आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sumedha Kuvalekar Article About Book Review Of Marg

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अस्तित्वाचा संघर्ष 'मार्ग'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामीण भागातील खांडोशी गाव आणि त्याला लागून असलेल्या वाड्यांवर जाऊन स्थानिकांसाठी सेवाभावी काम करणार्‍या एका जोडप्याभोवती गुंफलेली मौज प्रकाशन गृह प्रस्तुत मिलिंद बोकील यांची ‘मार्ग’ ही कादंबरी. या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे, लेखकाने ही कादंबरी ‘सर्व स्त्रियांसाठी’ अर्पण केली आहे. असं का? तर त्यासाठी ती वाचणं, अनुभवणं महत्त्वाचं. कादंबरी वाचताना ती सहज उलगडत जाते, आणि आपणही त्यातलेच एक होऊन जातो. समजा वाचनात खंड पडला, तरी पुन्हा सुरू करताना सलगता जाणवते.

मुंबईपासून जवळच असलेल्या परंतु सोयी-सुविधांपासून खूप लांब असलेल्या दुर्गम भागावर कथानक केंद्रित आहे. थोड्याशा मार्गदर्शनाची गरज असलेले जागरूक आणि भरपूर कष्ट करण्याची तयारी असणारे आदिवासी, अतिशय निर्मळ मनाचे ग्रामस्थ, सुरक्षित वातावरण या सर्वच गोष्टी विशाखा आणि अतुल या मुंबईस्थित जोडप्याला आपलंसं करतात. विशाखा व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहे. ती वार ठरवून आजूबाजूच्या वाड्यांवर जात असते. सोबत मदतनीस म्हणून वाडीतीलच रामी नावाची मुलगी असते. अतुल एका समाजसेवी संस्थेच्या मार्गदर्शन आणि साहाय्याने काम करत असतो.

सेवाभावी वृत्तीने आदिवासींचे प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा सकारात्मक अट्टाहास येथे दिसून येतो. मुकादमाकडून वाडीवरील लोकांचं वीटभट्ट्यावर होणारं हंगामी स्थलांतर आणि शोषण पूर्णपणे थांबवणं, वाडीवर वीज येण्यासाठी प्रयत्न करणं, अंगणवाडी मंजूर होणं, सेविकेची नेमणूक होणं, इंजिनं घ्यायची सुरुवात होणं, त्यामुळे भाजीचं उत्पादन वाढतंय, तेथील जमिनी लोक वर्षानुवर्षे कसताहेत, पण त्या नावावर नाहीयेत, लोकांना पूर्वी ब्रिटिशांनीच पासबुकं दिलेली आहेत... हे आणि असे अनेक प्रश्न सोडविताना, ढाच्याबाहेरील काम करण्याची अतुल-विशाखाची धडपड असं सगळं यात अत्यंत मर्मग्राहीपणे येतं.
परंतु याबरोबरच आदिवासींचे रीतिरिवाज जसे, स्वातीचा बघण्याचा कार्यक्रम, सुपारी फोडणे म्हणजे साखरपुडा, तसेच विशाखाने गायनॅकॉलॉजिस्ट डॉक्टरीणबाईंकडे वर्षभर केलेल्या कामाचा अनुभव, आणि भिकीच्या मदतीने केलेलं नवशीचं बाळंतपण, शिवाय शिमग्याच्या म्हातार्‍या आईचा मृत्यू, ितची अंत्ययात्रा, अंत्यविधी या सर्वच प्रसंगांचे वर्णनही मनोवेधक ठरते.

व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर, शिवाय निसर्गवेडी असल्यामुळे विशाखाला निसर्गाची अनावर ओढ आहे. अभ्यासू वृत्तीमुळे नवनवीन वनस्पतींविषयी माहिती करून घेणं, हा तर तिचा छंद जणू. जंगलाविषयी अतिशय प्रेम व आकर्षण तिला स्वस्थ बसू देत नाही. शिवाय, कुठल्याही गोष्टीची तिला भीती वाटत नाही. आपला छंद जोपासताना हातून घडणारी लोकसेवा, त्यासाठी आजूबाजूच्या वाड्यांवर मैलोन् मैल चालत जाऊन डॉक्टरकी करताना दुसर्‍या वाडीवरील एका वैदू असलेल्या बहिरूदादा नावाच्या भगताला शास्त्रशुद्ध वैद्यकी शिकवण्याचा आटोकाट प्रयत्न, तसेच बहिरूदादानेसुद्धा शिकण्याची दाखवलेली आस्था, यातून पराकोटीची जनजागृती तिने केलेली दिसून येते. यात तिचा स्वत:शी, सभोवतालाशी सूक्ष्म पातळीवर लढा सुरू असल्याचे आपल्याला जाणवते.
अतुलला वर्षभर कामानिमित्त बाहेर जावे लागणार असते, तेव्हा विशाखा एकटीने वाडीवस्तीवर राहणे पसंत करते. एका क्षणी तिला एकाकी वाटते, पण दुसर्‍याच क्षणी ती स्वत:शीच हसते. भोवताली करडा संधिप्रकाश भरून यावा, पण आतल्या आत उजळल्यासारखे व्हावे, असे तिच्या बाबतीत घडते. पळसवाडीतील लोकांसाठी काम करता करता, त्यांच्यातलीच एक होऊन राहण्याचा धाडसी निर्णय विशाखा घेते आणि ‘मार्ग’ पूर्णत्वास येते. पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटणारी ही कादंबरी शहर आणि दुर्गम भागातल्या जीवनशैलीचे नकळत मूल्यांकन करतेच; पण स्त्रीच्या जीवन जगण्याच्या प्रेरणांचा, इच्छा-आकांक्षांचा आणि त्यातून निर्माण होणार्‍या समर्पित भाववृत्तीचाही यशस्वीपणे माग काढते.

पुस्तकाचे नाव : मार्ग
लेखक : मिलिंद बोकील
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह
किंमत : ~ १२०/-
पृष्ठसंख्या : ११९

sumedhapk33@gmail.com