आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आपली मुलं\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे त्यांच्या कुटुंबाचे, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न अधिक गंभीर बनले आहेत. अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या श्यामसुंदर कणके यांनी सुरू केलेल्या शाळेविषयी...
निराधार मुले-मुली आणि अडचणीत सापडलेल्या महिलांना आधार द्यायचा, संरक्षण द्यायचे, त्यांची काळजी घ्यायची, पोटभर अन्न, अंगभर कपडा अन् घराची ऊब द्यायची, पाठीवरून मायेचा हात फिरवायचा, त्यांना माणूस म्हणून घडवायचे... औरंगाबाद येथील सातारा परिसरातील डॉ. हेडगेवार मेमोरियल पब्लिक स्कूलचे संस्थापक शामसुंदर कणके हे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलामुलींना आधार देत त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. सतत नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात व त्यामुळे उपासमारीबरोबर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही निर्माण होतो. हे पाहून कणके गुरुजींनी २००४मध्ये शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली. तेव्हा या शाळेत १५० मुले होती. परंतु गेल्या पाच वर्षांत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने शाळेतील मुलांची संख्याही वाढली आहे. आता शाळेत जवळपास १०० मुली आणि २५० मुलगे आहेत. कणके गुरुजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन किंवा त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांच्या मुलांना शाळेत मोफत प्रवेश देतात. शिवाय या मुलांचे राहणे, जेवण, गणवेश, सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य याचा खर्च शाळाच करतेे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील २० महिला संस्थेत केअरटेकरचे काम करतात. तसेच बचतगटाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी शाळेकडून प्रयत्न केले जातात. शाळेतील या मुलांना कुणीही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले म्हणू नये, यासाठी त्यांना ‘आपली मुले’ असे संबोधले जाते. शाळेतील शिक्षक-शिक्षिका मुलांचा प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याने सांभाळ करतात. त्यामुळे मुलांना आपल्या घराची आठवणही येत नाही. शाळेत नऊ शिक्षिका आहेत. मुलांचे वेगवेगळे प्रश्न त्या आपुलकीने सोडवतात. सुरुवातीला मुलांचे मन येथे रमत नाही. सारखं रडणाऱ्या मुलांना आईच्या मायेची ऊब देण्याचे काम या शिक्षिका करतात.

शिल्पा ढोणे म्हणाल्या, २००७ पासून या शाळेत काम करतेय. परिस्थितीची जाणीवही नसणाऱ्या निरागस मुलांना सांभाळणे अवघड होते. सुरुवातीला मुलं फार रडायची. काही मुले हुशार होती, पण त्यांचे मन लागत नव्हते. मन शांत करणे गरजेचे होते. त्यांच्यासाठी संस्कार वर्ग घेतले. आईवडिलांची उणीव भासू नये, म्हणून आम्ही दिवस वाटून घेतले. दिवसरात्र त्यांची काळजी घेतली, त्यामुळे मुले आनंदाने येथे राहतात. १६ मुलांना तर घरच नाही. अशी मुले उन्हाळ्याच्या सुटीत आणि दिवाळीला येथे आनंदाने राहतात.

आम्ही मुलांना आईच्या मायेने शिकवतो. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त मुलांना गोष्टी, अनुभव, जीवनमूल्य, स्वच्छतेच्या सवयींविषयी मार्गदर्शन करतो. शाळेत पाऊल ठेवलं की, आम्हाला घरात आल्यासारखं वाटतं. मुलांना हस्तकला, ग्रीटिंग कार्ड, राख्या तयार करण्याचे शिकवतो. पदार्थ कसे बनवायचे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवतो, असे मेघा काठेकर यांनी सांगितले.

बारा वर्षांपासून येथे शिक्षिका असलेल्या संध्या पुंडे म्हणाल्या, पहिलीचा वर्ग असल्याने मुलांना सांभाळणे कठीण होते. वर्गातील २० मुलांना आईवडील नाहीत. कुणाला आई नाही तर कुणाला वडील नाहीत. आईशी खेळावं तशी मुलं माझ्याशी खेळतात, वर्गात गेल्यावर धावत जवळ येतात, नि:संकोचपणे मनातील सर्व गोष्टी सांगतात.

sulxana.patil@dbcorp.in
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज
बातम्या आणखी आहेत...