सुमारे २५-२६ वर्षांपूर्वी बदलीच्या निमित्ताने आम्हाला पंढरपूर वारीच्या मार्गावरील नातेपुते या गावी दोन वर्षे राहण्याचा योग आला. खेडेगावच्या वेगळ्या वातावरणात मुलंही रमली.
आम्ही त्या गावी गेल्यानंतर थोड्याच दिवसांनी आषाढी वारी निघाली आणि वाटेवरची गावं चैतन्यमय झाली. हाही अनुभव आम्हाला नवीन होता. नातेपुतेला वारीचा एक दिवस मुक्काम असतो. पण त्याआधीच १५-२० दिवस गावाला जत्रेचं स्वरूप यायला लागतं. वेगवेगळ्या वस्तूंची, खेळण्याची, दुकानं, खाण्या-पिण्याचे स्टॉल्स, फिरते पाळणे, जायंट व्हील्स वगैरे गोष्टींनी गाव गजबजून जातं. या सा-याचीच आम्हाला मजा वाटत होती.
वारी नातेपुतेत शिरताच उत्साहानं अाज भक्तिपूर्वक तिचं स्वागत झालं. तिथपासून त्यांच्या मुक्कामापर्यंतचे एक-दीड किलोमीटरचे अंतर आम्हीही वारक-यांसमवेत चालत गेलो. टाळ, गजराच्या नादात, लयबद्ध पावलं टाकत, भक्तीने भारलेल्या वातावरणात चालण्याचा तो अनुभव आम्हाला अनोखा अन् दिव्य असा भासत होता. दुस-या दिवशी सकाळी वारी पुढे निघाली तेव्हा एका छोट्याशा टेकाडावरून आम्ही तिच्याकडे पाहत होतो. शिस्तबद्धपणे चाललेला तो जनांचा प्रवाह एखाद्या वाहत्या नदीसारखा भासत होता. निर्मळ नदीकाठीही असंच मंगल वातावरण असतं. मात्र... नदीचा प्रवाह जर मर्यादा ओलांडून वाहू लागला तर आलेला महापूर ते वातावरण भयाण करून टाकतो. आजूबाजूच्या परिसराचं नुकसान, गलिच्छता अन् रोगराईचा प्रसार हे सगळं पाठोपाठ येतं.
दरवर्षी देशात कुठे ना कुठे येणा-या महापुराच्या बातम्या
आपण पाहतो, वाचतो तेव्हा नदीचं काही पाणी दुसरीकडे वळवून अनिर्बंध प्रवाहाला आवर घालण्याची आवश्यकता प्रकर्षानं जाणवते. वारीच्या प्रवाहालाही असाच आवर घालण्याची नितांत गरज अलीकडे निर्माण झाली आहे. होय ना?
वारीची वाढती गर्दी ही केवळ भक्तांचीच असते, असंही आता नाही. हौस म्हणून किंवा वेगळी ‘एन्जॉयमेंट’ म्हणून तरुणांचाही भरणा असतो. कुणी ‘आपल्या समाजाचे’ लोक निघाले, म्हणून त्यांच्याबरोबर निघतात. कुणी कौतुक म्हणून कीर्तन, प्रवचन करणारे आपल्या घरचे ‘लिटल चॅम्प्स’ नेऊन प्रसिद्धी मिळवतात. वाट्टेल ते ‘छंद’ करण्याच्या हेतूने सामील होणा-यांची संख्याही मोठी असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सांगतात. अशा वेगवेगळ्या कारणांनी पंढरपुरात दाखल होणा-या भाविकांची (?) संख्या आता दशलक्षाच्या घरात असते.
वाटेतल्या गावचे लोक पुण्यकर्म म्हणून वर्षानुवर्षे या वारक-यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था, दानधर्म करत आले आहेत. खरं, पण आता वारीच्या काळात गावात जे घाणीचं साम्राज्य पसरतं, त्याने गावक-यांना आता नाराजी, तिटकाराही वाटू लागला आहे. वारीचा मुक्काम ज्या गावात असेल, तिथले लोक आपल्या घराभोवती कोणी घाण करू नये म्हणून आळीपाळीने रात्रभर जागून पहारा करतात, ही वस्तुस्थितीही आम्ही अलीकडे प्रत्यक्ष पाहिली आहे. रेल्वेने पंढरपूर मार्गे जाताना अगदी झोपलेल्या प्रवाशांनाही पंढरपूर जवळ आल्याचे दुर्गंधीवरून समजते.
जी वारी शेकडो वर्षे भक्तीची ओढ दाखवणारी होती ती आता निव्वळ गर्दीचा महापूर झाली आहे. आपल्या अभिमानाची अन् परदेशी लोकांच्या अभ्यासाचा एक विषय असणारी वारी आता दूषित झालेली गंगा वाटते.
सरकारने केवळ पंढरपुरात नव्हे, तर संपूर्ण वाटेवर जागोजागी शौचालयांची, स्वच्छतागृहांची व पुरेशा पाण्याची सोय करणे हे तर आवश्यक आहेच; पण त्याचबरोबर लोकांनीही परिसराच्या स्वच्छतेच्या बाबतीतला बेजबाबदारपणा, बेशिस्त दूर करणे गरजेचे आहे. देवळात करायच्या दानधर्मातला काही वाटा स्वच्छतेच्या सोयींसाठी आणि सफाई कामगारांनाही स्वेच्छेने दिला पाहिजे. स्वच्छ परिसरातच देवाचं वास्तव्य असतं, असं संतांनी सांगितलं आहे. केवळ ‘मजा’ म्हणून वारीत सामील होणा-यांनी आपल्यामुळे प्रदूषणात भर पडते हे लक्षात घेऊन आनंदाच्या इतर वाटा शोधाव्यात. वारक-यांच्या व इतरेजनांच्या संघटनांनी वारीतील व वारीमुळे होणा-या प्रदूषणाबाबत जनजागरण करायला हवं.
वारीच्या महापुराला असा आवर घातला तर केवळ भक्तिभावानं जाणारी निर्मळ वारी पुन्हा सा-यांच्या अभिमानाची ठरेल.