आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्ग-तांडव : सह्याद्रीचा प्रकोप!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात डोंगरकडा कोसळून माळीण गाव जमीनदोस्त झाले. निसर्गाच्या रौद्रभीषण अवताराचा प्रत्यय देणार्‍या या दुर्घटनेत केवळ माणसेच नव्हे, किती तरी आशा-आकांक्षा आणि स्वप्नेही गाडली गेली. काळीज हेलावून टाकणारे ते दृश्य ज्यांनी पाहिले, त्यांच्या नजरा शून्यात गेल्या. शब्द गोठले... पुन्हा अशी घटना घडली तरीही स्वप्नं गाडली जाणार नाहीत, असा आश्वासक सूर मात्र वातावरणात कुठे उमटला नाही...

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका हा गुजरातपासून केरळपर्यंत पसरलेल्या विशाल पश्चिम घाटाचा एक भाग. राकट, कणखर म्हणून ओळखल्या जाणार्‍या सह्याद्रीच्या डोंगररांगा आंबेगाव-जुन्नरच्या परिसरात आहेत. शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी, गणेशभक्तांचे लेण्याद्री, शेकडो वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय व्यापार-उदिमाला चालना देणारा नाणेघाट ही प्रमुख ठिकाणे आंबेगाव-जुन्नर तालुक्यातली. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध भीमाशंकर हे शंभू महादेवाचे देवस्थान आंबेगावातच. या चारही ठिकाणांमधले साम्यस्थळ कोणते म्हणाल, तर बेसॉल्ट रॉकने दिलेली कणखरता. आंबेगाव-जुन्नरमध्ये बौद्धकालीन लेणी, गुहा आढळतात ती येथील कठीण कातळामुळेच. हिमालय जितका भव्य तितकाच तो ठिसूळ. दरडी-कडे कोसळणे, भूस्लखन, नद्यांची पात्रे बदलणे, गावेच्या गावे गुडूप होणे, भूकंपाचे हादरे आदी नैसर्गिक घटना हिमालय परिसरात वारंवार घडतात. टणक सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असे बदल अभावानेच घडले आहेत. माळीण गाव परिसरातल्या रहिवाशांना बसलेला सर्वात मोठा धक्का हाच आहे. मानवी नात्यांच्या वियोगाचे दु:खावेग सावरल्यानंतर उरणारे हे सत्य त्यांच्यासाठी अधिक भीतिदायक आहे. अवघ्या काही मिनिटांत गाव गडप झाल्याचे त्यांनी पाहिले. हे दृश्य त्यांच्यासाठी अकल्पित, अघटित ठरले.

अगदी ऐंशी-पंच्याऐंशी वर्षांच्या वृद्धांना त्यांच्या आठवणीत कधी डोंगर खचल्याचे स्मरत नाही. त्यांच्या वाडवडिलांकडूनही त्यांनी कधी अशा प्रकारांबद्दल ऐकले नव्हते. नव्याने झालेल्या डांबरी रस्त्यांवर पावसाच्या पाण्याने राडारोडा वा भलेमोठे दगड वाहत येण्याच्या घटना पावसाळ्यात क्वचित घडतात. डोंगर खोदून केलेल्या रस्त्यांवर दरड घसरण्याचे प्रकारही हे लोक पाहतात. परंतु, भीमाशंकराचा डोंगर उभा फाटण्याचे आक्रित माळीण गावच्या पंचक्रोशीवर पहिल्यांदाच कोसळले. माळीण गावाच्या घेर्‍यात बारा-तेरा छोट्या वाड्या-वस्त्या येतात. पुंजक्या-पुंजक्यांनी राहणार्‍या या सगळ्या वस्त्यांची एकत्रित लोकसंख्या साडेसहाशेच्या घरात. डिंभे धरणाला तब्बल 19 किलोमीटरचा धोकादायक वळसा घालून आत जायचे. त्यानंतर साधारण अर्धा किलोमीटरची उभी चढण ओलांडल्यानंतर माळीण गावठाण होते. दोन डोंगरांच्या बेचक्यातल्या सपाट जागेवर वसलेले. गावठाणाची जागा छोट्या दरीजवळ संपते. या दरीत पावसाळ्यात बेफाम उधळत जाणारी नदी आहे. इतक्या दुर्गम भागात हे लोक का राहत होते, असाच प्रश्न तिथे पोहोचणार्‍या कोणत्याही नागरी मनाला पडावा. अडचणीच्या बिकट प्रसंगात तालुका गाठायचा म्हटले, तरी दोन-अडीच तासांपेक्षा कमी वेळेत शक्य नाही. माळीण गाव खूप जुने असल्याचे स्थानिक सांगतात. आसपासच्या डोंगरांवरही माळीणसारखीच साठ-सत्तर उंबर्‍यांची चिमुकली गावं वसलेली आहेत. माळीणची दुर्दशा पाहिल्यानंतर, या डोंगरी वस्त्यांवरची सगळीच माणसे हादरून गेली आहेत. ती घडाघडा बोलत नाहीत; पण, त्यांच्या चेहर्‍यावर थरकाप दिसतो. डोळ्यात भीती दाटलेली जाणवते. आभाळ फाटल्यानंतर आपल्या गावाच्या पाठीशी असलेला डोंगरसुद्धा खचू शकतो, या चिंतेने त्यांना घेरले आहे. गेल्या काही दिवसांपासून माळीण परिसरात धो-धो पाऊस पडला आहे. आसपासच्या डोंगरांमधून शेकडो लहानमोठे धबधबे, ओढे, नाले सुसाट वाहताहेत. वाहताना डोंगर धुऊन काढताहेत. डोंगरात पाऊस जिरतोय. यापूर्वी कधी ही लक्षणे धोक्याची वाटली नव्हती. आता डोंगरावरून येणारी पाण्याची धार गावकर्‍यांना घोर लावते.

भेद्य सह्याद्री?
1967 मध्ये कोयना परिसर हादरला तेव्हा महाराष्ट्राला बसलेला धक्का केवळ भूकंपाचा नव्हता. दख्खनच्या पठारावर भूकंप होऊ शकत नाही, या गृहितकाला 1967मध्ये तडे गेले. भूशास्त्रीय भाषेत भारत देश गोंडवन नावाच्या पट्ट्यात येतो. या गोंडवनातील काही भूभाग ‘ट्रान्स हिमालयीन बेल्ट’ आणि ‘सर्कम पॅसिफिक बेल्ट’ या भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतात. परंतु, महाराष्ट्र आणि त्यातही प्रामुख्याने सह्याद्री डोंगररांगांनी व्यापलेला पश्चिम महाराष्ट्र, इंग्रजांच्या लेखी डेक्कन (दख्खन) या प्रदेशात भूकंप होऊ शकत नाहीत, असे भूशास्त्रज्ञ समजून चालले होते. 1967च्या कोयना भूकंपाने हा समज मोडीत काढला. नेमका असाच प्रकार माळीण दुर्घटनेनंतर घडलाय. सह्यकडासुद्धा कोसळू शकतो, सह्याद्री अभेद्य नाही, हे माळीणच्या घटनेने अधोरेखित केले आहे.

पिढ्यान्पिढ्या डोंगरावर वस्ती करून राहिलेली ही माणसे जितकी धास्तावलेली, तितकेच प्रशासन चक्रावलेले. ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ (आपत्ती व्यवस्थापन) ही संकल्पना अलीकडच्या काळात देशात बोलली जाऊ लागली आहे. प्रत्यक्षात मात्र एकूणच व्यवस्थापनातला गबाळेपणा अजून गेलेला नाही. आपत्ती आल्यानंतर प्रशासकीय अजागळपणा प्रकर्षाने उघडा पडतो. माळीणची दुर्घटना दुर्दैवाने याला अपवाद नाही. कोणत्या भागात, वर्षाच्या कोणत्या दिवसांमध्ये कशा प्रकारचे संकट ओढवण्याची शक्यता असते, याचा नेमका वेध घेणे आणि त्याला तोंड देण्यासाठी नेटके नियोजन करणे, हा आपत्ती व्यवस्थापनाचा पहिला भाग. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने माळीणच नव्हे, तर संपूर्ण आंबेगाव, जुन्नर या दोन्ही तालुक्यांतल्या डोंगराळ वाड्या-वस्त्यांत डोंगर खचण्याची शक्यताच गृहीत धरलेली नव्हती. ‘पुणे जिल्ह्यात यापूर्वी कधी डोंगर खचण्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या ‘डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन’मध्ये हा विचार करून नियोजन केले नव्हते,’ असे उत्तर पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिले. माळीणसारखी आणखी किती डोंगरी गावे जिल्ह्यात आहेत, त्या ठिकाणची लोकसंख्या किती, गुरे-ढोरे किती याचीही स्वतंत्र आकडेवारी प्रशासनाला देता आली नाही.

वास्तविक सह्याद्री डोंगररांगांवर शेकडो लहानमोठ्या वस्त्या आहेत. या ठिकाणी हजारो माणसे पूर्वापार वस्ती करून आहेत. जंगलातून मिळणारा लाकूडफाटा, फळे, मध, शिकार, औषधी वनस्पती आणि वर्षातून एकदा होणारी थोडीफार शेती हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार राहिलेला आहे. अलीकडच्या काही वर्षांत डोंगरी गावांतले व्यावसायिक पशुपालन आणि नोकरी-धंद्यासाठीचे स्थलांतर वाढले आहे. परंतु, डोंगरांवरून कायमचे उठून सपाट प्रदेशात येऊन राहण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे डोंगरी गावांच्या कायमस्वरूपी स्थलांतराला स्थानिकांचा प्रतिसाद कितपत मिळेल, याबद्दल साशंकता आहे. किमान पावसाळ्यात तात्पुरत्या स्थलांतराचा पर्याय त्यांना देता येईल का, याचा विचार शासनाला करावा लागेल. नऊ वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील जुई गाव याच पद्धतीने डोंगर खचून गडप झाले. शंभराहून अधिक माणसे काही क्षणात संपली. याचीच पुनरावृत्ती माळीणला झाली. अशा दुर्घटना कोकण आणि सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, नंदुरबार जिल्ह्यातल्या डोंगरी गावात भविष्यात घडू शकतात. या जिल्ह्यांमधल्या डोंगरी गावांची संख्या शेकड्यांनी आहे. या सर्व गावांमध्ये पडणारा पाऊस, संभाव्य धोके आणि स्थानिक लोकवस्ती यांचा विचार करून कायमस्वरूपी नियोजन आखण्याची गरज ‘माळीण’मुळे ऐरणीवर आलीय. यापूर्वी कधी घडले नाही; सबब भविष्यातही धोका संभवत नाही, हे धोरण किती बळी घेऊ शकते, हे या प्रसंगाने दाखवून दिले आहे. निसर्गाकडून वारंवार मिळणारे इशारे गांभीर्याने घेण्याची सवय लावून घेतली नाही तर ‘आपत्ती व्यवस्थापन’ फक्त निस्तरण्याचे कार्य आणि मृतदेह शोधाचे प्रयत्न एवढ्यापुरतेच उरेल. आक्रितांचे बळी जात राहतील.
sukrut.k@gmail.com