आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नातली रविवारची सुटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार ते शनिवार पहाटे पाचच्या ठोक्याला तिचा दिवस सुरू होतो. पण किमान रविवारी तरी तास-दोन तास घड्याळ का बंद पडू नये? रोज ऑफिस टेबलवरच्या फायलींमध्ये गुंतणा-या जिवाने किमान एक दिवस तरी पूर्णपणे स्वत:साठी का खर्ची घालू नये किंवा माऊस हाताळून थकलेल्या तिच्या बोटांनी सुटीच्या दिवशी तरी टीव्ही रिमोटवर का हक्क गाजवू नये? असे काहीसे अवघड प्रश्न हल्लीच्या नोकरदार महिलांना पडू लागले आहेत. परंतु दुर्दैवाने हे प्रश्नही मनातच राहतात आणि आठवड्याच्या सुटीचा परू्ण दिवस घरातली बाकीची कामे निपटण्यात खर्ची पडतो.
सध्याच्या नोकरदार स्त्रियांसाठी मनासारखी साप्ताहिक सुटी आजही स्वप्नवतच आहे. आठवडाभर घर, मुलं, नोकरी, नवरा, सणवार, पैपाहुणे अशा अगणित जबाबदा-या सांभाळणा-या महिलांच्या रविवारच्या सुटीचे वेळापत्रक, ‘नको ती सुटी’ असे वाटण्याइतपत बिझी असते. सुटीच्या दिवशी विश्रांतीचे क्षण मिळणं अवघड, मग पुस्तक-पेपर वाचन, छंद जोपासणं, स्वत:च्या फील्डसंबंधी अपडेट होणं, असा स्वत:साठीचा ‘क्वालिटी टाइम’ काढणं हे तर दुरापास्तच.
महिलांची साप्ताहिक सुटी यावर ‘मधुरिमा’ने नुकतेच एक सर्वेक्षण केले. नोकरदार महिला साप्ताहिक सुटीच्या दिवशी कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतात, कुठले छंद जोपासतात, स्वत:साठी वेळ काढतात का, वाचन करतात का, जुन्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधतात का, पगारापैकी किती रक्कम स्वत:वर खर्च करतात, नोकरीनंतर नवीन छंद जोपासला आहे का, अशा विविध प्रश्नांच्या अनुषंगाने काही मैत्रिणींशी आम्ही संवाद साधला. बँकिंग, इंजिनिअरिंग, डॉक्टर्स, शिक्षिका-प्राध्यापिका, पार्लर आणि घरगुती उत्पादने बनवणा-या अशा विविध क्षेत्रांतल्या महिलांची मते आम्ही जाणून घेतली. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असूनही अनेकींची सुटीबाबत मात्र संकुचित संकल्पना या सर्व्हेदरम्यान दिसून आली.


स्वत:ला गृहीत धरू नका- जवळपास 75 टक्के महिला सुटीच्या दिवशी घरकामाला प्राधान्य देत असल्याचं या सर्वेक्षणात दिसलं. त्यानंतर मुलांचा अभ्यास, नवरा, नातेवाईक यांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे या प्रश्नाच्या पर्यायात ‘स्वत:साठी’ या प्राधान्य पर्यायाला केवळ एक टक्का महिलांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला.
सुटीच्या दिवशी कुटुंबासाठी वेळ म्हणजेच स्वत:साठी वेळ असं बहुतांश महिलांना वाटतं. कुटुंबासाठी वेळ देताना महिला त्यात स्वत:ला गृहीत धरतात. जसा कुटुंबातला परस्परांमधला संवाद वाढायला हवा तसंच स्वत:चं स्वत:शी बोलणं होणंही गरजेचं आहे. नेमकं तेच होताना दिसत नाही. बाकी सगळ्यांशी आपण गप्पा मारतो, पण आपण आपलंच कधी ऐकतो का? घुसमट, चिडचिड हे प्रकार त्यातून सुरू होतात. म्हणून हा संवाद घडण्यासाठी प्रत्येकीने स्वत:साठी क्वालिटी टाइम काढावा. नवीन विषयावरचं एखादं पुस्तक, कविता, टीव्हीवरील आवडता कार्यक्रम, विविध वर्तमानपत्रांच्या पुरवण्या, अशा बुद्धीला चालना देणा-या गोष्टींसाठी हा वेळ द्यायला हवा.


छंद जोपासा-अपडेट राहा- नोकरीनंतर एखादा नवीन छंद जोपासलाय का, असाही प्रश्न मैत्रिणींना विचारला होता. मात्र केवळ 1 टक्का नोकरदार महिलांनीच याला सकारात्मक उत्तर दिलं. बहुतांश महिलांनी नोकरी-व्यवसाय सुरू केल्यानंतर कोणताही नवीन छंद आत्मसात केलेला नाही किंवा जुना जोपासलेला नाही. लग्नाआधी मी अमुक करायचे, तमुक करायचे याच्या आठवणी काढत त्या फक्त हळहळ व्यक्त करतात. छंद फक्त ‘टाइमपास’ नसतो. आवडीचा छंद मन प्रसन्न करतो, व्यथा-चिंता दूर ठेवतो. मनाची मशागत करतो. छंद हा प्रचंड ऊर्जा देणारा, ताजेतवाने करणारा असतो.


छंद केवळ विरंगुळा नसतो. तुमची सकारात्मकता वाढवतो. नवीन माहिती मिळते. ओळखी होतात. शिवाय असा छंद तुमच्या नोकरी-व्यवसायाशी संबंधित क्षेत्रातला असेल तर दुधात साखर. कारण त्यामुळे तुमच्या क्षेत्राशी संबंधित अद्ययावत माहिती तुम्हाला मिळू शकते.


स्वत:साठी काढा ‘क्वालिटी टाइम’- आजची नोकरदार स्त्री, विचार पुरोगामी पण वर्तणुकीवर पगडा मात्र पारंपरिक पद्धतीचा, अशा कात्रीत सापडलीय. नोकरीमुळे कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही या भावनेमुळे, अनेकींचा सुटीचा दिवसही पेंडिंग कामे उरकण्यात संपतो. काही मोजक्या जणी स्वत:साठी वेळ काढतात. मात्र हा वेळ या महिला पार्लर, शॉपिंग, नातेवाइकांना फोन, झोपणं, भिशी, सिनेमा यासाठी देतात. यासाठी वेळ देणं चुकीचं नाही. पण काही पॉझिटिव्ह आऊटपुट मिळेल यासाठी वेळ देणं फायद्याचं नाही का?


क्वालिटी टाइमसाठी टिप्स- महिला कौटुंबिक जबाबदारीतून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाहीत. मात्र नियोजन, संवाद आणि इच्छाशक्तीच्या मदतीने त्यातून मार्ग नक्कीच काढता येऊ शकतो. घरकामात सर्वांचा सहभाग असण्यासाठी सदस्यांशी संवाद साधा. घरातल्या कामाची जबाबदारी प्रत्येकाची आहे, स्वत:ची कामं स्वत: करायला हवीत याची जाणीव इतरांना करून द्या. केवळ कर्तव्यभावाने घरकाम करण्याऐवजी ती कामं मनापासून करणं यातला फरक मुलांना समजावून द्या. सुटीच्या दिवशी तुम्हाला स्वत:साठी वेळ काढणं आवश्यक आहे हे त्यांना पटवून द्या. घरातलं प्रत्येक काम मी केलंच पाहिजे ही भावना बाजूला सारा. स्वत:साठी राखलेल्या वेळात काहीही झालं तरी इतर कुठलंच काम करणार नाही हे मनाशी पक्कं करा.


दैनंदिन जीवनातल्या चक्रामुळे येणा-या थकवा, ताणतणाव याचा परिणाम कुटुंबावर होतो. करिअरवर होतो. म्हणूनच शरीराला, मनाला आलेली मरगळ झटकून टाकता यावी, प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद लुटता यावा आणि नवीन काहीतरी गवसल्याचा, सर्जनशीलतेचा आनंद उपभोगता यावा याकरिता स्वत:साठी वेळ काढायलाच हवा. मग त्याकरिता थोडंसं स्वार्थी व्हावं लागलं तरी
अशी असावी साप्ताहिक सुटी

* मीनाक्षी डोंगरे (बँक कर्मचारी, औंरंगाबाद) - कुठलंच टाइमटेबल नाही, अगदी रिलॅक्स असा ऑफ असावा. गेल्या पंचवीस वर्षांत मनासारखी सुटी अनुभवलेली नाही.
* सोनाली देशमुख (प्राध्यापक, औरंगाबाद)- सुटीच्या दिवशी भरपूर वाचन आणि डिस्कव्हरी चॅनल पाहावेसे वाटते. पण व्यग्र दिनक्रमामुळे क्वचित अशी संधी मिळते.
* प्रतिभा शिरसाठ (व्यावसायिका, जळगाव)- कुटुंबातील सदस्यांनी नोकरदार महिलांना घरकामात मदत केल्यास महिलांना सुटीच्या दिवशी स्वत:साठी वेळ मिळेल.
* प्रतिभा बिराजदार (व्यावसायिका, सोलापूर)- कुटुंबासोबत दिवस घालवावा. प्रत्येकाने कामे वाटून घ्यावी.
* अ‍ॅड. गीता देशपांडे - (औरंगाबाद)-सुटीचा दिवस कार्यरत ठेवणारा असावा. सुटीच्या दिवशी प्रयत्नपूर्वक स्वत:साठी वेळ काढतेच.
* वर्षा देसाई (नोकरी, सोलापूर)- सुटीचा दिवस मौजेचा असावा. सुटीचा योग्य उपयोग व्हावा. स्वत:च्या आणि कुटुंबाच्याही दृष्टीने.
* प्रा. डॉ. शुभदा धारूरकर (प्राध्यापिका, औरंगाबाद) - प्रत्येक कमावत्या महिलेने स्वत:साठी काढलेला वेळ सत्कारणी लावावा. आवडत्या छंदासाठी वेळ द्यावा.
* अश्विनी दाशरथे (नोकरी, औरंगाबाद)- नोकरी करणा-या महिलांना कुटुंबातील सदस्यांनी घरकामात मदत केल्यास त्यांना सुटीच्या दिवशी स्वत:साठी वेळ मिळेल.
* अ‍ॅड. अनुराधा वाणी (जळगाव)- सुटीच्या दिवसातला किमान काही वेळ तरी स्वत:साठी देता यावा. असा वेळ स्वत:साठी देता आला तर मूडही चांगला राहतो. पुढच्या सुटीपर्यंत काम करणे सोपे जाते.