आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शालिनीच्या घराची बेल दाबून, अर्धवट लोटलेलं दार उघडून स्मिता आत आली, तेव्हा शालिनी बाहेरच्या खोलीतच सोफ्यावर बसून कामवालीशी बोलत होती. स्मिताला पाहताच ती म्हणाली, ‘ये, ये. मी वाटच पाहत होते. अगं, ही रखमा काय म्हणतेय पाहा. हिच्या मुलीची पोटदुखी वर्षभर थांबत नाहीये. डॉक्टरांनी स्पेशालिस्टकडे जाऊन तपासण्या करायला सांगितल्या आहेत. काही तरी गंभीर असावं, तर ही बाई कुठच्या तरी गावातल्या कुण्या बाबाकडे जाणार म्हणतेय. त्यानं नुसतं बोट फिरवलं की ऑपरेशन टळतं म्हणे. कसली ही अंधश्रद्धा!’
रखमा तिची बाजू मांडू लागली, ‘बाई, हॉस्पिटलला, ऑपरेशनला लई पैका लागतोय. म्हणून हा सस्त्यातला विलाज करून बघायचा.’

शालिनी लगेच उत्तरली, ‘गेल्या वर्षी मुलगा ‘नवसानं’ झाला म्हणून नवस फेडायला सावकाराकडून कर्ज काढून अख्खा गोतावळा घेऊन जायचं काही नडलं होतं का? देव काही मागत नसतो. नुसता मनापासून केलेला नमस्कार पुरतो त्याला. अन् समजा भावनेच्या भरात बोलला गेला नवस, तरी माणसाला तो जड असताना बसून करून घ्यायला देव म्हणजे काय सावकार आहे का? कर्जापायी नुसतं व्याजच हजारच्या वर झालं असेल.’

‘कठीण आहे गं बाई, या अशिक्षित लोकांचं.’ स्मिता उद्गारली. ‘त्या वेळी कर्ज काढलं नसतं तर आता खर्‍या गरजेच्या वेळी पैसा घेता आला असता की गं, रखमा!’
‘आता काय करावं बाई, आमच्या लोकासनी कळाया पायजेल की!’ म्हणत रखमानं खाली वाकून अर्धवट थांबवलेलं झाडणं पुन्हा सुरू केलं. शालिनी स्मिताशी गप्पा मारू लागली.

‘स्मिता, तुझ्या सानिकाचा लग्न समारंभ फार छान झाला हं! मुख्य म्हणजे वातावरण खूप छान, आनंदी अन्् खेळकर होतं,’ शालिनीनं मनापासून अभिप्राय दिला. स्मिताचा चेहराही समाधानी दिसतच होता. म्हणाली, ‘हो गं, खूप चांगली माणसं आहेत ती. त्यामुळेच कसलंही दडपण नव्हतं. आम्ही आता गावाला जाऊन यायचं म्हणतोय.

‘लगेच? परवाच तर लग्नाची गडबड संपली!’ शालिनीनं म्हटलं. ‘हो, पण इतकं सगळं चांगलं झालंय सानिकाचं, तर देवीला जाऊन यावंसं वाटलं. साडी नेसवून खणा-नारळानं ओटी भरावी म्हणते मी. आणि वन‌् ग्रॅम सोन्यामधलं छोटंसं मंगळसूत्रही घालावं देवीला असं मनात आलं. दीड हजारच्या आसपास मिळेल,’ स्मितानं मनातली गोष्ट सांगितली.
शालिनीनं विचारलं, ‘तू काही बोलली आहेस का तसं?’

‘नाही, बोलले नाही गं, पण देवाच्या कृपेनं सानिकाचं इतकं चांगलं झालंय तर आपणही कृतज्ञता म्हणून काही करावं असं वाटलं.’
शालिनी मग आपल्या मनातला विचार सांगू लागली. म्हणाली, ‘स्मिता, काही चांगलं घडल्याचं श्रेय दुसर्‍याला देणं आणि कृतज्ञता म्हणून काही करावंसं वाटणं या भावना खरंच मोलाच्या आहेत. फक्त एक सांगू?’
‘सांग की, अवश्य!’ स्मिता म्हणाली.

‘तुझ्या लेकीचं छान भलं झालं, मग आता तू कुणाच्या तरी मुलीचं भलं केलंस तर ते जास्त योग्य होईल, असं मला वाटतं. साडी, चोळी, मंगळसूत्र या सार्‍याचा खर्च अडीच हजारांपर्यंत जाईल. ती रक्कम तू रखमाच्या मुलीच्या उपचारासाठी देशील? अर्थात, तुला पटलं तर हं! माझा आग्रह नाही.’ स्मिता क्षणभर विचारात पडली, अन‌् मग म्हणाली, ‘शालिनी, खरंच चांगलं सुचवलंयस ग तू! मला पटलं. किती योग्य दिशा देतेस गं तू नेहमी! मी देवीला नवस बोलले नव्हतेच, पण बोलले असते तरी तो बदलून या पद्धतीनं फेडावा हे पटलं असतं मला. हाक मार रखमाला.’
शालिनीनं हाक मारून रखमा येताच स्मिता म्हणाली, ‘रखमा, तुझ्या मुलीच्या उपचारासाठी मी अडीच हजार रुपये देते; पण एक अट हं...’

रखमाचा चेहरा उजळला. म्हणाली, ‘व्हय, चालंल. सांगा की अट.’
स्मिता म्हणाली, ‘यापुढे तूही कोणता नवस बोलायचा नाहीस. बोलला तर त्यासाठीच्या खर्चाइतकी रक्कम शालिनीकडे जमा करायची, एवढंच. उपयोग होईल.’ रखमाचा खुललेला चेहरा पाहून स्मिताला धन्यता वाटली.
सुनीला बुद्धिसागर, सोलापूर
sunila0810@gmail.com