आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपलेल्या पैशाला जागे करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यात आपण म्युच्युअल फंडाची थोडक्यात ओळख करून घेतली होती. आज आपण म्युच्युअल फंडाची पहिली पायरी चढूया. म्युच्युअल फंडाचा लिक्विड फंड. नावाप्रमाणेच लिक्विड - म्हणजेच पैसे केव्हाही काढून घेण्याची सोय यामध्ये आहे. होय केव्हाही, म्हणजे गुंतवणुकीच्या नंतर अगदी चार दिवसांनीसुद्धा. बचत खात्यामध्ये अनेक गुंतवणूकदारांचे लाखो रुपये महिनोन्महिने पडून असतात. कधी कधी तर वर्षाच्या वरसुद्धा. याला आम्ही झोपलेला पैसा असे संबोधतो.
गुंतवणुकीत नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच 8-15 दिवसांच्या लिक्विड फंडलासुद्धा खूप जास्त महत्त्वपूर्ण स्थान आहे. समजा तुमचे एक लाख रुपये एक वर्ष बचत खात्यात पडून राहिले तर तुम्हाला 4% दराने 4000 रु. व्याज मिळेल. लिक्विड फंडमध्ये सध्याचा व्याजदर 9%च्या जवळपास सुरू आहे. म्हणजेच तुम्ही स्वत:चे 5000 रुपयांचे नुकसान करून घेतले.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे अत्यंत सोपे आहे. तुमच्या गुंतवणूक सल्लागारासोबत आपल्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांविषयी चर्चा करा आणि त्यानुसार आपला गुंतवणुकीचा प्रकार ठरवा. जसे बँक एफडी, विमा, म्युच्युअल फंड इ.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला एक केवायसी करावी लागेल. यासाठी तुमचा एक रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो, पॅन कार्डची व रहिवासी दाखल्याची झेरॉक्स - जसे रेशन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, इ. पैकी कोणतीही एक, ज्यामध्ये आपला पत्ता व्यवस्थित आला आहे, या तीन गोष्टींनी तुमचे केवायसी तयार होईल. आता तुम्ही कितीही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली तरी पुन्हा-पुन्हा कागदपत्रे द्यावी लागत नाहीत. एकदा केलेले केवायसी सर्वच म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीसाठी वैध ठरते. केवायसी झाली की तुम्ही निवडलेल्या योजनेचा एक अर्ज भरायचा आणि सोबत गुंतवणूक रकमेचा भरणा त्या योजनेच्या नावाने क्रॉस चेकने द्यावा. सर्व व्यवहार अकाउंट पेयी चेकने फंडच्या नावाने होत असल्यामुळे कुठेच फसवणूक होणार नाही. आता आपण लिक्विड फंडाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

या योजनेत गुंतवणुकीची किमान रक्कम फक्त पाच हजार रु. आहे. जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. या योजनेला तुम्ही बचत खात्याप्रमाणेच बघू शकता. कितीही वेळा पैसा भरा, कितीही वेळा काढा - काही मर्यादा नाहीत. पैसे गुंतवल्यावर 2-4 दिवसांनीसुद्धा तुम्ही संपूर्ण रक्कम काढून घेऊ शकता. उदाहरणच द्यायचे झाले तर अगदी शुक्रवारी गुंतवणूक करा व सोमवारी काढून घ्या. अनेक मोठे गुंतवणूकदार नियमितपणे असे करत असतात. बचत खात्यात तुम्हाला 4% व्याजदर मिळतो आणि व्यापारी बंधूच्या चालू खात्यावर तर व्याजच मिळत नाही. आणि म्हणूनच या योजनेत लहान-मोठे सर्वच गुंतवणूकदार सहभागी होऊन याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत व्याजाचा दर निश्चित नसला तरी साधारणपणे असे म्हणता येईल की कमीत कमी 6% ते 9% या दरम्यान या योजनेत परतावा मिळतो. सध्या 9%च्या जवळपास परतावा या योजनेत मिळत आहे. डिव्हिडंड किंवा ग्रोथचा पर्याय या योजनेत उपलब्ध आहे. 30% आयकर दात्यांनी डिव्हिडंड इन्व्हेस्टमेंटचा पर्याय निवडावा व इतरांनी ग्रोथ. म्युच्युअल फंडच्या कोणत्याच योजनेत टीडीएस नाही. त्यामुळे बँकेसारखी 15 जी/ 15 एचचा फॉर्म देण्याचीही कटकट नाही.कोणत्याही प्रकारचा एंट्री वा एक्झिट लोड या योजनेत नाही.

लिक्विड फंडातील गुंतवणुकीला कोणतीही जोखीम नाही. कारण या योजनेतील गुंतवणूक ही मनी मार्केट किंवा अल्पमुदतीच्या कर्जरोख्यात केली जाते. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार याच्या व्याजदरात बदल होत असतो व 6% ते 9% या दरम्यान व्याज मिळते. सध्या व्याजदर वाढलेला असल्यामुळे साधारणपणे 9%चे व्याज मिळत आहे.

म्युच्युअल फंडातून पैसे काढणे सर्वात सोपे काम आहे. तुम्ही ज्या गुंतवणूक सल्लागाराकडून गुंतवणूक केलेली आहे, त्याच्याकडे जाऊन एक अर्जावर फक्त सही केली की झाले. कोणतेही ओरिजिनल सर्टिफिकेट नको की काही नको. तुम्ही आज पैसे काढण्याची स्लिप भरली की दुस-या दिवशी दुपारी 12च्या आत रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यात जमा केली जाते. बघा, आहे की नाही अगदी सोपे? तर मंडळी आजच आपल्या गुंतवणूक सल्लागाराकडे जा आणि आपल्या बचत किंवा चालू खात्यातील जास्तीची रक्कम लिक्विड फंडात गुंतवा.
Sunilchitale16@yahoo.com