आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याचा बट्टा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारण हा शब्द आपण राज्यकारण, सत्ताप्राप्तीच्या संदर्भात वापरत असलो, तरीही राजकारण हे सर्वव्यापी असतं. राजकीय परिघात चालत असलेले डावपेच, कट- कारस्थाने राजकारणापलीकडच्या क्षेत्रातही रचली जातात. कारण निवडणूक केंद्रातली असो वा एखाद्या वाचनालयाची, सत्ता ही शेवटी सत्ता असते. हा सत्तासंघर्ष त्या-त्या क्षेत्राची दिशा ठरवत किंवा बिघडवतही असतो; अधोगती, प्रगतीला कारणीभूतही ठरत असतो. याच अनुषंगाने साहित्य क्षेत्रातील दृश्य-अदृश्य राजकीय प्रवाहाचा हा वेध...

राजकारण म्हणजे काय? तर स्वार्थासाठी चालवलेला धोरणीपणा, डावपेच व काळंबेरं. ते जसं घरात आढळतं, तसं घराबाहेर. त्याची सगळी उदाहरणं बट्टा लावल्यासारखी दिसणार, हे उघड आहे. आपण गेल्या वीस वर्षांतलं मराठी साहित्य नमुन्यादाखल पाहू या.

१. वर्तमानपत्रांचे राजकीय मथळे : वर्तमानपत्रांमधला मजकूर हेसुद्धा एक प्रकारचं साहित्यच असतं, असं मानलं तर एक प्रश्न हमखास पडतो, त्यांचे मुख्य मथळे नेहमी राजकीयच का असतात? आणि बहुतांश अंक राजकारणानेच भरलेला का असतो? कारण उघड आहे. त्याचे चालक हे ‘आदत से मजबूर’ असतात. त्यांना तशी सवय पडलेली असते, आणि ती मोडणं त्यांच्या आवाक्यातलं नसतं. अन्यथा, शेकडो क्षेत्रांत असंख्य घडामोडी रोज घडत असतात; त्यांची उपेक्षा करण्याचं कारण काय? शिवाय, दैनिकांचे हात राजकारण्यांच्या दावणीला बांधलेले असतात; त्यांना दहा टक्क्यांची घरं मिळतात; वगैरे गोष्टी आहेतच.

२. इंग्रजीचं जग, मराठीची गल्ली : अरुण कोलटकर यांचा इंग्रजी ‘जेजुरी’ कवितासंग्रह काही वर्षांपूर्वी गाजला आणि त्याला जगमान्यता मिळाली. त्या संग्रहाचा कोलटकरांनी केलेला मराठी अनुवाद अलीकडे प्रसिद्ध झाला. तो मूळ इंग्रजी आवृत्तीपेक्षा अनेक पटींनी सरस आहे; पण तो कोणालाही ठाऊक नाही! आता या दुर्दैवाला काय म्हणावं? आपण मराठी माणसं सर्वार्थाने जीवनविन्मुख आहोत; त्याचंच हे फळ आहे.

३. आपण एकांडे शिलेदार! : प्रसारमाध्यमांमधले एक मोठे संपादक अलीकडे मला म्हणाले, मोदी सरकारविरुद्ध कोणी काहीच बोलत नाही; मी एकटाच बोलतोय! मी मनात म्हणालो, आपण एकांडे शिलेदार आहोत. आपण एकट्याने बोलतो, करतो, संपतो! सर्वांनी मिळून एखादं चांगलं काम एकत्रितपणे पुढे न्यावं, असं आपल्याला कोणी शिकवलेलंच नाही; त्याला कोण काय करणार? मग सार्वजनिक जीवनात आपण कमी पडतो; माघार घेतो; आणि हार पत्करतो. अगदी देवाधर्माच्या ठिकाणीही जपजाप्य करून मानसिक शांती मिळवायची, पुण्य पदरात पाडून घ्यायचं आणि मुक्ती मिळवायची, ती एकेकट्यानेच. जणू सर्वांच्या हिताचा विचार अंगी बाणवून सामूहिक कृती केली तर आपलं आयुष्य वाया जाईल. उलट तसं न वागल्यानेच आपली हानी होतेय, हे आपल्या प्रकाशकांना, लेखक-कवींना, चित्रकारांना, वाचकांनाही जेव्हा उमगेल तो मराठी साहित्यासाठी सुदिन ठरेल!

४. कुणी कविता घेता का कविता? : दया पवार, बाबुराव बागुल आणि मेधा पाटकर या तिघा बहुजनांच्या कवींचे संग्रह आपण प्रसिद्ध करायलाच हवेत; ते मोठा लौकिक, पैसा आणि रसिकवर्ग मिळवून देतील, असं म्हणणं मी आजवर कित्येक लहान-मोठ्या प्रकाशकांकडे तळमळीने मांडलं... पण कोणीच माझ्याकडे ढुंकून पाहिलं नाही. का? ते कवी उपेक्षितांचे प्रतिनिधी आहेत म्हणून? मला कळत नाही...

५. स्वत:लाच पुरस्कार! : सरकार-दरबारी मोठं वजन असलेला एक ज्येष्ठ साहित्यिक एका वर्षी सरकारी पुरस्कार समितीचा अध्यक्ष होता. त्याने नीट खेळी खेळली आणि त्या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार स्वत:च्या पदरात पाडून घेतला! याला राजकारण म्हणायचं नाही तर आणखी काय? यावर तुम्ही मला विचाराल, त्या साहित्यिकाचं नाव काय? तर मी तुम्हाला उलट उत्तर देईन. तुम्हीच शोधून काढा, राव!

६. लेखकावर प्रकाशकाची कुरघोडी : पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाचे संचालक अरुण जाखडे हे खास पुस्तकं प्रकाशित करतात. त्यांनी गणेश देवी यांनी केलेल्या मराठी भाषेच्या सर्वेक्षणाचा अवजड ग्रंथ संपादित केला आणि प्रकाशितही केला. याबद्दल त्यांची वाहवा करावी तेवढी थोडीच होईल.

पण या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर गणेश देवींच्या डोक्यावर स्वत:चं नाव आपल्या अधिकारात ठसठशीतपणे छापून, प्रकाशक हा कधीही लेखकावर कुरघोडी करू शकतो, हेच त्यांनी सिद्ध केलं आहे. खरं म्हणजे, या ग्रंथाचं मुख्य श्रेय गणेश देवी यांचं नाही का? मग जाखडे यांनी असं का बरं करावं?

आता यावर तुम्ही असं म्हणाल, जाखडे यांनी यंदा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली, म्हणून तुम्ही मुद्दाम त्यांच्या विरोधात कागाळ्या करताय.
पण मग तुम्ही असं स्पष्ट का नाही म्हणत, की इथे मीच राजकारण करतोय म्हणून?
यावर तुमचं उत्तर काय असेल ते मला ठाऊक आहे. तुम्ही म्हणाल, ते उद्या जाखडे एेकवणारच आहेत. आम्ही कशाला बोलू.

७. सगळे पुण्या-मुंबईला चिकटलेले! : ‘हिंदू’कार भालचंद्र नेमाडे, खास रिपोर्ताज लिहिणारे अनिल अवचट, लोकवाङ‌्मयचे विश्वासराव, कवी मंगेश पाडगावकर, संपादक गिरीश कुबेर, कोमसापचे महेश केळुसकर, दलित साहित्यिक राजा ढाले, विक्रेते अनिल कोठावळे, समीक्षक मिलिंद मालशे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अनुवादक उमा कुलकर्णी, नाटककार रत्नाकर मतकरी, बंडखोर प्रकाशक अशोक शहाणे, चित्रकार ज्योत्स्ना कदम, विक्रेते रमेश राडिवरेकर, व्यासंगी वाचक नितीन रिंढे, मुद्रक सुजित पटवर्धन, संशोधक ढेरे बापलेक... हे सगळेच अव्वल सरस्वतीपुत्र पुण्या-मुंबईला चिकटलेले कसे?

मी असं म्हटलं तर तुम्ही भडकून विचाराल, तसे राहिले तर बिघडलं कुठे? तुमच्या बापाचं त्यात काय जातं?

यावर आमचं उत्तर : काहीच नाही. पण ते सह्याद्रीचे दऱ्या-डोंगर, ते ३२७ (की कितीतरी) तालुके... तिथलं अद््भुत जीवनदर्शन आम्हाला कधी घडणार? आपल्या मराठी साहित्याची कीर्ती देशभर, जगभर कधी गाजणार?

: का? त्यासाठी आहेतच की... रत्नागिरीचे प्रवीण दशरथ बांदेकर, नागपूरचे महेश एलकुंचवार, सोलापूरचे निशिकांत ठकार, औरंगाबादचे दत्ता भगत, कोल्हापूरचे... कोण ते... अनिल मेहता...
: जाऊ द्या, जाऊ द्या. मेलेल्यांना कशाला मारताय?

: आणि तुमचं काय? तुम्ही स्वत:ही पुण्या-मुंबईला चिकटलेले आहातच की.
: अहो, मीही तुमच्यातलाच नाही का? मग तुमचे गुणविशेष माझ्यातही असणारच की, माफ करा. त्याबद्दल आता तोंड काळं करतो कुठे तरी.
: मरा एकदाचे! सुटू आम्ही.
: नाही तरी मराठी ही मरू घातलेलीच भाषा आहे. तिच्याबरोबर आपण सगळेच मरू या की. कशी आहे कल्पना? द्या टाळी! आय मिन... द्या अग्नी!

८. नवहिंदुत्ववाद : ही २०१० सालची गोष्ट आहे. ठाण्यात साहित्य संमेलन भरलं होतं. त्याच्या मुख्य दालनाला ‘महाकवी सावरकरां’चं नाव दिलेलं होतं. ते पाहून आमच्या मित्रांच्या घोळक्यात मी म्हणालो, ‘अरे! हे सावरकर महाकवी कधी झाले?’ ते ऐकून आमचा एक मित्र कुरकुरत म्हणाला, ‘त्यात काय बुवा... एखाद्याला वाटू शकतं तसं...’
यानंतर काही महिने गेले. आम्ही तीन साहित्यिक मित्र पुण्याला माझ्या साहित्यिक गुरुंकडे मुक्कामाला गेलो. त्यांनी मला बऱ्याच वर्षांपासून आस्थेने जोपासलेलं. पण दुपारी जेवणासाठी सगळे बाहेर पडलो, तेव्हा ते बोलता बोलता मला सहज म्हणाले, ‘आज आपल्यात एक वाद झडणार आहे!’
मी एकदम चमकून विचारलं, ‘कसला?’
त्यावर ते म्हणाले, ‘ठाण्याच्या संमेलना’त तुम्ही म्हणालात ना, सावरकर महाकवी कधीपासून झाले? ते आपण आज दुपारी तपासून पाहू या.’
मी म्हणालो, ‘हरकत नाही.’
मग दुपारी चहाच्या वेळी आम्ही चौघं सतरंजीवर बसलो. गुरुंनी सावरकरांचे जुने चिमुकले संग्रह कपाटातून काढले. ‘यातली एकेक कविता वाचून दाखवतो,’ म्हणाले.
ते काव्यवाचन आटोपल्यावर त्यांनी मला विचारलं, ‘कशा वाटल्या कविता?’
मी म्हणालो, ‘अहो, या रचनांमध्ये काव्य तर नाहीच आहे, पण त्यातल्या काही ओळी पद्यसुद्धा नाहीत, सरळसरळ गद्य आहेत. यांना कविता कोण म्हणणार?’
हे ऐकताच गुरुंनी माघार घेतली, ‘पण त्यांच्या काही कविता चांगल्या आहेत...’ असं ते पडल्या सुरात म्हणाले.

‘अर्थात त्या तर स‌र्व समाजाने स्वीकारलेल्याच आहेत. पण तेवढ्यावरून ते महाकवी ठरत नाहीत.’ मी पुढे जरा जोशात म्हणालो, ‘इथे कुसुमाग्रजांनाही कोणी महाकवी म्हणत नाही, तर सावरकरांना कोण म्हणणार.’
गुरुंनी माझं म्हणणं मान्य केलं.
त्यांचा हा मोकळेपणा मला आवडतो.
मग मी इतर दोन मित्रांकडे पाहिलं. त्यांचे चेहरे कोरे होते... पण माझ्याबद्दलची नापसंती, मला त्या चेहऱ्यांवर वाचता येत होती.
अचानक चमकून मी त्या तिघांकडे पुन्हा पाहिलं.
त्यांच्या कपाळांवर शेंदराचे अदृश्य टिळे मला स्पष्ट दिसत होते...

(ज्येष्ठ लेखक-संपादक)
smkarnik06@gmail.com