आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यगृहांची दुरावस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुलंचं एक स्वप्न होतं, माझ्या नाट्यकलावंताने एसी गाडीतून फिरावं. आणि पाहा, आज ते पूर्णत्वास आलंयसुद्धा. पण दुर्दैवाने अगदी या उलट आज नाट्यगृहांची अवस्था झालीय. ती व्यवस्थित सुसज्ज ठेवण्याची नाट्यगृहचालकांची अनास्थाच वाढत चालल्याचं दिसून येतंय.
वाॅशरूमचंच घ्या. मग ती प्रेक्षकांसाठी बनवलेली असो, की कलाकारांसाठी, ती कधीच व्यवस्थित नसतात. तुटलेले कमोड, कड्या नसलेले दरवाजे आणि अस्वच्छता हे सर्रास सगळीकडचंच चित्र. नाट्यगृहातल्या मेकअपरूममध्ये आम्ही कपडे बदलतो, पण तिकडे साधे पडदेही नसतात.

मुंबई असो की पुणे की महाराष्ट्रातलं कोणतंही नाट्यगृह; सगळीकडेच सुविधांची वानवा. आम्ही जेव्हा मुंबईच्या बाहेर नाटकाच्या दौऱ्यासाठी जातो, तेव्हा प्रवासानंतर फ्रेश होण्यासाठी टॉयलेटमध्ये किमान पाणी, साबण या सुविधा हव्यात ना. रेस्टरूम टापटीप हवी. पण अनेकदा साधी कचरापेटीही नसते. जेवायला मिळणंही अवघड असतं. जी अवस्था आमची, तीच प्रेक्षकांचीही. सभागृहात पंखे, एसी, व्यवस्थित खुर्च्या यांचा अभाव असतो. आपण नाट्यमंदिर असा शब्दप्रयोग वापरतो. पण ते ठेवतो कसं?
एखाद्या प्रेक्षकाला चालता येत नसेल, तर व्हीलचेअरमधून येण्याची सुविधाही आपल्या नाट्यगृहांमध्ये नाही. नूतनीकरण झालेल्या प्रेक्षागृहांची अवस्था याहून काही वेगळी नाही. नूतनीकरण केले जाते, पण त्याची देखभालही ठेवावी लागते. नाटकाचे तिकीट सिनेमाच्या तिकिटाएवढेच आहे, मग सुविधाही नकोत का? फिल्म-मालिकांमध्ये काम करताना आम्हाला व्हॅनिटी व्हॅन किंवा मेकअपरूम अद्ययावत सुविधायुक्त मिळतात. मग नाट्यगृहं का तशी मिळत नाहीत?
मग नवीन पिढी नाटकात कामं करेल की मालिका आणि सिनेमांत? नाट्यसृष्टीला इंडस्ट्री म्हणून फुलवण्यासाठी या गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हावा. त्यासाठी अखिल भारतीय नाट्यपरिषदेने नाट्यगृहांचेही ऑडिट सुरू करावे.
(शब्दांकन- अनुजा कर्णिक)