आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग्यावेताळ! (अध्यक्षीय धुमाळी)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत सुरू असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या पक्षांतर्गत लढतीत रिपब्लिकन पक्षातर्फे संभाव्य उमेदवार म्हणून उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वाधिक मतटक्का मिळाला आहे. ट्रम्प यांच्या राजकारणाची आणि त्यांना साथ देणाऱ्या मतदारांची जातकुळी आपल्याकडच्या आगलावू विधाने करणाऱ्या साक्षी महाराज-गिरीराज सिंग मंडळींशी आणि त्यांना डोक्यावर घेणाऱ्या मुस्लिमद्वेष्ट्या राष्ट्रभक्तांशी मिळतीजुळती आहे... अमेरिकास्थित समाजविश्लेषक आणि ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे अध्यक्ष सुनील देशमुख यांनी केलेलेे हे विश्लेषण...
अमेरिकेत ‘राइट विंग’ दोन प्रकारचे आहेत. एक, ज्याला इकॉनॉमिकल राइट विंग म्हणतात, ज्यांना फ्री मार्केट हवे असते, सरकारचा हस्तक्षेप नको असतो. दुसरे राइट विंगर हे धार्मिक कट्टरवादी आहेत. ते मूलतत्त्ववादी आहेत. त्यांना प्रभू येशूचे राज्य हवे आहे. ते गर्भपाताच्या विरोधात आहेत. त्यांचा समलिंगी संबंधांना कट्टर विरोध आहे. स्त्रियांविषयी त्यांची भूमिका सनातनी स्वरूपाची आहे. त्यांना बंदूक बाळगण्याचा हक्क हवा आहे. सेकंड अमेंडमेंट त्यांना हवी आहे. या पक्षावर सनातनी, कर्मठ अशा इव्हँजेलिकल ख्रिश्चन चर्चचे नियंत्रण आहे. एकूणात, हा पक्ष ‘अमेरिकन स्पिरिट’च्या विरोधात आहे.
‘अमेरिकन स्पिरिट’ हे व्यक्तिस्वातंत्र्यवादी, उदारमतवादी, लोकशाहीवादी आहे. त्यांचा गर्भपात, समलिंगी संबंधांना पाठिंबा आहे. अमेरिकेत १२० देशांतून लोक राहायला आले आहेत, त्यांच्या मतांचा, श्रद्धांचा, परंपरांचा मान ठेवायला हवा. ही विविधता हा या देशाचा आत्मा आहे, असे ‘अमेरिकन स्पिरिट’ सांगते. रिपब्लिकनांची विचारधारा ही प्रामुख्याने मध्य अमेरिकेतल्या शेतीप्रधान व शिक्षणाचे प्रमाण कमी असलेल्या टेक्सास, अलाबामा, मिसिसिपी अशा ग्रामीण राज्यांमध्ये अधिक पाहायला मिळते. या पक्षाचा मतदार हा कमी शिकलेला, सोनेरी केसांचा, निळ्या डोळ्यांचा गौरवर्णीय, कमी पैशावर राबणारा, मेहनतीची कामे करणारा ‘ब्लू कॉलर वर्कर’ असा आहे. रिपब्लिकनांचा मतदार वाढण्याची कारणेही महत्त्वाची आहेत. एक म्हणजे, गेल्या ३० वर्षांत मध्य अमेरिकेत मानवी कौशल्याची जागा स्वयंचलित यंत्रांनी घेतली आहे. तंत्रज्ञान व नवनव्या शोधामुळे तर येथे मोठे सामाजिक-आर्थिक स्थित्यंतर झाले आहे. त्यात मेक्सिकन वगळता चीन, भारत किंवा अन्य देशांतून येणारे स्थलांतरित उच्चशिक्षित असून त्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात झाल्याने स्थानिकांचे रोजगार त्यांनी मिळवले आहेत. शिवाय या स्थलांतरित समाजाचे आर्थिक उत्पन्न भूमिपुत्रांपेक्षा अधिक असल्याने स्थलांतरितांची हलकी कामे आपल्याला करावी लागत आहेत, याचे मोठे वैषम्य स्थानिकांना वाटत आहे. हा राग म्हणा किंवा असंतोष म्हणा, मध्य अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आहे. एकीकडे उच्च शिक्षण नसल्याने उत्तम पगाराच्या नोकऱ्या नाहीत; तर दुसरीकडे मेक्सिकन, चिनी, रशियन लोकांनी रोजगार खेचून घेतल्यामुळे हा मतदार सैरभैर झाला आहे. माझी भूमी कोणीतरी पळवतेय व मी उपरा होत असून माझा आर्थिक दर्जा खालावला असल्याची भावना या वर्गामध्ये दिसून येते. रिपब्लिकन पक्षाचा मतदार रम्य आठवणीत बुडून जाणारा आहे. तो अमेरिका जगात पहिल्या क्रमांकाचा देश आहे, या मुद्द्याला (वस्तुस्थिती तशी नाहीये) व ‘काऊबॉय स्पिरिट’ला अजून कवटाळून बसला आहे. गेली अनेक दशके रिपब्लिकन पक्षाने आपल्या विचारधारेतून ‘काऊबॉय स्पिरिट’ अल्पशिक्षित, आर्थिकदृष्ट्या खालच्या दर्जाच्या वर्गामध्ये भिनवलेले आहे. प्रत्येक गोष्टीत ‘नंबर वन’ असणे, जगाचा पोलिस होणे किंवा जगभर दादागिरी करणे, दंडेलशाही करणे ही काही अभिमानाची गोष्ट नाही, हे मतदाराला समजत नाही.
आता हा देश जसा सुशिक्षित होतोय, तसा तो पुरोगामी होत चालल्याने ख्रिश्चन कट्टरतावादी अस्वस्थ झाले आहेत.

सध्या जगभरात चर्चेत असलेले डोनाल्ड ट्रम्प हे केवळ मोठे उद्योजक नाहीत तर ते मोठे ‘शो मन’ही आहेत. ते रिपब्लिकन पक्षाचे नव्हे तर स्वत:चे (ट्रम्प पार्टी) असे खुशालचेंडू प्रवृत्तीचे राजकारण खेळत आहेत. त्यामुळे त्यांना बड्या भांडवलदारांचा किंवा कॉर्पोरेट उद्योगजगताचा अजिबात पाठिंबा नाही. कमी शिकलेल्या किंवा रेम्या डोक्याच्या गर्दीला जे आवडते, तसे ते काहीही बरळत असतात. अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिका-मेक्सिको सीमेवर मोठे तारेचे कुंपण घालून मेक्सिकन लोकांचे स्थलांतर रोखू, इथपासून आखातातल्या सर्व तेलावर कर लावून तो कर अमेरिकेच्या तिजोरीत वळवू किंवा चीनमधल्या सर्व वस्तूंवर कर लावून चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी करू, बाहेरील देशाच्या मुस्लिमांना कायमची अमेरिका बंदी करू, अशी अनेक वादग्रस्त विधाने त्यांनी केली आहेत. स्त्रियांबद्दल तर त्यांची वक्तव्ये हीन दर्जाची आहेत. त्यांची अशी अभिरुचीहीन, खुमखुमीयुक्त, मस्तीखोर, गर्जनायुक्त विधाने ‘काऊबॉय स्पिरिट’ मानणाऱ्या मतदाराला आवडतात. त्यामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता रिपब्लिकन पक्षातील एका मोठ्या वर्गाला, गटाला आपलीशी वाटत असली तरी ही लोकप्रियता पुढे ते रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्ष उमेदवार म्हणून निवडून आले तर राहील की नाही, याबाबत शंका वाटते. कारण अमेरिकेत निवडणुकांमध्ये रिपब्लिकन व डेमोक्रेट्स एवढेच दोन पक्ष लढत नाहीत, तर इतर राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारही मोठ्या प्रमाणात भाग घेत असतात. या अपक्ष उमेदवारांचा व त्यांच्या मतदारांचा ट्रम्प यांना पाठिंबा मिळेल, याची शक्यता नाही. अमेरिकेत गेल्या ४० वर्षांत चीन, भारत, दक्षिण अमेरिकेतून जे काही स्थलांतरित आले आहेत, ते पहिल्यापासून डेमोक्रेटिक पक्षाच्या बाजूचे मतदार आहेत. त्यांचा फटका ट्रम्प यांना बसू शकतो. गेल्या निवडणुकीत तेथे नागरिकत्व मिळवलेल्या भारतीयांपैकी ७२ टक्के मतदारांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या बाजूने मतदान केले होते आणि सध्याची परिस्थिती पाहता अमेरिकेत जन्म घेतलेले जवळपास ९० टक्के भारतीय वंशाचे तरुण डेमोक्रेटिक पक्षाला मतदान करतील. ट्रम्पच्या विरोधात रिपब्लिकन पक्षातील काही गटही आहेत, ज्यांना असे रेम्या डोक्याचे राजकारण पटत नाही. त्यांच्या मुस्लिमांविषयीच्या वादग्रस्त विधानाची प्रतिक्रिया युरोपमध्येही उमटली. काहींनी त्यांना युरोपमध्ये येऊ देऊ नका, अशा हालचाली सुरू केल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे ‘ट्रम्प’कार्ड...