आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात यश हवंय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील दोन लेखांत म्युच्युअल फंडाच्या 100% शेअर्सच्या योजनांमधील जोखीम किती असते व ती का असते याविषयी आपण सविस्तर माहिती घेतली. त्याचप्रमाणे कोणतीही जोखीम न घेणे हीच सर्वात मोठी जोखीम असते, हेसुद्धा आपण पाहिले. जोखीम आपण कोणत्या गुंतवणुकीवर घेत आहोत? जोखीम आपण अशाच गुंतवणुकीवर घेतो आहोत ज्याची उद्दिष्टं 10-15 वर्षांनंतर आपल्याला गाठायची आहेत. आणि जोखीम म्हणजे काय पैसे बुडणार आहेत का? अजिबात नाही. गुंतवणूक केल्यापासून पहिली पाच वर्षे ते थोडीफार, गुंतवलेल्या रकमेपेक्षा कमी होऊ शकतात, बुडत कधीच नाहीत. आणि जोखीम का घ्यायला पाहिजे? कारण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आपले लक्ष्य आहे, की आपल्याला असा परतावा म्हणजेच Returns मिळाला पाहिजे जो महागाई आणि केलेल्या गुंतवणुकीवर मिळणार्‍या व्याजावर लागणार्‍या प्राप्तिकरापेक्षा जास्त असावा. त्याकरिता जोखीम ही घ्यायलाच पाहिजे.
परंतु तुम्ही म्युच्युअल फंडाची जोखीम, जी तात्पुरती असते ती सोडून किती मोठी जोखीम घेता आहात? माझी ही लेखमाला सुरू झाल्यापासून मंडळी, मी अनेक वेळा तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे, की चुकीची गुंतवणूक करू नका. श्रीसूर्यानंतर आता केबीसीमध्ये तुम्ही लोकांनी प्रचंड पैसा गमावला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेत तुमचा पैसा असेल तर तो ताबडतोब काढून घ्या. अशा योजनांमध्ये सुरुवातीला काही महिने किंवा काही वर्षे पैसा मिळाला तरी याचा शेवट हा निश्चितपणे संपूर्ण पैसा बुडण्यामध्येच होतो. त्यामुळे अशा योजनांच्या मागे धावू नका, याचा शेवट श्रीसूर्या किंवा केबीसीसारखाच होणार, हे निश्चित आहे.
वाढती महागाई व FDच्या व्याजावर लागणार्‍या प्राप्तिकरामुळे तुम्ही त्रस्त आहात याची मला पूर्णपणे कल्पना आहे आणि म्हणूनच फक्त बँक आणि पोस्टात पैसा ठेवून गुंतवणुकीच्या निश्चित ध्येयाकडे आपण पोहोचू शकत नाही.

बँकेत आज 9 ते 10% व्याज मिळते आणि पोस्टात तर त्याहीपेक्षा कमी. आज आपण प्रचंड महागाई अनुभवतो आहोत. सरकारी आकडा काहीही सांगो, महागाईचा दरसुद्धा जवळपास 9-10% आहे आणि तुम्ही जर प्राप्तिकरदाते असाल तर विचार करा, खरोखर तुम्हाला काही मिळाले का? आणि म्हणूनच 20 आणि 30% प्राप्तिकरदात्यांनी चुकूनसुद्धा बँक FD करू नये. वाढती महागाई आणि व्याजावर लागणारा कर यापेक्षा जास्त परतावा (Returns) कुठे मिळेल याचा शोध घेतला पाहिजे आणि असे Returns तुम्हाला दोनच गोष्टीत मिळू शकतात. एक म्हणजे रिअल इस्टेट आणि दुसरे म्हणजे म्युच्युअल फंडाच्या 100% शेअर्ससंबंधीच्या योजना. यापेक्षा इतर कोणत्याही योजनेत तुम्हाला कोणीही जास्त व्याजदराचे आश्वासन दिले तरी त्या लोभात पडू नका, निश्चितपणे त्यामध्ये धोका आहे.

अनेक मंडळी थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात आणि सपाटून मार खातात. थेट शेअर बाजारात प्रवेश करणे म्हणजे गुंतवणुकीच्या क्षेत्राची दहावी पास न करता पदव्युत्तर परीक्षा देण्यासारखे आहे. त्यामुळे 100% शेअर्सच्या म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये नियमितपणे गुंतवणूक करा. एकरकमी गुंतवणूक किमान फक्त पाच हजार रुपयांपासून सुरू करता येते किंवा दरमहा 1000 रुपयांनीसुद्धा सुरुवात करता येईल. आता या योजनेमध्ये काही जोखीम आहे का? हो, निश्चितच आहे. शेअर मार्केटमध्ये ज्या प्रकारे चढउतार होतील त्याप्रमाणे सुरुवातीची काही वर्षे यामध्ये गुंतवणूक रक्कम कमी जास्त होत राहील. परंतु कमी झाली तर मंडळी घाबरून जाऊ नका. कमी का झाले? कारण शेअर बाजार खाली आला. त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका. उलट जसे मी सांगितले, की मंदी ही फार मोठी संधी असते. त्याचा लाभ घ्या. आता या योजनेतील जोखीम कमी करण्याचा काही सोपा-सरळ मार्ग आहे का?अगदी साधा सरळ आणि सोपा मार्ग आहे. SIPचा. SIP म्हणजे Systematic Invesetment Plan. शेअर बाजारात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर दोनच गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन आणि दुसरे म्हणजे नियमित गुंतवणूक. आणि SIP हा शेअर बाजाराच्या चढउतारावर मात करणारा निर्धाेक प्लान आहे. SIP म्हणजे काय व त्याचे लाभ कसे-किती मिळतात याची माहिती आपण पुढे घेऊया.
sunilchitale16@yahoo.com