आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमुक्त प्रवासाची रेसिपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देश-विदेशातील भन्नाट भटकंतीचे शब्दबद्ध अनुभव घेऊन रोहन प्रकाशनने ‘पर्यटन एक संजीवनी’ हे डॉ. लिली जोशी लिखित पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाची सुरुवात ‘प्रवास : माझी संजीवनी’ या प्रकरणाने करणार्‍या लेखिका व्यवसायाने डॉक्टर आहेत. ज्या काळात ‘लेडी फिजिशियन’ म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हते, तेव्हापासून त्या स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांचे हसतमुख व्यक्तिमत्त्व, शांत स्वभाव, दुसर्‍याचे ऐकून घेण्याची वृत्ती, रुग्णांना बरं वाटावं अशी आंतरिक तळमळ आणि औषधोपचारांपेक्षा जीवनशैली सुधारण्यावर भर यातूनच त्यांनी आरोग्यविषयक लेखनाची सुरुवात केली. त्या म्हणतात, ‘प्रवास ही कंटाळा येण्याची गोष्ट नसून कंटाळा घालवण्याची आणि उत्साह मिळवण्याची गोष्ट आहे.’ पुस्तक वाचताना आपल्याला या गोष्टीचा ठिकठिकाणी प्रत्यय येतो. पुस्तकाची मांडणीही आकर्षक केलेली आहे. विदेशी रंग, विदेशी संस्कृतीचे काही पैलू आणि साहसी भ्रमंती अशा तीन भागांत पुस्तकातील प्रकरणांची विभागणी केलेली आहे. ‘महाप्रचंड व्हिक्टोरिया’, ‘ºहायनोंच्या सहवासात’, ‘सफर मिस्रदेशाची’, ‘मंत्रमुग्ध करणारं स्कॉटलंड’, ‘प्राचीन आणि अद्भुत ग्रीस’, ‘सफर अलास्काची’, ‘यलो स्टोन : आरसा भूगर्भाचा’, ‘ब्राइस कॅन्यन : निसर्गाचा चमत्कार’, ‘रेडवुडच्या जंगलात’, ‘ड्रॅगनने उडवली भारताची झोप’, ‘मी अनुभवलेलं हार्वर्ड बिझनेस स्कूल’, ‘चकित करणारी ‘गुगल’ची कार्यसंस्कृती’, ‘स्त्रिया : दक्षिण आफ्रिका आणि भारत’, ‘एका अवलियाचं घर’, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’, ‘झिप लायनिंगचा थरार’, ‘अन्नपूर्णा बेस कँप : ‘एबीसी’ ट्रेक’, ‘योसेमिटी आणि हाफडोम ट्रेक’, ‘मोहीम : काला पत्थर’ अशी प्रकरणे पुस्तकात आहेत. ‘अ‍ॅक्यूट माउंटन सिकनेस(एएमएस) ऊर्फ पर्वतीय विकार’ या काहीशा अपरिचित आजाराबाबतची सविस्तर माहिती व तक्ता; शिवाय ट्रेकिंगविषयीची इत्थंभूत माहिती म्हणजे ट्रेकिंगला जाण्याची पूर्ण तयारीच ‘मोहीम : काला पत्थर’ या प्रकरणामध्ये दिल्यामुळे हे प्रकरण तर विशेष आकर्षक व वाचनीय झाले आहे.
प्रसिद्ध ठिकाणांची आकर्षक रंगीत छायाचित्रे पुस्तकाचे देखणेपण निश्चितच वाढवतात. उदा. झिम्बाब्वेमधील डेव्हिड लिव्हिंग्स्टनचा पुतळा, व्हिक्टोरिया फॉल्स, इजिप्तमधील व्हॅली ऑफ द किंग्ज, गिझा पिरॅमिड्स, प्रसिद्ध स्फिंक्स, स्कॉटलंडमधील लॉकनेस मॉन्स्टर आणि एडिंबरा फोर्ट, अलास्काची क्रुझशिप सफारी, अमेरिका येथील ब्राइस कॅन्यन, यलो स्टोन नॅशनल पार्क येथील अपर फॉल्स तसेच उष्ण पाण्याचे फवारे, शिखांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मत्स्यपुच्छरे आणि गंधर्व पीक, अन्नपूर्णा बेसकँप, अन्नपूर्णा साऊथ, देवभूमी गढवाल येथील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, रेडवुडचे जंगल, चीनमधील नवनिर्माण सेनेचे रेखीव शिल्प, शांघाय शहरातला सर्वात उंच टीव्ही टॉवर इत्यादी.
हे पुस्तक म्हणजे केवळ प्रवासवर्णन नसून या पुस्तकातून ‘गुगल’ किंवा ‘हार्वर्ड स्कूल’सारख्या व्यावसायिक स्थळांच्या भेटीतील अनुभव, चीन किंवा दक्षिण आफ्रिकेच्या सहलीमधल्या अनुभवांची वर्णनं त्या-त्या देशातील आर्थिक व सामाजिक पैलूंवरही प्रकाश टाकला आहे. याचबरोबर काला पत्थर, अन्नपूर्णा बेसकँप, योसेमिटी इ. ट्रेकमधले थरारक अनुभव वाचून अंगावर काटा येतो. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी, नवीन अनुभव घेण्यासाठी, प्रवासाच्या मधुर आठवणी कायम जपून ठेवण्यासाठी अत्यावश्यक बाब म्हणजे फिटनेस. हीच गोष्ट पूर्णपणे लक्षात घेऊन लेखिकेने पुस्तकाचा शेवट ‘पर्यटनासाठी फिटनेस हवाच!’ या प्रकरणाने केला आहे. आपल्याला काही आजार असेल तर मुबलक औषधे सोबत ठेवणे, शिवाय खाण्यापिण्याच्या वेळा पाळणे, सहलीचे स्थळ हे तिथला ऋतू, सोयीसुविधा, शिवाय आपल्यासोबत असणार्‍या प्रत्येकाचा विचार करून ठरवणे, अशा अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार या प्रकरणात केला आहे. सर्व वयोगटातील पर्यटकांना आवडेल, असेच हे पुस्तक आहे.
>पुस्तकाचे नाव : पर्यटन एक संजीवनी
>लेखिका : डॉ. लिली जोशी
>प्रकाशक : रोहन प्रकाशन
>मूल्य : रु. 200/-
sumedha.k@ dainikbhaskargroup.com