आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराक युध्‍दाचा ताळेबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा वर्षांपूर्वी अमेरिकेने सद्दाम हुसेनच्या इराकी सरकारविरुद्ध युद्ध पुकारून 19 मार्च रोजी बॉम्बवर्षाव सुरू केला. सद्दामच्या लष्कराने अपेक्षा नसेल इतका प्रतिकार केला; पण अमेरिकेने इराकला धक्का आणि आश्चर्यजनक भीती वाटेल असा बॉम्बवर्षाव चालवला. यामुळे सद्दाम भूमिगत झाला आणि लवकरच अमेरिकनांच्या हाती सापडला. मग खटला होऊन त्याला फाशी देण्यात आले.


त्यानंतर मुख्यत: इराकचे सुन्नी लष्कर व लोक यांनी प्रतिकार चालू ठेवला. तो निष्फळ होता व पराभव पत्करण्यात आला. या सर्वाचा तेव्हा अमेरिकेत गौरव होत होता. आता युद्धाला दहा वर्षे झाली म्हणून दोन्ही राजकीय पक्षांनी काही समारंभ केला नाही. कोणाची भाषणे झाली नाहीत. वर्तमानपत्रांत लेख आले आणि टीव्हीवर काही मुलाखती वगैरे झाल्या. कारण बहुसंख्य अमेरिकनांना इराक युद्ध निरर्थक आणि देशाच्या कर्जात भर टाकणारे वाटते. युद्धात जवळजवळ साडेचार हजार अमेरिकन मरण पावले, तर तीन- साडेतीन हजार जखमी झाले. यात ब्रिटन, कॅनडा इत्यादी देशांच्या मृत व जखमींची भर घालायला हवी.


दीड लाखाहून अधिक इराकी मरण पावले; जखमींची संख्या फार मोठी असून अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या. सद्दामपाशी मोठ्या प्रमाणावर विनाश घडवून आणणारी रासायनिक व इतर शस्त्रे असून अण्वस्त्रे तयार करण्याचे त्याचे प्रयत्न असल्याचा पुरावा गुप्तहेर यंत्रणेपाशी असल्याचा दावा अमेरिकेचे तेव्हाचे परराष्‍ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांनी यूनोत केला होता. हे सर्व बिनबुडाचे होते. स्वीडिश तज्ज्ञाने तेव्हाच विरोधी मत व्यक्त केले असता बुश सरकारने त्याला वाळीतच टाकले होते.


इराक युद्धासाठी एकट्या बुश यांच्यावरच टीका होत असली तरी ते व त्यांचा रिपब्लिकन पक्ष हेच जबाबदार नव्हते. बुश यांच्या अगोदर अध्यक्ष असलेल्या बिल क्लिंटन सद्दामपाशी विनाशकारी अस्त्रे असल्याचे सांगून चार दिवस बॉम्बवर्षाव केला होता. बुश यांच्या इराकविरुद्धच्या लष्करी कारवाईस डेमॉक्रॅटिक पक्षाने संपूर्ण पाठिंबा दिला होता.


तसेच आज त्या युद्धाविरुद्ध लेख लिहिणारे अनेक पत्रकार आणि टीव्हीवरील भाष्यकार युद्धाचे जोरदार समर्थन करत होते. यांपैकी कोणीही आपल्या चुकीची कबुली दिलेली नाही.
युद्धाचे उद्देश कोणते हे सांगताना बुश म्हणाले होते की, सद्दामच्या एकछत्री राजवटीतून इराकी लोकांची मुक्तता करून लोकशाही राजवट आणणे आणि सर्वसामान्य लोकांचे कल्याण करणारी विविध पंथांच्या लोकांचा पाठिंबा असलेली राजवट स्थापन करणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे.


परंतु आज इराकची अवस्था काय आहे? इराकची राज्यघटना तयार केली ती अमेरिकनांनी. प्राथमिक अवस्थेत राज्यकर्ते निवडले ते अमेरिकेने. अमेरिकन मुख्याधिकारी हे व्हाइसरॉय झाले होते आणि लष्करी व सनदी अधिकारी इराक ही वसाहत समजून वागत होते. अमेरिका नुसती युद्ध करून थांबणार नव्हती, तर इराकची राजकीय पुनर्रचनाच करण्याचे धोरण होते; पण सद्दामचा पराभव करणे वेगळे आणि दुस-या देशाचा अंतर्गत कारभार चालवणे वेगळे.
साम्राज्यसत्ता गाजवणारे अनेक ब्रिटिश आपला देश सोडून काही वर्षे अधिकाराखालील देशांत घालवत; काही जण स्थानिक भाषा बोलत; काहींनी तर अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले. इराक काय की अफगाणिस्तान काय, बहुतेक अमेरिकन अधिका-ना यांची काही माहिती नाही; स्थानिक भाषा अवगत नाही.
इराकमध्ये सुन्नी, शिया व कुर्द असे तीन पंथांचे लोक आहेत. त्यांचे कधीही पटले नाही. यापैकी शिया साठ टक्के, सुन्नी वीस टक्के आणि कुर्द पंधरा टक्के अशी वाटणी आहे. सद्दामने वीस टक्के सुन्नींचे वर्चस्व साठ टक्के शियांवर बसवले व स्वत:ची हुकूमशाही चालवली.


इराकी युद्धामुळे बहुसंख्य शिया हे वरचढ झाले आणि कुर्द हे पूर्वीही जवळजवळ स्वायत्त होते तसे ते आताही आहेत. तेव्हा संमिश्र लोकशाही राजवटीची बुश यांची भाषा व्यर्थ होती. विद्यमान पंतप्रधान नुरी अल मालिकी हे तिसरे पंतप्रधान, ते अपेक्षेपलीकडे अधिक काळ टिकले. केवळ पंचवीस टक्के मतांच्या जोरावर पंतप्रधान होऊन स्थिरावणे हे सोपे नव्हे.
अर्थात त्यांना अमेरिकेचा पाठिंबा होता. राजकीय पाठिंबा थोडा असलेला पंतप्रधान आपल्या कलाने वागेल, ही अमेरिकेची अपेक्षा मात्र फोल ठरली. मालिकी यांनी आपण अमेरिकेच्या हातातील बाहुले नाही, हे दाखवून स्वत:चे बस्तान बसवले. तसेच लोकशाही यंत्रणा व कायदे वापरूनही एकतंत्र स्वतंत्र म्हणून कारभार करता येतो, हे दाखवून त्यांनी आपल्या बहुतेक विरोधकांची गठडी वळली. सद्दामच्या बाथ या पक्षाचे कार्यकर्ते त्यांनी बंदिस्त केले आणि राजकीय विरोध कमी केला.
अमेरिका व इराण यांचे वैमनस्य जुने आहे, पण त्याच इराणशी मालिकी यांचे जवळचे संबंध आहेत. दोघांचा समान असा शिया पंथ हा मोठा दुवा आहे. यामुळे इराणकडून मालिकी यांनी बरीच आर्थिक मदत मिळवली आहे. त्याचबरोबर इराण सीरियाला जो शस्त्रपुरवठा करते, तो घेऊन जाणा-या इराणी विमानांना इराकचा हवाई मार्ग मोकळा आहे.


इराक तेलाने संपन्न व्हायला हवा. पण सद्दामला ते जमले नाही आणि मालिकी यांनाही नाही. तेलाचे उत्पादन वाढले आहे, पण ते अधिक वाढणे शक्य होते. हा तेलाचा पैसा मूठभर लोकांच्या हाती आहे व त्यांनी परदेशात संपत्तीचा ओघ पाठवण्याची व्यवस्था केली आहे.


यामुळे वाहतूक, वीजपुरवठा, रोजगार, आरोग्य, शिक्षण अशा सर्वच बाबतीत सर्वसामान्य इराकी पूर्वीइतकाच वंचित आणि म्हणून चिंतामग्न आहे. त्यातच शिया व सुन्नी यांच्यातल्या वैमनस्यामुळे सतत दंगली होतात आणि रक्तपात थांबलेला नसून अनिश्चितता संपलेली नाही.


इजिप्तमधील कल्पनेतला वसंत सद्दामची राजवट नष्ट केल्यामुळे अवतरला, अशी अमेरिकेतल्या अनेक बुश पाठीराख्यांची समजूत आहे. एक तर इजिप्तमधील वसंत हा एक भास होता आणि इराक युद्धाशी त्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही.
सौदी अरेबियाच्या खालोखाल इराकमध्ये तेलाचा साठा असल्याचे मानले जाते. सद्दामला नाहीसा केल्यावर या तेलसाठ्यातील बराचसा आपल्या हाती येईल, ही अमेरिकेची अपेक्षा फोल ठरली. इराकमधील अस्थिरतेमुळे तेलाचा उद्योग वाढणे शक्य नाही आणि मालिकी हे अमेरिकेचे पूर्ण वर्चस्व स्थापन करू देतील, असा संभव कमी आहे.


तेल आणि राजकीय वर्चस्व या जोरावर मध्यपूर्वेवर नियंत्रण ठेवता येईल, अशी कल्पना करून बगदादमध्ये अमेरिकेने आपली प्रचंड वकिलात स्थापन केली. तशी ती जगात कोठेही नाही. परराष्‍ट्र, संरक्षण, गुप्तहेर इत्यादी खात्यांचे अधिकारी इराकमध्ये सल्लागार पुरवणार होते. दहा हजार व त्यापेक्षाही अधिक लोकांचा वावर वकिलातीच्या परिसरात होणार होता. तिथे खेळापासून अनेक सुखसोयी केल्या. पण आताच पन्नास टक्क्यांपेक्षा अगदी थोड्या लोकांचा वावर होतो आणि पुढे

अधिक कपात होण्याचा संभव आहे.


म्हणजे युद्ध सुरू केले ते राजकीय प्रभावाखाली वावरत असलेल्या गुप्तहेर खात्याच्या अहवालामुळे. युद्धाचा निर्णय अगोदरच घेऊन पुरावे जमा केले की काय, असा प्रश्न पडतो. नंतर इराकची पुनर्रचना करणा-च्या अज्ञानाला सीमा नव्हती. साहजिकच सर्व डोलारा अंगावर कोसळला आणि अमेरिका अधिक कर्जबाजारी झाली.


यासाठी एक व्यक्ती वा एक राजकीय पक्ष यांना जबाबदार धरून चालणार नाही. दुस-या महायुद्धात विजय मिळवण्यात अमेरिकेचा वाटा मोठा होता. पण त्यानंतर लोकशाही जगाचे पुढारीपण आपल्याकडे असून सर्व जगाचे नियंत्रक आपण आहोत, असा गंड अमेरिकन समाजातच निर्माण झाला. त्याची ही परिणती आहे.


govindtalwalkar@hotmail.com