ही शांतता कशी परतेल, हे कोणीच सांगू शकत नाही. आजही पॅलेस्टाइनच्या जनतेचा रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू आहे. कधी हातात शस्त्र उगारून, तर कधी इस्रायली सैनिकांच्या डोळ्यात डोळे रोखून. आज नवी पिढी नव्या उमेदीने, नव्या आयुधांसह व नव्या ऊर्जेसह इस्रायलच्या विरोधात उभी आहे (जिला ते अभिमानाने तिसरी इंतिफादा लढाई म्हणतात) ती कलेसारखे धारदार शस्त्र घेऊन.

साधारण पाऊण तास चालणारा हा प्रयोग इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष कोणत्या टोकावर गेला आहे, या वास्तवाची प्रखर जाणीव करून देतो. आपल्याकडील बहुसंख्य नाही, तर सर्वच प्रसारमाध्यमे इस्रायलचा संघर्ष अगदी रम्यरीतीने रंगवून मांडत असतात. त्यात पॅलेस्टाइनवरचे त्यांचे सततचे सुरू असलेले लष्करी हल्ले ही जणू काही इस्रायलची आत्मसंरक्षणाची लढाई आहे व त्यांचा तो अधिकारच आहे, असेही ठासून सांगितले जाते. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी, दाहक असल्याचे हा प्रयोग पाहून जाणवते.

स्वातंत्र्य व हक्काची मातृभूमी हा सनातन संघर्ष आहे. पण या प्रयोगाच्या माध्यमातून अमेरिकाप्रणीत साम्राज्यवादाचे, अब्जावधी रुपयांची शस्त्रास्त्रे उत्पादन करून दोन देशांमध्ये झुंज लावणाऱ्या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांचे व कट्टर उजव्या विचारसरणीच्या राजवटीचे भीषण रूप अनुभवायला मिळते. नवी पॅलेस्टाइन तरुण पिढी इस्रायली सैन्याने बंदुका दाखवून हुसकावले तरी आम्ही येथून हटणार नाही, अशी ठाम भूमिका घेणारी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा तर पॅलेस्टाइन-इस्रायल संघर्षातील महत्त्वाचा आयाम आहे. त्याला प्रतिक्रिया देत पॅलेस्टाइन रंगकर्मी ज्युलियानो खामीस यांनी ‘द फ्रीडम थिएटर’ नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून निर्वासितांच्या छावणीतल्या मुलांना घेऊन विविध विषयांवर नाटके त्यांनी प्रदर्शित केली. पण त्यांच्या नाटकातून व्यक्त होणारा इस्रायल दमनयंत्रणेतला विरोध सहन न होऊन २०११मध्ये ज्युलियानो मीर खामीस यांची काही कट्टरवाद्यांनी हत्या केली. पण त्यांनी जागवत ठेवलेली स्वातंत्र्याची प्रेरणा हे या नाटकाचे बलस्थान आहे.

या नाटकाचा आत्मा भारतातील परिस्थितीशी गुंफवण्यात चांगलेच यश आले आहे. सत्तेत आलेले नवे भाजप सरकार आणि कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलशी मैत्रीचे व लष्करी संबंध प्रस्थापित करून पूर्वापार असलेले भारत-पॅलेस्टाइन मैत्रीचे संबंध अधिक कमकुवत केले आहे. भारत-पॅलेस्टाइन या देशांमध्ये तसे साम्य काहीच नाही. दोन्ही देशांमधील भौगोलिक अंतर, भाषा, वेषभूषा व सामाजिक-आर्थिक प्रश्न हे भिन्न आहेत. पण या दोन देशांच्या संबंधात गेली सात दशके मैत्रीचा एक धागा टिकून आहे तो एका मुद्द्यावर, पॅलेस्टाइनच्या स्वातंत्र्याला भारताचा असलेला राजनैतिक पाठिंबा. मोदी सरकारने या राजकीय आकृतीबंधाला धक्का लावल्याचे ‘स्टेटमेंट’ नाटक स्पष्ट व्यक्त करते. अमेरिका, इस्रायल व भारत अशी नवी युती हा नव्या जगाच्या राजकारणाचा भाग असल्याचे कितीही सांगण्यात आले तरी त्यामुळे पॅलेस्टाइन स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक गंभीर होत जाईल आणि भारत साम्राज्यवादी अमेरिका व शस्त्रास्त्र निर्माण करणाऱ्या बलाढ्य इस्रायली कंपन्यांच्या हातातले बाहुले होऊन जाईल, असे नाटककाराला अंतिमत: सांगायचे आहे. ही अभद्र युती शांतता बिघडवणारी ठरेल, असा स्पष्ट इशाराच या नाटकातून दिग्दर्शक- कलावंतांना द्यायचा आहे.
(या नाटकाबाबत व "द फ्रीडम थिएटर'बाबत अधिक माहितीसाठी http://www.thefreedomtheatre.org या वेबसाइटला किंवा www.facebook.com/thefreedomtheatre या फेसबुक पेजवर भेट द्या)