आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेखक पडला मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘ससुराल सिमर का’ पाहत होते, आणि वाटलं, ‘अरे, ही कथा कुठून, कुठे पोहोचलीय?’ पण ही एकच मालिका अशी भरटकलेली नाही. आज हिंदी-मराठीत अशा अनेक मालिका तुम्ही पाहाल. याचं मूळ कारण, चॅनलचा प्रत्येक मालिकेत नको तेवढा हस्तक्षेप असल्याचं माझं प्रांजळ मत आहे. कोणतं पात्र जास्त लोकप्रिय, त्याप्रमाणे ट्रॅक ठरवला जातो. मग कलाकारही मालिकेला गांभीर्याने घेत नाहीत, चार-चार वर्षं चालणार्‍या मालिकांमध्ये ते पाट्या टाकल्याप्रमाणे काम करतात. एखादा कलाकार १०-१५ दिवस नसेल तर मग त्याचा कधी अपघात दाखवला जातो, नाही तर परदेशवारी दाखवतात.

बर्‍याचदा लेखकाला आपलं डोकं बाजूला ठेवून ‘क्रिएटिव्ह’ नावाने संबोधल्या जाणार्‍या लोकांच्याच डोक्याने चालावं लागतं. बरं, ह्या नव्या ‘क्रिएटिव्ह’ मुलांचं संहितेकडे लक्षच नसतं. नायिकेची हेअरस्टाइल आणि घराचे पडदे त्यांना जास्त महत्त्वाचे वाटतात. मग सगळा गडबडगुंडा होतो. डेली सोपमध्ये चार-चार वर्षं चालण्यासाठी कथानकात सतत पाणी घातलं जातं. आणि मग लोकांना आवडणारी मालिका नावडती होते. मालिकेतल्या नायिकेची चार-चार लग्नं लावली जातात. पूर्वी दूरदर्शनवर १३ भागांच्याच मालिका असायच्या. अशा ‘नीटनेटक्या’ मालिका पुन्हा सुरू झाल्या, तर त्यातला गोडवा कायम राहील. ‘शांती’ मालिका करताना, पुढली दोन वर्षं त्या मालिकेत काय होणार याचं जाडजूड स्क्रिप्ट अगोदरच तयार होतं. माझं शूटिंग नसेल, त्या दिवसाच्या सिक्वेन्सचं स्क्रिप्टसुद्धा माझ्या घरी पोहोचायचं. ‘आभाळमाया’च्या वेळीसुद्दा संवादांसकट संपूर्ण संहिता अगोदरच तयार होती. आता मात्र कलाकार शूटिंगला आला तरी आज त्याला काय करायचं, हे माहीतच नसतं. दहा मिनिटं अगोदर स्क्रिप्ट हातात पडते. यामुळे लेखकाविषयीचा आदरही संपलाय. खरं तर, मालिकेसाठी लेखन करणं खूप कठीण आहे. प्रत्येक भाग उत्कंठावर्धक करणं, प्रत्येक भूमिकेला महत्त्व देत, वर्षभर असं लिहीत राहणं, म्हणजे त्या लेखकाला केलेली शिक्षाच असल्यासारखी मला वाटते. पण या दिव्यातून जाणार्‍या लेखकाला आज काडीचीही किंमत नाही.
सुकन्या कुलकर्णी, मुंबई, पाहुण्या संपादक
(शब्दांकन - अनुजा कर्णिक)