आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Chitale Article – Be Positive While Investing

सकारात्मक विचारांनी गुंतवा पैसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवृत्तीनंतर मिळणा-या पैशाच्या गुंतवणुकीविषयी माझा लेख १४ नोव्हेंबरच्या मधुरिमामध्ये आला आहे, ज्यामध्ये मी असे सुचवले होते, की निवृत्तीनंतर जी रक्कम आपल्याला प्राप्त होते त्यापैकी किमान अर्धी रक्कम म्युच्युअल फंडच्या योजनांमध्ये गुंतवा. माझ्या त्या लेखावर अनेक प्रतिक्रिया किंबहुना अनेक शंका व्यक्त करणारी पत्रं आलीत. तुमच्या सर्व शंकांचे पूर्ण समाधान करून घ्या, परंतु किमान अर्धी रक्कम तरी म्युच्युअल फंडात नक्की गुंतवा.

मी त्या लेखात दोन उदाहरणे दिली होती. एक होते १० लाखांची गुंतवणूक बँकेच्या FD मध्ये आणि दुसरे होते १० लाखांची गुंतवणूक HDFC म्युच्युअल फंडच्या इक्विटी फंडामध्ये. FD मध्ये सरासरी व्याजाचा दर १०% मिळाला असे आपण गृहीत धरले आणि या मिळालेल्या व्याजावर तुमच्या प्राप्तिकराच्या व्याप्तीनुसार १० ते ३०% कर भरावा लागला. या उलट HDFC च्या इक्विटी फंडात ज्यांनी १९९५ मध्ये १० लाख रु. गुंतवले त्यांना आज २१% पेक्षाही जास्तीचा परतावा मिळत आहे आणि तोसुद्धा संपूर्णपणे करमुक्त. या योजनेत पहिल्या तीन वर्षांत कोणत्याही प्रकारचा लाभांश मिळाला नव्हता; परंतु त्यानंतरच्या वर्षात किती तरी जास्त लाभांश मिळाला आणि आज तर १० लाखांच्या गुंतवणुकीवर ४ लाखांचा लाभांश दरवर्षी मिळतो आहे, पुढे तो वाढतच राहील व त्याशिवाय १० लाख रुपयांचे आजचे मूल्यही भरपूर वाढलेले आहे. आजही योजना गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. आता लाभांशासाठी थांबण्याचीसुद्धा आवश्यकता नाही.
दरवर्षी हमखास लाभांश मिळणार आहे. सुरुवातीला जो लाभांश अनिश्चित असतो त्याला पण पर्याय आहे SWAPचा. Systematic withdrawalचा. जसे SIP मध्ये आपण दरमहा एक विशिष्ट रक्कम गुंतवून एक मोठी रक्कम उभी करतो, त्याच्या उलट SWAPमध्ये एकरकमी मोठी गुंतवणूक करून दरमहा किंवा दर तिमाही तुमच्या गरजेनुसार नियमितपणे पैसा तुमच्या बचत खात्यात जमा करण्याची उत्तम सोय आहे. या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठीच मी नेहमी आग्रह करीत असतो की, प्रत्येकाने आपला गुंतवणूक सल्लागार निश्चित करावा व १०,००० रुपयांची गुंतवणूक असो किंवा १० लाखांची, त्याच्या सल्ल्यानेच करावी. कारण दरवर्षी प्राप्तिकर तसेच विविध योजनांमध्ये बदल होत असतात. त्याची योग्य माहिती तुम्हाला त्याच्याजवळच मिळू शकेल. आता १० लाख रुपये मी म्युच्युअल फंडात गुंतवण्यास सांगितले तर लोकांना अनेक शंका आहेत. सुरुवातीला काही वर्षे या योजनेत जोखीम निश्चितच आहे. म्हणून आपण १०-१५ वर्षांची गुंतवणूक यात करणार आहोत.
काही अडचणी आल्या तर १० लाख रु. बँकेत आहेतच, अचानक येणा-या खर्चासाठी. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या मिळणा-या पैशातून अर्धी रक्कम सहजपणे म्युच्युअल फंडात गुंतवू शकतो. पुढे इतका चांगला परतावा मिळणार असेल तर एवढी जोखीम तर घ्यायलाच पाहिजे. आता ही जोखीम घेण्याचीसुद्धा ज्या मंडळीची तयारी नाही त्यांच्यासाठी आणखी एक प्रकार आहे. STP चा Systematic Transfer Plan यामध्ये तुमची जी एकरकमी गुंतवणूक आहे ती लिक्विड फंडामध्ये करून त्या लिक्विड फंडामधून दर आठवड्याला एक विशिष्ट रक्कम जी आपण निवडू ती शेअर्ससंबंधी योजनेमध्ये स्थानांतरित होत जाईल. म्हणजे लिक्विड फंडामधील आपली गुंतवणूक एकदम सुरक्षित राहील आणि शेअर्स मार्केटमध्ये जे चढउतार होतात त्यांची काळजी ही स्थानांतरित होणारी रक्कम घेत जाईल. साधारणपणे दोन वर्षांमध्ये हळूहळू लिक्विड फंडामधील गुंतवणूक शेअर्ससंबंधी योजनेमध्ये स्थानांतरित होईल. या प्रकारामुळे जोखीम कमी होईल. याशिवाय या दोन वर्षांत मार्केटमध्ये ज्या संधी उपलब्ध होतील त्या वेळी काही रक्कम लिक्विडमधून या योजनेत वळती करता येईल. तुम्हाला या योजनांमध्ये जिंकण्यासाठी तीनच गोष्टी करावयाच्या आहे. त्या म्हणजे दीर्घकाळाची म्हणजे १०-१५ वर्षांची गुंतवणूक, नियमित गुंतवणूक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे म्युच्युअल फंड आणि तुमच्या सल्लागारावर प्रचंड विश्वास.

२-३ दिवसांपूर्वी ८० वर्षांच्या एका काकांची भेट झाली. ते म्हणाले, अरे, १०-१५ वर्षांच्या योजना आमच्यासाठी काय कामाच्या? काकांना म्हणालो, काका, तुम्हाला आठवत असेल तर ६०व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतरसुद्धा तुम्ही हेच म्हणाला होतात, की आता २० वर्षांचे आयुष्य कुठे आहे माझ्याजवळ! आज ८०व्या वर्षीही तुम्ही चांगले ठणठणीत आहात, मग काय हरकत आहे या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावयाला? ब-याच वेळा या नकारात्मक विचारांमुळे आपण चांगल्या गोष्टी नाकारत असतो. आता या काकांनी ६०व्या वर्षी माझे ऐकले असते तर? त्यांना म्हणालो, आता ८०व्या वर्षी तरी ऐका. कदाचित अजून २० वर्षे तुमची शिल्लक असतील! सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल.

आता पुन्हा तुमच्या मनात शंका. SIP चांगली, STP चांगली, की एकरकमी गुंतवणूक चांगली? नक्की कोणत्या मार्गाने जायचे? माझं ऐकणार असाल तर तिन्ही मार्गांवर एकाच वेळी जा. म्हणजे काय? समजा तुमच्याजवळ १० लाख रु. आहेत म्युच्युअल फंडासाठी आणि तुम्ही ६० ते ८० वयोगटात आहात, तर तुम्ही ४ लाख रु. एकरकमी गुंतवणूक करा शेअर्ससंबंधी योजनेमध्ये, ६ लाख रु. त्याच फंडाच्या लिक्विड फंडामध्ये व त्यामधून STP आणि पेन्शनमधून शिल्लक राहणा-या रकमेची SIP. जर तुम्ही या आधीच्या वयोगटातील असाल तर ६ लाख रु. एकरकमी, ४ लाख रु. लिक्विड व तिथून STP आणि जास्तीत जास्त रकमेची SIP. बघा १०-१५ वर्षांत काय हमखास परतावा तुम्हाला मिळतो.