आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Chitale Article About Mutual Fund, Divya Marathi

म्युच्युअल फंडचा फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही लेखमाला सुरू झाल्यापासून आतापर्यंत आपण गुंतवणुकीची मुख्य उद्दिष्टे व त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी असणार्‍या विविध योजना यांची माहिती घेतली. यामध्ये प्रामुख्याने मुदत ठेवी, पीपीएफ, विमा इ. विषयी आपण विस्तृतपणे माहिती घेतली. आता गुंतवणुकीची जी उद्दिष्टे असतात त्याचे आपण दोन विभाग करू या.

कमी अवधीची उद्दिष्टे व दीर्घकालीन उद्दिष्टे
कमी अवधीच्या गुंतवणूक उद्दिष्टांसाठी मुदत ठेवी, बाँड फंड्स आदींचा विचार करावा आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी फक्त म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडांचे नुसते नाव जरी घेतले तर काही वाचकांच्या अंगावर शहारे आले असतील, त्याचे कारण असे, की आजपर्यंत फार कमी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाला व्यवस्थित समजून-उमजून गुंतवणूक केलेली आहे. तुम्ही आजपर्यंत नीट समजून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली नसल्यामुळे तुमच्या मनात म्युच्युअल फंडाबद्दल संभ्रम किंवा अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. परंतु मला पूर्णपणे खात्री आहे, की माझी ही लेखमाला संपेल तेव्हा प्रत्येक वाचकाची म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू झाली असेल, नुसती सुरूच झाली असेल असे नाही तर तुमच्या सर्वांच्या सर्वात आवडीचा गुंतवणूक प्रकार म्हणून तुम्ही म्युच्युअल फंडला मान्यता द्याल. कारण म्युच्युअल फंडची संकल्पनाच जबरदस्त आहे आणि माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे, की प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आज जी म्युच्युअल फंडची भीती आहे तीच मला समूळ नष्ट करावयाची आहे.

म्युच्युअल फंड म्हणजे काय? एका विशिष्ट गुंतवणूक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विविध गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक, या गुंतवणुकीतून तुम्हाला युनिट्स मिळतात. एकूण जमा झालेल्या पैशाची त्या-त्या योजनेच्या मूळ उद्दिष्टांनुसार शेअर्स / कर्ज रोखे / मनी मार्केट अशा विविध प्रकारात गुंतवणूक केली जाते. तुमच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात तुम्हाला त्याचा लाभ मिळतो.

म्युच्युअल फंडाच्या विविध योजना आहेत त्या आपण पुढे व्यवस्थितपणे समजून घेणारच आहोत. परंतु हे सर्व समजून घेण्यासाठी सर्वात आवश्यक जर काही असेल तर तुमच्या मनातील भीती सर्वप्रथम दूर करून या गुंतवणूक प्रकाराला नीट समजून घेतले पाहिजे.

म्युच्युअल फंडात आठ दिवसांच्या गुंतवणुकीपासून 30-40-50 वर्षापर्यंतच्या विविध योजना असतात. कमी अवधीच्या ज्या योजना असतात त्यामुळे गुंतवणूक फक्त मनी मार्केट, कर्ज रोखे, सरकारी बाँड्स इ. प्रकारात केली जाते आणि जसजसे आपण गुंतवणुकीचा कालावधी वाढवू तसतसे गुंतवणुकीत शेअर्सचे प्रमाण वाढते. शेअर्सचे प्रमाण वाढले, की जोखीम वाढत जाईल परंतु ही जोखीम कमी करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्याविषयी आपण पुढे चर्चा करणारच आहोत.

पुढील लेखामध्ये म्युच्युअल फंडमधील सर्वात सुरक्षित असा लिक्विड फंडचा जो प्रकार आहे तो व्यवस्थित समजून घेऊ.