म्युच्युअल फंड SIP वरील माझ्या मागील लेखावर तुम्ही सर्वांनी ई-मेलवर जो प्रतिसाद दिला, त्याने माझा उत्साह तुम्ही नक्कीच वाढवला आहे. तुम्ही सर्व म्युच्युअल फंडाबद्दल जास्तीत जास्त जाणून घेऊ इच्छिता हे पाहून खरोखरच आनंद झाला. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उद्दिष्टांसाठी म्युच्युअल फंडइतका चांगला कोणताही गुंतवणूक प्रकार नाही, हे मी माझ्या २५ वर्षांच्या या क्षेत्रातील अनुभवावरून निश्चितपणे सांगू शकतो.
अनेक गुंतवणूकदारांच्या मनात अजूनही म्युच्युअल फंडाबाबत शंका-कुशंका आहेत. तेव्हा सर्वात आधी ही भीती दूर करूया! सुरुवातीला ५-६ वर्षे या योजनांमधील पैसा मार्केटच्या चढउतारानुसार कमीजास्त होत राहील. होय, तुम्ही भरलेल्या पैशांपेक्षा कमीसुद्धा होऊ शकतो आणि म्हणूनच दीर्घ अवधीसाठी म्हणजेच १५ वर्षांवरील उद्दिष्टांसाठी सर्वात उत्तम गुंतवणूक! १५ वर्षांनंतर गुंतवणुकीत काही धोके आहेत का? अजिबात नाही. धोका तर नाहीच नाही, उलट आकर्षक परतावा मिळण्याची खात्री मिळवता येईल. आकर्षक परताव्याची काही गॅरंटी असते का? अशी कुठलीही गॅरंटी नसते! मग तुम्ही म्हणाल खात्री कशाची? या खात्रीला आधार आहे मागील १५ वर्षे व त्यावरील म्युच्युअल फंडांचा. १५ वर्षे पूर्ण झाली आहेत अशा सर्व चांगल्या फंड हाउसच्या फंडांनी १५% च्या वर परतावा दिलेला आहे. काही योजनांनी तर वार्षिक २५% च्या वर परतावा दिलेला आहे आणि हे सगळे रिटर्न्स संपूर्णपणे करमुक्त आहेत. तुम्ही ८० C कलमाच्या अंतर्गत करांसंबंधी योजनांमध्ये गुंतवणूक केली तर त्यावरसुद्घा आयकर करातून दीड लाखापर्यंत सूट मिळेल.
आता महत्त्वाचा प्रश्न SIP म्हणजे काय? याला सोप्या भाषेत म्युच्युअल फंडची RD असे म्हणता येईल. दरमहा एक विशिष्ट रक्कम १५ वर्षांपर्यंत भरायची, कमीत कमी १००० रु. महिना आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही. आता हे पैसे भरायचे कोठे? तुमच्या गावात माझ्यासारखे म्युच्युअल फंडचे काम करणारी मंडळी असतील त्यांना शोधा. आता शोधायचे कोठे? www.amfiindia.com या वेबसाइटवर ही माहिती मिळेल आणि असे कोणी तुम्हाला शोधता नाही आले तर मला ई-मेल करा,
आपण काहीतरी मार्ग काढू.
आता SIP सुरू करायची, तर कोणत्या फंडात? माझ्या मते BIRLA, HDFC, FRANKLIN, ICICI हे खूप चांगले फंड हाउसेस आहेत. यांच्या योजनांचा १५-२० वर्षांचा पूर्वेतिहास आहे व सर्वांचा परतावा आकर्षक आहे. यांच्या कोणत्याही योजना तुम्ही निवडू शकता! तरी पण नाव विचाराल तर बिर्ला फ्रंटलाइन इक्विटी, बिर्ला इक्विटी, HDFC इक्विटी, HDFC टॉप २००, HDFC प्रुडेन्स, फ्रँकलीन ब्लूचिप फंड, ICICI फोकस ब्लूचिप फंड किंवा डायनॅमिक फंड इ. ज्यांची जास्त जोखीम घ्यायची तयारी आहे ते HDFC मिडकॅप, ICICI डिस्कव्हरी, DSP मायक्रो कॅप इ. फंडांमध्ये SIP सुरू करू शकतात.
तुमच्या मनात भीती वा शंका का आहेत? कारण तुमचा जुना अनुभव चांगला नाही. का चांगला नाही? कारण तुम्ही एक तर युनिट लिंकच्या विमा योजनांमध्ये पैसे भरले आिण ३ वर्षांत, ५ वर्षांत आकर्षक परताव्याची अपेक्षा करीत होता. १५ वर्षे + चा SIP प्लानचा मार्ग निर्धोक आहे, कोणताही धोका व्हायची शक्यता नाही. हे सर्व मी माझ्या स्वत:च्या गुंतवणुकीच्या अनुभवावरून सांगतो. माझे आज बँकेत FD नाही, कोणत्याही पोस्टात FD नाही तर म्युच्युअल फंडातच माझी गुंतवणूक आहे. म्हणूनच मी या मार्गावरून चालण्याचा आग्रह करीत आहे.
मंडळी आज
गुगलवर तुम्ही पाहिजे ती माहिती मिळवू शकता. मागील काही वर्षांत विदेशी गुंतवणूकदारांनी किती प्रचंड पैसा आपल्या मार्केटमध्ये गुंतविला आहे याची पण माहिती तुम्हाला गुगलवर मिळवता येईल. किती विचित्र परिस्थिती आहे, की विदेशी गुंतवणूकदार आपल्याकडे गुंतवणूक करून आकर्षक रिटर्न्स मिळवत आहेत आणि आपण आपल्याच सरकारवर, अर्थव्यवस्थेवर, आपल्या भविष्यातील आकर्षक प्रगतीवर विश्वास ठेवत नाही. मला तर या सर्वांवर आणि मी जात असलेल्या मार्गावर संपूर्ण विश्वास आहे, तुमचासुद्घा आहे का?
(लेखातील मते वैयक्तिक आहेत. कृपया कोणतीही गुंतवणूक करताना अधिकृत कर/गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊनच करावी. कोणत्याही अनिष्ट परिणामांना दै. दिव्य मराठी वा मधुरिमा जबाबदार नाहीत - संपादक.)