काही दिवसांपूर्वी ‘मसान’ बघायला गेलो होतो. खूप कौतुक केलं होतं लोकांनी आणि बघितल्यावर जाणवलं की, ते खरंच योग्य होतं. उत्तम चित्रपट, उत्तम कथा, पटकथा, संवाद, संगीत, व्यक्तिरेखा, दिग्दर्शन आणि परफॉर्मन्स. तर हा ‘सीरियस’ चित्रपट बघून आम्ही लिफ्टमध्ये उभे होतो, अगदी सुन्न. आणखी एक कुटुंब होतं आमच्यासोबत लिफ्टमध्ये, तेसुद्धा ‘मसान’ बघून येत होतं. पण त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून असं जाणवत होतं की ते पिक्चरमधून ‘बाहेर’ पडले होते. पण ते ठीक आहे. प्रत्येकाच्या संवेदना आणि भावना वेगळ्या असतात. मी आणि चिनू अंतर्मुख होऊन
आपापल्या विचारात मग्न होतो. तेवढ्यात त्या कुटुंबातील एका पुरुषाने मला विचारलं, ‘अरे, आप भी ऐसी सीरियस फिल्म देखते हो?’ मी काहीही बोलायच्या आत त्याने दुसरा टोला दिला. ‘सब टीव्ही पे हमको हंसाना भूल मत जाना,’ असं म्हणून त्याने ‘मी काय सॉलिड जोक मारला,’ या आविर्भावात एक लुक दिला. मला कळेना मी काय म्हणावं. मी फक्त ‘केविलवाणा’ हसलो आणि पुन्हा लिफ्टच्या दाराकडे एकटक बघत राहिलो. त्यानंतर मी आणि चिनू घरी आल्यावर ‘माझ्या’ प्रतिक्रियेवर हसलो. रसिकांकडून आपण केलेल्या कामाची तारीफ किंवा टीका ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मिळतच असते. निदान त्याच्यावर मला प्रतिक्रिया तरी देता येते. पण जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा खरंच दांडी गुल होते. माझ्यावर केविलवाणं होण्याची पाळी असंख्य वेळा आली आहे. मी ‘विनोदी’ मालिकांमध्ये दिसतो त्यामुळे माझ्यावर जोक्सचा वर्षाव होतच असतो.
एकदा मी आणि चिनू पार्ल्याच्या मार्केटमध्ये भाजी घेत होतो. भाजीवाल्याकडे मी थोडी घासाघीस (पैशांवरून) करत होतो. तर एक बाई म्हणाली, ‘अरे वाऽऽऽ मोनिशाने एकदम मस्त सिखाया है आप को.’ माझ्या ओठांवर आलं होतं की, ‘नाही हो, पाणीपुरीवाल्याचे पैसे दिल्यावर, भय्याजी एक सूखी पूरी देना, असं मागणाऱ्यातला आहे मी, त्यामुळे माझ्यात ‘मिडलक्लासियत’ खच्चून भरलेली आहे.’ पण पुन्हा मी ‘केविलवाणा’ हसलो...