आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकर सुरुवात हाच मंत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुंतवणुकीला प्रत्येकाच्याच आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असावयास पाहिजे; परंतु दुर्दैवाने आजही आपण याबाबतीत खूपच उदासीन आहोत. विशेषतः महिलांचा सहभाग या क्षेत्रात तर अगदीच नगण्य. फक्त सही करण्यापुरताच आणि त्या पण बहुतांश वेळेला चुकीच्याच. सही म्हटलं की एकच, एकसारखी सही आली पाहिजे. कधी-मराठी-कधी इंग्रजी असे नको. गुंतवणूक विषयात महिलांनी अधिक रुची घेणे आज आवश्यक झाले आहे. इतके काहीच कठीण नाही. अनेक महिला मंडळं आहेत, त्यांच्या सभांना या विषयातील तज्ञांना मार्गदर्शनासाठी बोलावता येऊ शकते.
गुंतवणूक विषयाची सुरुवात कुठून करायची तर गुंतवणुकीच्या मुख्य उद्दिष्टांपासून. काय असतात बरे मुख्य उद्दिष्टे?
१. घर खरेदी
२. वाहन खरेदी
३. मुलांचे उच्च शिक्षण
४. मुलांची लग्नं
५. निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन.
यातील सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन, कारण निवृत्तीनंतरसुद्धा २० ते ४० वर्षांचे आयुष्य आपल्याला आनंदात काढावयाचे आहे. बाकी उद्दिष्टांसाठी एक वेळ तुमच्याजवळ पैसा नसला तरी त्यावर मार्ग आहेत, जसे मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची सुविधा बँकांमध्ये उपलब्ध आहे. लग्नासाठी पुरेसा पैसा नसेल तर लग्नाच्या यादीतून चितळे व इतरांना वगळू शकता, परंतु निवृत्त झाल्यानंतर तुमच्याजवळ पैसा नसेल तर तुमची मुलंसुद्धा तुम्हाला विचारणार नाहीत. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य द्या. आता याची सुरुवात केव्हा करायची? याची सुरुवात करण्याचा आदर्श काळ आहे नोकरी-धंद्याला लागल्याबरोबर पहिल्या महिन्यापासून. लवकर सुरुवात हा गुंतवणुकीतला सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे. जितक्या लवकर सुरुवात तितका चांगला परतावा तुम्हाला निश्चितपणे मिळेल कारण जितका जास्त वेळ तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला द्याल तितका जास्त परतावा मिळणार आहे, चक्रवाढ व्याजाच्या जादूमुळे. चक्रवाढ व्याजाच्या या जादूला जगातले आठवे आश्चर्य मानण्यात येते.
आता गुंतवणूक करायची तर कुठे? अनेक लोक विमा प्रकारालासुद्धा गुंतवणूक समजतात, परंतु हे अत्यंत चुकीचे आहे. विमा नक्कीच घ्यायला पाहिजे व तो जास्तीत जास्त रकमेचा घ्यायलाच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या राहणीमान- मिळकतीनुसार विमा रक्कम निश्चित करता येईल. मध्यमवर्गीय व्यक्तीचा विचार केला तर आज ५० लाख ते १ कोटीचा विमा घेणे आवश्यक झाले आहे आणि टर्म इन्शुरन्ससारखी चांगली इतर कोणतीही पॉलिसी नाही. त्यामुळे माझा सल्ला घेणार असाल तर मोठ्या रकमेची एक टर्म इन्शुरन्स पॉलिसी अवश्य घ्या. सर्वात कमी प्रीमियममध्ये मोठ्या रकमेच्या विम्याचे आपले उद्दिष्ट यामध्ये निश्चितपणे साध्य होईल. एक PPF अवश्य सुरू करा; परंतु सुरुवातीला १० वर्षे त्यामध्ये मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडाच्या टॅक्स वाचवण्याच्या योजनांना प्राधान्य द्या.
ही लेखमाला व त्याचा मुख्य विषय आहे म्युच्युअल फंड. गुंतवणूकदार मात्र अजूनही या गुंतवणुकीबद्दल उदासीन आहेत. गुंतवणूकदारांचा गुंतवणूक करण्यासाठी सर्वात शेवटचा पर्याय असतो म्युच्युअल फंड आणि जेव्हा केव्हा अडीअडचणीत पैसे काढण्याची वेळ येते तेव्हा कुठून काढायचे तर काढण्यासाठी पहिला पर्याय असतो म्युच्युअल फंड. मंडळी, असे करू नका. म्युच्युअल फंड समजून घेऊन गुंतवणूक करा. याच्यासारखी गुंतवणूक दुसरी कोणतीच नाही. काय योजना आहेत MF मध्ये?
सर्वात पहिला प्रकार लिक्विड फंडाचा. बचत खात्यात जो तुमचा पैसा झोपून असतो त्याला १५ दिवस ते ६-८ महिन्यांसाठी गुंतवण्यासाठीचा आकर्षक पर्याय, बचत खात्यापेक्षा दीडपट ते दुप्पट व्याज आणि आवश्यकता असेल तेव्हा पैसा काढून घेण्याची सोय, २४ तासांत पैसे तुमच्या खात्यात जमा. त्यानंतरच्या योजना आहेत बाँड फंड, एमआयपी, बॅलन्स फंड व इक्विटी फंड. जसजसे आपण शेअर्सचे प्रमाण योजनेमध्ये वाढवत जाऊ तशी आपली जोखीमसुद्धा वाढत राहील, परंतु सर्वात आकर्षक परतावा तुम्हाला १००% शेअर्सच्या योजनांमध्येच मिळेल. म्युच्युअल फंडात काही गॅरंटी असते का? सेबीच्या नियमांमुळे अशी कोणतीही गॅरंटी देता येत नाही; परंतु आज ज्या योजनांना १५-२० वर्षे झाली आहेत त्यांनी पण तेव्हा अशी कोणतीही गॅरंटी दिलेली नव्हती. आज त्या योजनांमध्ये १५-२०% चा परतावा आज मिळतो आहे आणि तोसुद्धा संपूर्णपणे करमुक्त. त्यामुळे 15G/15H किंवा 16A पासून पूर्णपणे मुक्तता. इतका चांगला परतावा मिळत असतानासुद्धा सर्वसामान्य गुंतवणूकदार आज म्युच्युअल फंडापासून दूर आहे याचे सखेद आश्चर्य वाटते.
तुमचा नक्की कोणावर विश्वास नाही? सरकारवर, भारताच्या अर्थव्यवस्थेवर, भारताच्या उज्ज्वल भविष्याबद्दल की माझ्यासारख्या सल्लागारावर? मंडळी असे करू नका. तुमच्याकडे गुंतवणूक सल्लागार नसल्यामुळेच तुम्हाला या योजनांपासून वंचित राहावे लागते. गुंतवणूक सल्लागार आज आवश्यक आहे आणि म्युच्युअल फंड काळाची गरज आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडच्या मार्गाने जाणा-या योग्य सल्लागाराचीच निवड करा आणि बघा तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या लक्ष्याकडे किती सहज आणि लवकर पोहोचता ते.
आता या योजनांमध्ये जी जोखीम असते ती कमी करण्याचे उपाय म्हणजे SIP व STP. आज जर तुम्ही SIP-STP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करीत नसाल तर मी खात्रीने सांगतो की, गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही नक्कीच चुकीच्या रस्त्यावरून चालला आहात. SIP-STP हा इक्विटी फंडातील जोखीम दूर करण्याचा सर्वोत्तम आणि निर्धोक मार्ग आहे. तेव्हा मनातील सर्व भीती व शंका काढून म्युच्युअल फंडाला स्वीकारा, नुसतेच स्वीकारू नका तर पूर्ण क्षमतेने गुंतवणूक करा. तुमची क्षमता १०,००० रु. महिना, २५,००० रु. महिना SIP करण्याची असेल तर अवश्य करा. दीर्घकाळासाठी करा. तुम्हाला उत्तमच परतावा मिळेल याची खात्री देतो. आंब्याचे झाड आठवते ना? पहिल्या पाच वर्षांत परताव्याची आशा करू नका व जेव्हा-जेव्हा आंब्याचे झाड वाळतंय असं दिसेल म्हणजेच गुंतवणुकीत परतावा नसेल, गुंतवणूक रकमेपेक्षाही पैसे कमी झाले तरी घाबरू नका, हीच- होय, हीच वेळ असते म्युच्युअल फंडात पूर्ण ताकदीने गुंतवणूक करण्याची. अशी वेळ आली तर अगदी FDमधील पैसासुद्धा MFमध्ये गुंतवा. तुमचा परतावा अधिकच आकर्षक होईल.
आणि हो श्रीसूर्या, केबीसीसारख्या योजनांपासून दूर राहा. अशा योजनांचा शेवट हा खूपच वाईट असतो. म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी खूपखूप शुभेच्छा.

(मधुरिमामधील या सर्व लेखांची एक पुस्तिका तयार होणार आहे. ती २० जानेवारीनंतर उपलब्ध होऊ शकेल.)