आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Chitale Article About Post Retirement Requirements

निवृत्तीनंतरचे नियोजन महत्त्वाचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे काय-काय फायदे आहेत हे आपण मागच्या लेखात पाहिले. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडच्या विविध योजनांची आपण माहिती घेतली, जसे की लिक्विड फंड, ऋटढ, टकढ व बॅलन्स फंड. म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी 0% शेअर्सची लिक्विड फंड योजना व ऋटढ, 25% शेअर्सची टकढ, 50-60% ची बॅलन्स फंड व 100% शेअर्सचे फंड असे विविध प्रकार आहेत. जसजसे आपण शेअर्सचे प्रमाण वाढवत जाऊ तसतशी त्या गुंतवणुकीतील जोखीम वाढत जाईल. परंतु सगळ्यात चांगला परतावा आपल्याला 100% शेअर्स संबंधित योजनांमध्येच प्राप्त होईल.

सर्वसाधारणपणे मराठी माणसाची गुंतवणुकीसाठीची पहिली पसंती बँक किंवा पोस्टच आहे. त्यातील बहुतांश लोकांची तर तीच पहिली व शेवटची पसंती आहे. याचे जे मुख्य कारण आहे ते दुर्दैवी, परंतु खरे आहे आणि ते म्हणजे मुळातच मराठी माणूस भित्रट आहे. कोणतीही जोखीम न घेण्याकडे मराठी माणसाचा कल असतो. परंतु कोणतीही जोखीम न घेणे हीच सर्वात मोठी जोखीम असते. त्यामुळे वर्षानुवर्षं बँकेत किंवा पोस्टात पैसा ठेवून तुम्ही स्वत:चे अतोनात नुकसान करीत आहात. तुमचा सर्वच्या सर्व पैसा म्युच्युअल फंडात टाका, असा सल्ला मीच नाही तर कोणीच तुम्हाला देणार नाही. त्याचप्रमाणे सर्वच्या सर्व पैसा तुम्ही कोणाचाही सल्ला न घेता बँक-पोस्टात ठेवता आणि स्वत:चे तसेच पुढील पिढ्यांचेही नुकसान करून घेत आहात. आणि हे का होते तर आपण गुंतवणुकीची मूळ मूल्ये विसरून जातो. पुन्हा गाडी मूळ पदावर म्हणजेच आपण गुंतवणूक कशासाठी करतो?

गुंतवणुकीची उद्दिष्टे कायम आपण डोळ्यांसमोर ठेवायला पाहिजेत. सर्वसाधारणपणे घर खरेदी, मुलांचे उच्च शिक्षण, मुलांचे लग्न, निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन ही गुंतवणुकीची मुख्य उद्दिष्टे आहेत. आता यामधील सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते? प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते, परंतु शेवटी माझ्या मताशी सहमत व्हालच.

महत्त्वाचे उद्दिष्ट आहे निवृत्तीनंतरचे नियोजन!
समजा तुमच्याजवळ पुरेसा पैसा नाही, पण घर बांधायचे आहे, तर गृहकर्जाची सोय आकर्षक व्याजदरात व आयकराच्या सवलतीसह उपलब्ध आहे. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसा नाही, चला बँकेत, बँक तुम्हाला शैक्षणिक कर्ज देईल. मुलांच्या लग्नासाठी पैसा नाही, काही बिघडत नाही. 500 लोकांना नाही, तर 50 लोकांनाच आमंत्रण देऊन नोंदणीकृत लग्न करता येईल. परंतु निवृत्तीनंतर तुमच्याजवळ जर पैसा नसला तर फक्त कल्पना करून बघा. तुमची मुलंसुद्धा तुम्हाला विचारणार नाहीत. आजच समाजात अशी अनेक कुटुंबे आहेत, कदाचित तुमच्याही परिचयाची असतील. तर मंडळी अशी वेळ आपल्यावर जर येऊ द्यायची नसेल तर निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन आजच सुरू करा.

हे नियोजन सुरू करण्याचा आदर्श काळ कोणता? नोकरीधंद्याला लागल्याबरोबर पहिल्या पगारापासून. आज कदाचित तुम्हाला हे हास्यास्पद वाटेल, परंतु पगाराच्या पहिल्या महिन्यापासून सुरुवात केली तर फार थोड्या गुंतवणुकीत हे उद्दिष्ट सहज साध्य होणार आहे. कशामुळे? Power of Compounding मुळे! चक्रवाढ व्याजाची जी जादू आहे तिला जगातले आठवे आश्चर्य समजण्यात येते. असे समजा की सर्वसाधारणपणे 25व्या वर्षी आपण कामधंद्याला लागलो व 60 वर्षांनंतर निवृत्त होतो.

जर 35 वर्षे आपण म्युच्युअल फंडाला दिली तर तुम्ही कल्पना करू शकणार नाही असा परतावा तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे. तो कसा, किती राहील हे पुढच्या लेखात पाहूच. तर मंडळी सर्वप्रथम या म्युच्युअल फंडाला नीट समजून घ्या. 100% शेअर्सच्या योजनेत कमी अवधीचा पैसा गुंतवू नका. या योजनामधील जोखीम काय आहे ते समजून घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनात जी भीती आहे ती पूर्णपणे काढून टाका. या योजनामधील जोखीम आपण संपूर्णपणे समजून घेऊन ही जोखीम कमी करण्याचेच नव्हे तर त्याचा जास्तीत जास्त लाभ कसा करून घ्यायचा हे आपण पुढील लेखात पाहू.
sunilchitale16@yahoo.com