आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sunil Chitale Article About Mutual Funds, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्युच्युअल फंडाचा षटकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्युच्युअल फंडावरील लेखमाला सुरू झाल्यापासून मला येणा-या ई-मेलमध्ये अचानक वाढ झाली आहे. खरोखर आनंद झाला. तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणुकीत अधिक रस घेत आहात, हे बघून खरोखर छान वाटतंय! अनेक जणांनी अनेक प्रश्न/शंका उपस्थित केल्या आहेत. त्या सर्वांचे समाधान करण्यासाठी एक-दोन स्वतंत्र लेख पुढे मी अवश्य लिहिणार आहे, तेव्हा काळजी नसावी. असेच ई-मेल पाठवत राहा.

प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील भीती संपूर्णपणे काढून टाकून म्युच्युअल फंड
हा गुंतवणुकीच्या क्षेत्रातील तुमचा आवडीचा गुंतवणूक प्रकार होईल, याची मी खात्री देऊ इच्छितो. म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे मुख्य फायदे काय, हे आज आपण बघू या.

०व्यावसायिक व्यवस्थापन-
म्युच्युअल फंडाकडे आपण जो पैसा गुंतवितो त्याची योग्य गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांचा एक चमू प्रत्येक म्युच्युअल फंडात असतो. त्यांना या क्षेत्राचा उत्तम अभ्यास व अनुभव असावा लागतो. शिवाय या फंड मॅनेजरना सर्व कंपन्यांची अद्ययावत माहिती ठेवावी लागते. आणि यासाठी त्यांच्याजवळ सर्व साधने उपलब्ध असतात. तुमच्यासाठी ते सतत आर्थिक बाजारपेठ, जागतिक घडामोडी अशा प्रकारच्या अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवून असतात. त्यांना सतत जागरूक राहावे लागते. शिवाय कंपन्यांचा सखोल अभ्यास असावा लागतो. विविध कंपन्यांना भेटी देऊन, कंपनी व्यवस्थापनाच्या संपर्कात राहून व इतरही अनेक संस्थांकडून कंपनीविषयी खात्री करून घ्यावी लागते. इतका सगळा अभ्यास ही तज्ज्ञ मंडळी आपल्यासाठी करीत असतात. अनेक गुंतवणूकदार एक-दोन दिवसांचा कोर्स करून, टीव्ही पाहून किंवा मित्रांच्या आग्रहाने शेअर बाजारात उडी मारतात व सपशेल नापास होतात. होणारच ना, कारण या गुंतवणूक प्रकारात विशेष अभ्यास न करता उडी मारणे अत्यंत धोक्याचे आहे व आपल्यापैकी अनेकांनी याचा वाईट अनुभव घेतला असेल. तेव्हा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास व्यावसायिक व्यवस्थापनामुळे उत्तम कंपन्यांमध्येच आपली गुंतवणूक होत असते.

०जोखीम कमी-
तुम्ही स्वत: जेव्हा शेअर बाजारात जाता तेव्हा कंपन्यांची निवड करताना अनेकांकडून अनेक चुका होतात. म्युच्युअल फंडात तुम्ही 5,000 रु. जरी गुंतविले तरी तुमच्या 5,000 रुपयांची 20-25 कंपन्यांमध्ये गुंतवणूक होत असते. त्यामुळे जोखीम खूपच कमी होते. म्युच्युअल फंडात प्रत्येक योजनेचा एक 20-30 कंपन्यांचा एक पोर्टफोलिओ तयार होतो व या कंपन्यांची निवड सखोल अभ्यास करून होत असल्यामुळे आपली जोखीम खूपच कमी होते.

०तरलता (Liquidity)-
म्युच्युअल फंडच्या ज्या योजना 365 दिवस खुल्या असतात, (ओपन एंडेड) या योजनांमधील गुंतवणूक तुम्ही नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू् (NAV) च्या आधारित किमतीवर केव्हाही काढून घेऊ शकता. लिक्विड फंडातील पैसे दुस-याच दिवशी तर इक्विटी फंडातील पैसे पाच दिवसांनंतर सरळ आपल्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येतात.

०कमी खर्च-
तुम्ही जेव्हा स्वत: शेअर बाजारात गुंतवणूक करता तेव्हा ते बरेच कटकटीचे व खर्चाचे असते. Demat खाते उघडा, एखाद्या शेअर ब्रोकरकडे खाते उघडा. हे सर्व खर्चिक असते. म्युच्युअल फंडात या तुलनेत गुंतवणुकीचा खर्च तुम्हाला खूपच कमी करावा लागतो. गुंतवणूक करणेही सोपे आणि पैसे काढणे तर त्याहून सोपे. कोणतेही ओरिजिनल सर्टिफिकेट वगैरे लागत नाही. पैसे काढण्याच्या फॉर्मवर सही केली की झाले.

०आयकरात सूट-
म्युच्युअल फंडच्या विविध योजनांनंतर आयकर सूट मिळते. डेट फंड (FDसारखे फंड) यावरील आयकराबद्दल माझ्या मागील दोन लेखांत सविस्तर आलेलेच आहे. इक्विटी फंड तर त्याहूनही चांगले. इक्विटी फंडचा लाभांश (Dividend) पूर्णपणे करमुक्त असतो. त्याचप्रमाणे इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक केल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर कोणत्याही प्रकारचा आयकर किंवा भांडवली नफा द्यावा लागत नाही. कोणताच करही द्यावा लागत नाही आणि त्यामुळे 15 G/Hव 16अ पासून होणारी कटकट टाळता येते. शिवाय 80 C च्या अंतर्गत गुंतवणूक केल्यास एक लाखापर्यंत आयकर सवलतसुद्धा मिळू शकते.

०सेबीचे नियंत्रण-
सर्व म्युच्युअल फंडांना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या सरकारी संस्थेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडच्या सर्वच योजनांवर सेबीचे नियंत्रण असल्याने गुंतवणूक सुरक्षित असते.

इतके सर्व फायदे म्युच्युअल फंडात असताना मंडळी, म्युच्युअल फंडापासून दूर का जाता? इक्विटी फंडामध्ये जी जोखीम आहे, ती कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याविषयी आपण पुढील लेखात जाणून घेऊया.
sunilchitale16@yahoo.com