आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणुकीला शिस्त लावणारे SIP

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला दीर्घ अवधीसाठी SIP च्या माध्यमातून खात्रीपूर्वक उत्तम परतावा मिळेल, कारण SIP मार्केटच्या चढ-उताराला उत्तम प्रकारे तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करते.
म्युच्युअल फंड म्हणजे काय इथपासून सुरुवात करून म्युच्युअल फंडाचे विविध प्रकार, त्यामध्ये असणारे विविध फायदे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गुंतवणुकीमध्ये असणारी जोखीम याविषयी आपण सविस्तर माहिती घेतली. १००% शेअर्स संबंधीच्या योजनांमध्ये भरपूर जोखीम आहे- असतेच हे आपण पाहिले; परंतु जोखीम म्हणजे पैसा बुडतो का? तर कधीच नाही! शेअर बाजाराच्या चढउताराप्रमाणे तो सुरुवातीची काही वर्षे कमी-जास्त होत राहील, परंतु दीर्घ अवधीच्या गुंतवणुकीकरिता काही धोका आहे का? अजिबात नाही आणि ही जी काही जोखीम आहे ती फक्त कमीच नव्हे तर समूळ नष्ट करण्याचा सर्वात सोपा आणि निर्धोक मार्ग म्हणजे म्युच्युअल फंडची SIP. SIP म्हणजे Systematic Investment Plan म्हणजे काय? SIP म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर याला म्युच्युअल फंडाची RD असे म्हणता येईल.
दरमहा एका विशिष्ट रक्कम दीर्घ काळासाठी म्युच्युअल फंडच्या योजनेत गुंतवली तर ज्या उद्दिष्टांची माहिती आपण आतापर्यंत घेतली ती सर्वच उद्दिष्टे अगदी सहजपणे साध्य होऊ शकतात. SIP सुरू करणे अगदी सोपे आहे. सर्वप्रथम आपला एक फोटो, PAN ची झेरॉक्स आणि आधारकार्डाची झेरॉक्स देऊन आपली KYC तयार करून घ्या. KYCसाठी माझ्यासारख्या गुंतवणूक सल्लागाराला आपल्याला भेटावे लागेल. एकदा KYC झाली की म्युच्युअल फंडाच्या पुढच्या कोणत्याही गुंतवणुकीसाठी पुन्हा-पुन्हा कागदपत्रं द्यावी लागणार नाहीत. आता SIP सुरू करण्यासाठी सर्वसाधारणपणे कमीतकमी गुंतवणूक ही दरमहा १००० रु. करावी लागते. काही फंडांमध्ये किंवा करबचतीच्या योजनांमध्ये ५०० रु. दरमहासुद्धा गुंतवणूक करता येते. जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. कोणाला जर एक लाख रु. ची SIP करावयाची असेल तर करता येते.

SIP चे फायदे: खूप जुनी एक म्हण प्रसिद्ध आहे, थेंबे थेंबे तळे साचे. छोट्याछोट्या रकमेच्या बचतीमधून दीर्घकालीन उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीची तरतूद SIPच्या माध्यमातून सहजपणे करता येते. आणि छोट्याशा रकमेचा SIPचा वटवृक्ष झालेला तुम्हाला दिसेल. कसे ते आपण पुढे उदाहरणात बघणारच आहोत.

HDFC म्युच्युअल फंडचा इक्विटी फंड हा सर्वात जुना फंड आहे. १ जाने १९९५ रोजी या योजनेची सुरुवात झाली आहे म्हणजेच आता २० वर्षे होतील. या योजनेत जर कोणी ५,००० रु. महिन्याची SIP केली असेल वेगवेगळ्या कालावधीत काय परतावा मिळेल हे पाहू.

तुम्ही सर्वच जाणता की आता मार्केट एकदम चांगल्या परिस्थितीत आहे फक्त त्याचे उदाहरण मी देऊ शकलो असतो, परंतु मला तुमच्या मनातील भीती समूळ नष्ट करावयाची आहे म्हणून मी मुद्दाम मार्केटची वाईट परिस्थिती होती तेव्हाचे म्हणजे जुलै २०१३चे पण उदाहरण दिले आहे. जुलै १३मध्ये १२ ते ३६ महिने रिटर्न्सच नव्हते, उलट उणे रिटर्न्स होती. अशा वेळी तुम्ही काय करता? SIP बंद करून टाकता; परंतु मंडळी, असे करू नका. पुढे पाहा कसे छान रिटर्न्स मिळालेले आहेत. उलट असा वाईट परतावा दिसत असताना घाबरू तर नकाच, या परिस्थितीचा फायदा घ्या. जास्तीची गुंतवणूक अशा वेळी करा मग बघा तुमचे रिटर्न्स कसे अधिक आकर्षक होतात. SIP ला तुम्हाला मार्केटकडे बघण्याची सुध्दा आवश्यकता नाही म्हणजेच मार्केटला तुम्हाला time करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला दीर्घ अवधीसाठी SIP च्या माध्यमातून खात्रीपूर्वक उत्तम परतावा मिळेल, कारण SIP मार्केटच्या चढ-उताराला उत्तमप्रकारे तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करते. मार्केट जेव्हा खाली येते तेव्हा तुमच्या जवळ जास्त युनिटस जमा होत असतात. ज्याचा भविष्यात तुम्हाला प्रचंड फायदा होतो.
नियमित गुंतवणुकीमुळे आपल्याला शिस्त लागते. आणि आपण उद्दिष्टांविषयी अधिक जागरूक होतो.

लवकर सुरुवात हा गुंतवणुकीतील सर्वात मोठा महामंत्र आहे आणि हा महामंत्र जे अंमलात आणतील त्यांची सर्वच उद्दिष्टे सहजपणे साध्य होणार आहेत. गुंतवणूक सुरू करण्याचा आदर्श काळ कोणता? नोकरी-धंदाला लागल्यापासून, पहिल्या महिन्यापासून, SIP सुरू करणाऱ्या व्यक्तीला फार थोड्या रकमेच्या SIPमुळेसुद्धा जग जिंकता येईल आणि तेच तुम्ही १० वर्षे नोकरी झाल्यानंतर खडबडून जागे झालात तरी तुम्ही तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकाल. परंतु त्यासाठी तुम्हाला खूप जास्त गुंतवणूक करावी लागणार आहे. लवकर सुरुवात केल्याने काय होते? चक्रवाढ व्याज, जगातले आठवे आश्चर्य तुमचे कार्य खूप सोपे करून जाणार आहे. कसे ते आपण पुढील लेखात बघू या.
(sunilchitale16@yahoo.com)