आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोभ आणि भीतीचा खेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी अमुकअमुक बँकेतून बोलतो आहे, असे फोन करून फसवणुकीचे नवीन तंत्र लोकांनी शोधून काढले आहे. फोनवरील संभाषणाने तुम्हाला आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जातात आणि आज या योजनेचा शेवटचा दिवस आहे, असे सांगून तुम्हाला विचार करायलासुद्धा सवड न देता कोणती तरी योजना तुमच्या माथी मारली जाते. असे प्रकार सर्रास सुरू आहेत व अनेक गुंतवणूकदार अशा फोन कॉल्सवर फसवले जात आहेत. मुळात हे फोन बँकेतून आलेलेच नसतात. विशेषत: दिल्ली-कोलकाता इथून हे फोन करण्याचे प्रकार सुरू आहेत. तेव्हा अशा फोन करणार्‍यांपासून सावधान! गुंतवणूक नेहमी आपल्याच गावातील नामांकित गुंतवणूक सल्लागाराकडून व्हायला पाहिजे. पाच-दहा हजार रुपये जरी गुंतवायचे असतील तरी ते योग्य सल्ल्यानेच व्हायला पाहिजे. आजकाल काही बँकांमध्ये अशी सोय आहे; परंतु या बँकांपासूनसुद्धा सावध राहावयास पाहिजे. कारण 2-3 वर्षांनी जेव्हा तुम्हाला काही काम असतं तेव्हा ती व्यक्ती बदलून गेलेली असते व तुम्हाला बँकेतील कोणीही मदत करीत नाहीत हा अनेकांचा अनुभव आहे. तेव्हा योग्य व्यक्तीकडून योग्य सल्ला घ्या व आपली फसवणूक होऊ देऊ नका.
मागील काही वर्षांत अनेक कंपन्यांनी फसवणुकीच्या अनेक योजना आणल्या. नागपूरच्या श्री सूर्या इन्व्हेस्टमेंटचे उदाहरण अगदी ताजे आहे. या कंपनीने 2 वर्षांत दुप्पट किंवा व्याज पाहिजे असल्यास एक लाखावर दर तिमाही 12,500 रु. व्याज अशी योजना आणली होती. सुरुवातीला काही वर्षे पैसा/व्याज परत करून एक प्रकारे विश्वास निर्माण करतात आणि नंतर गुंतवणूकदारांच्या लोभी स्वभावाचा गैरफायदा घेऊन पसार होतात. आता श्री सूर्यामध्ये लोकांनी लाखो रुपये गमावले; परंतु या गुंतवणूकदारांनी काय फक्त पैसाच गमावला का? पैशाबरोबरच झोप आणि शांतीसुद्धा गमावली. मिळवले काय तर उच्च रक्तदाब, मानसिक त्रास, पोलिस स्टेशन आणि कोर्टाच्या चकरा.
गुंतवणुकीत लोभ आणि भीती हे दोन घटक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि गंमत म्हणजे लोभापायी नको तेथे गुंतवणूक आणि भीतीपोटी चांगली गुंतवणूकसुद्धा आपण नाकारत असतो. साधासा विचार आहे, दोन वर्षांत दुप्पट कसे शक्य आहे? मला एक तरी व्यवसाय असा दाखवा ज्यामध्ये दर दोन वर्षांनी रक्कम दुप्पट होते. मला तरी एकही क्षेत्र असे दिसत नाही. अरे, जी गोष्ट टाटा-बिर्ला-अंबानी यांना जमणे अशक्य आहे तिथे आपल्यासारख्या सामान्य माणसांचा काय टिकाव लागणार आहे? बरे, अशा संशयास्पद योजनांमध्ये गुंतवणूक करणारी मंडळी कोण, तर डॉक्टर्स, इंजिनिअर्स, प्राध्यापक इ. आहे की नाही कमाल? सुशिक्षित लोकांनी इतके लालची व्हावे? आणि गुंतवलेली रक्कम किती, तर 25 लाख, 50 लाख, 95 लाख! दोन वर्षांत दुप्पट देण्याची क्षमता फक्त रिअल इस्टेट आणि शेअर्स-म्युच्युअल फंड यांमध्येच आहे; परंतु असा काळ 10-15 वर्षांत एकदाच येत असतो. आणि डोळसपणे गुंतवणूक करणारे 5 % लोकच त्याचा लाभ घेतात. आता या तेजी-मंदीची पण मोठी गंमत असते. 5-7 हजार रुपये तोळा सोने होते तेव्हा कोणालाच ते घ्यायचं नव्हतं. 25-30 हजार रुपयांवर भाव गेल्यावर सगळ्यांना सोनंच घ्यायचं होतं. तीच गोष्ट रिअल इस्टेटची किंवा शेअर्स -म्युच्युअल फंडची. मंदी ही गुंतवणुकीची संधी असते आणि या संधीचे सोने करणारेच गुंतवणुकीत यशस्वी होतात. तेव्हा आज मंदी कुठे आहे ते बघा आणि योग्य तो निर्णय घ्या. मंदीला घाबरणारे कायम चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे केवळ लोभापोटी चुकीची गुंतवणूक करू नका. जगात कुठेही दोन वर्षांत दुप्पट होणारी योजना नाही. गुंतवणुकीचे लक्ष्य निश्चित करा, दीर्घकालीन गुंतवणूक करा, सर्व गुंतवणूक प्रकारात पैसे गुंतवा, छोट्या अवधीच्या गुंतवणुकीसाठी बँका, डेट फंडांना प्राधान्य द्या. दीर्घकालीन गुंतवणूक रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड निवडा. किमान 25-50 लाखाचा टर्म इन्शुरन्स घ्या आणि आपल्या गुंतवणूक सल्लागाराकडूनच गुंतवणूक करा आणि मग बघा कोणाची बिशाद आहे तुमची फसवणूक करण्याची.
(वाचकांनी कोणतीही गुंतवणूक करताना स्वत:च्या जबाबदारीवर करावी. कोणत्याही परिणामाला दै. दिव्य मराठी वा मधुरिमा जबाबदार नाही हे कृपया लक्षात ठेवावे.) - संपादक
sunilchitale16@yahoo.com